बसफेऱ्या कमी; धोकादायक प्रवास कायम
बेळगाव : प्रवाशांच्या तुलनेत बसफेऱ्यांची संख्या कमी झाल्याने जीवघेणा प्रवास सुरू आहे. अपुऱ्या बससेवेमुळे प्रवाशांना लोंबकळत प्रवास करण्याचा प्रकार सुरू आहे. शक्ती योजनेंतर्गत महिलांचा मोफत प्रवास सुरू आहे. तर दुसरीकडे बसफेऱ्या कमी असल्याने सर्वसामान्यांना लोंबकळत धोकादायक प्रवास करावा लागत आहे. याकडे परिवहन गांभीर्याने पाहणार का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. मागील दोन महिन्यांपासून प्रवासी संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. विशेषत: महिला प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी बसफेऱ्या कमी झाल्याचे दिसत आहे. परिणामी मिळेल त्या बसने प्रवास करावा लागत आहे. दरम्यान काही प्रवाशांना आणि विद्यार्थ्यांना दरवाजात लोंबकळत जीवघेण्या प्रवासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे प्रवाशांची फरफट थांबणार कधी? असा प्रश्न पडू लागला आहे. विशेषत: सकाळ व सायंकाळच्या सत्रात प्रवाशांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे प्रवासी आणि विद्यार्थ्यांची बस पकडण्यासाठी धडपड सुरू असलेली पहावयास मिळत आहे. अपुऱ्या बससेवेमुळे प्रवाशांना मिळेल त्या बसने धोकादायक प्रवास करावा लागत आहे. शक्ती योजना सुरू झाल्यापासून बसफेऱ्या कमी झाल्या आहेत. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. सकाळ आणि सायंकाळच्या वेळेत बसमध्ये चढण्यासाठी धावपळ सुरू असते. शिवाय सीट पकडण्यासाठी चढाओढ होते. त्यामुळे दुर्घटनेची भीतीही व्यक्त होऊ लागली आहे.









