कोल्हापूर / विनोद सावंत :
महापालिकेने रंकाळा तलावालगत असणाऱ्या रंकाळा टॉवर ते न्यू पॅलेस या मार्गावर फुटपाथ केला आहे. वास्तविक गरज नसताना फुटपाथ केला गेला आहे. पर्यटक अथवा स्थानिक नागरिक रंकाळा उद्यानामधून ये जा करत असताना वाहतुकीला अडथळा ठरणारा फुटपाथ करण्यामागे नेमका उद्देश काय हे शोधण्याची गरज आहे.
रंकाळा सुशोभिकरणासाठी राज्य शासनाकडून सुमारे 20 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 9 कोटींचा निधीतून रंकाळा परिसरात विकासकामे केली जात आहेत. यामध्ये तांबट कमान येथे पर्यटकांसाठी स्वच्छतागृहासह अन्य सुविधा करण्यात येणार होत्या. यास रंकाळा प्रेमीसह स्थानिक नागरिकांनी रंकाळा तलावाचे अस्तित्व धोक्यात येईल म्हणून विरोध केला. यानंतर या निधीतून जुना वाशीनाका येथे फुटपाथसह अन्य विकासकामे केली तसेच रंकाळा तलावातील उद्यानामध्ये फरशी बदलण्यासह रंकाळा टॉवर ते न्यू पॅलेस मार्गावर फुटपाथ करण्यात आले.
वास्तविक गरज नसताना हे फुटपाथ करण्यात आले आहे. मुळातच सर्व नागरिक रंकाळा तलावातील उद्यानातूनच जात असतात. असे असतानाही फुटपाथ करण्यात आला आहे. विशेष म्हणजे फुटपाथच्या बाजूने लोंखंडी पिलर आणि जाळीही लावली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार दौऱ्यावर आल्यानंतर यावरून मनपाला धारेवर धरले होते. यावेळी मनपाने जाळी काढली. मात्र, लोखंडी पिलर आणि फुटपाथ आजही कायम आहे. या ठिकाणी पावसाचे पाणी साचले आहे. फुटपाथवर झाकणही काढली आहेत. यामध्ये लहान मुले पडण्याचा धोका आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांसह वाहनधारकांकडून वापर होत नसलेले फुटपाथ हटविण्याची मागणी जोर धरत आहे.
- लाखो रुपये पाण्यात
वास्तविक मनपा ज्या ठिकाणी फुटपाथची गरज आहे. तेथे फुटपाथ करत नाही. ज्या ठिकाणी आवश्यक नाही तेथे मात्र फुटपाथ केला आहे. रंकाळा टॉवर ते न्यू पॅलेस येथील फुटपाथ हे यासाठी उत्तम उदाहरण आहे. वापरच होत नसल्याने फुटपाथवर केलेला लाखो रूपये खर्च पाण्यात गेला आहे.
- निम्मा रस्ता वापराविना
मुळातच फुटपाथमुळे पाचे ते सहा फुट रस्ता वाया गेला आहे. त्या पुढे वाहने पार्किंग होत असल्याने निम्म्या रस्त्याचा वापरच होत नाही. उर्वरित रस्ता वाहनांसाठी अरूंद पडत आहे. त्यामुळे रात्रीच्यावेळी वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम आहे.
मुळातच रंकाळा टॉवर ते न्यू पॅलेस रस्त्याला रहिदारी जास्त आहे. अशा मध्येच फुटपाथ उभारण्यात आला आहे. यामुळे जागा व्यापाली आहे. विशेष म्हणजे याचा नागरिकांकडून कमी विक्रेत्यांकडूनच जास्त वापर होत आहे. फुटपाथच्या पुढे वाहने लावलेली असतात. त्यामुळे रात्रीच्यावेळी वाहतूक कोंडी होते. जर फुटपाथचा वापर होत नसेल तर हटवून वाहतुकीतला अडथळा दूर करावा.
प्रमोद चोरगे, रहिवाशी अंबाई टँक, रंकाळा पार्क परिसर








