कोल्हापूर / सुधाकर काशीद :
कोल्हापुरात फुटबॉल लोकप्रिय आहे. फुटबॉलचे कनिष्ठ–वरिष्ठ मिळून 112 संघ आहेत. 2170 खेळाडू आहेत. पेठा–पेठांत तर तिसरी–चौथी पिढी फुटबॉल खेळत आहे. शाहू स्टेडियम तर फुटबॉल सामन्याच्या निमित्ताने तुडुंब गर्दीने भरून जात आहे. लाखांच्याखाली बक्षीस नाहीच, अशी इथली प्रत्येक फुटबॉल स्पर्धा आहे. पण हा फुटबॉल फक्त शाहू स्टेडियमपुरता मर्यादित नाही तर त्याला खूप मोठे क्षितीज स्टेडियमच्या बाहेर आहे, हे इथल्या जिगरबाज खेळाडूंना समजून सांगण्याची गरज आहे. अ विरुद्ध ब तालीम एवढ्या पुरताच इथला फुटबॉल अडकून राहतो की काय, असे वाटण्यासारखी परिस्थिती झाली आहे. कहर असा की आपल्या मंडळाकडून खेळायला मिळावे म्हणून अखिल भारतीय पातळीवरची फुटबॉल स्पर्धा सोडून काही खेळाडू कोल्हापूरला परत आले आहेत. यात जरूर त्यांना त्यांच्या फुटबॉल संघाबद्दलचा अभिमान आहे. संघाबद्दलची ओढ आहे, इर्षा आहे. पण केवळ आपल्या संघाकडून खेळण्याचे समाधान न मानता राज्य, राष्ट्रीय पातळीवर खेळायची चालून आलेली संधी त्यांनी दवडली आहे.
कोल्हापूरचा फुटबॉल जिवंत आणि रसरशीत आहे, अतिशयोक्ती अजिबात नाही. जन्मजात बालकाच्या पाचव्या दिवशी पाचवी पूजन म्हणून घरोघरी एक विधी असतो. त्या विधीच्या वेळी काही पेठांत फुटबॉलही पूजला जातो. म्हणजेच इथल्या अनेक तरुणांच्या पाचवीलाच फुटबॉल पुजलेला असतो. शालेय, कॉलेज जीवनात तर इथला तरुण फुटबॉलच्या प्रेमातच पडतो. पण हा फुटबॉल त्याच्या पेठेशी, तालमीशी जोडला गेलेला असतो. पेठेची मॅच असेल त्या दिवशी दांडी मारून मॅच बघायला जाण्याकडेही त्यांचा ओढा असतो. जरूर फुटबॉल त्यांच्या अंगात भिनलेला आहे. पण आपली पेठ, आपली तालीम एवढ्या मर्यादितच तो जपला गेला आहे. शाहू स्टेडियमच्या बाहेरच्या फुटबॉल विश्वाशी तो कमी संबंध ठेवत आहे आणि एका मर्यादित समाधानात स्वत:ला अडकवून घेत आहे. संघाच्या समर्थनार्थ तर काहीही करायला तो तयार आहे.

वास्तविक, कोल्हापूरचे हे फुटबॉल प्रेम नवनवीन राज्य व राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू तयार होण्यास अतिशय पूरक आहे. कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन स्वत:चे लीग व अन्य संस्थांच्यावतीने भरवण्यात येणाऱ्या फुटबॉल स्पर्धांना प्रोत्साहन देते. लाखांहून अधिक बक्षिसांची खैरात होते. टीव्ही, फ्रिज नव्हे तर चार चाकी वाहनाचे बक्षीसही जाहीर केले जाते. केवळ जाहीर नव्हे तर मैदानाच्या कडेने बक्षिसाची मोटार फिरवली जाते. वैयक्तिक बक्षिसाची तर मोजदादच नसते आणि प्रसिद्धी तर वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेसारखी असते. अशा वातावरणात राज्य व राष्ट्रीय पातळीवर खेळू शकणारे अनेक खेळाडू तयार होणे अपेक्षितच आहे. पण त्याला अपवाद आहे. स्थानिक स्पर्धेतच खेळण्यावर खेळाडूंचा आणि संघांचाही भर आहे. आपल्या तालमीने दुसऱ्या तालमीवर विजय मिळवला की दिवाळीसारखा जल्लोष ठरलेला आहे. किंबहुना केवळ एवढ्या मर्यादित समाधानावर काही चांगले खेळाडू आहेत. परिणामी, खूप कमी संख्येने खेळाडू राष्ट्रीय पातळीवर जाऊन पोहोचले आहेत. हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच त्यांची संख्या आहे.
अगदी ताजे उदाहरण म्हणजे शिवाजी विद्यापीठाचा संघ अखिल भारतीय आंतर विद्यापीठ फुटबॉल स्पर्धेसाठी कानपूर येथे निघाला होता. निवड झालेले सारेच खेळाडू चांगले आणि इथल्या स्थानिक संघाचे स्टार खेळाडू. पण त्यातील पाच खेळाडू कानपूरला पोहोचण्याआधीच मधूनच परत आले. कारण त्यांच्या संघांची कोल्हापुरात केएसएल लीग फुटबॉल स्पर्धेत मॅच होती किंवा तसा निरोप त्यांच्यापर्यंत पद्धतशीर पोहोचवण्याची कोणीतरी घाई केली. इकडे कोल्हापुरात उलट –सुलट चर्चेला उधाण आले. फुटबॉलमधला जय–पराजय अस्मितेचा विषय असल्याने मोठा गोंधळ उडाला आणि चक्क कानपूरला पोहोचण्याआधीच पाच खेळाडू मधूनच परत आले. अखिल भारतीय विद्यापीठ फुटबॉल स्पर्धेत खेळण्यापेक्षा त्यांनी कोल्हापूरला परत येणे पसंत केले. अर्थात यामागेही काही घडामोडी घडल्या असल्याची चर्चा आहे आणि येत्या काही दिवसात त्या उघड होण्याची शक्यता आहे. पण याक्षणी एवढे की या खेळाडूंना राष्ट्रीय पातळीवर खेळायची आलेली संधी त्यांच्या हातून गेली आहे.

तुमच्या गावात तुम्ही किती स्पर्धेत खेळलात, किती गोल केले, किती मोठे हिरो ठरलात? याला राष्ट्रीय पातळीवर फारसे महत्त्व दिले जात नाही. राष्ट्रीय पातळीवर तुम्ही किती चमकलात, यालाच प्राधान्य दिले जाते. त्यावरच नोकरी मिळते किंवा देशपातळीवरच्या संघात संधी मिळते. पण कोल्हापुरातील बहुसंख्य खेळाडूंना त्यात रस नाही. माझा संघ, माझी पेठ, माझी तालीम हीच त्यांची अस्मिता ठरली आहे. ही अस्मिताही आवश्यकच आहे. पण त्यातून आपल्या भावी आयुष्याची संधी शोधली नाही तर एका मर्यादेतच आपण राहणार, हे या जिगरबाज खेळाडूंना कोणीतरी सांगण्याची गरज आहे. त्या त्या संघातील ,त्या त्या पेठांतील ज्येष्ठांनी त्यात पुढाकार घेणे या पार्श्वभूमीवर अतिशय आवश्यक आहे.








