अनेक पुलांजवळ कचरा साचून राहिल्याने पाण्याचा निचरा होणे अशक्य : परिसरातील हजारो एकर शेतजमीन पाण्याखाली, कायमस्वरुपी तोडगा काढण्याची मागणी

प्रतिनिधी /बेळगाव
पावसाळा सुरू होण्यापूर्वी बळ्ळारी नाल्याची खोदाई करा, या नाल्यातील गाळ आणि जलपर्णी काढून टाका, येळ्ळूर ते हुदलीपर्यंतच्या बळ्ळारी नाल्याची खोदाई करा, अशी मागणी वारंवार करण्यात आली. मात्र, मुर्दाड आणि निद्रावस्थेत असलेले पाटबंधारे खाते, महापालिका आणि प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेतली नाही. परिणामी सध्य सुरू असलेल्या दमदार पावसामुळे हजारो एकरमधील भातपीक पाण्याखाली गेले आहे. बेळगाव शहरापासून जवळपास 10 किलोमीटरपर्यंतचे असलेले नाले आणि नद्यांमध्ये अतिक्रमणाबरोबरच त्याचा गाळ काढण्यात आला नसल्यामुळे आता शेतकऱयांना मोठा फटका बसला आहे.

बळ्ळारी नाला हा येळ्ळूरपासून सुरू होतो. त्यानंतर जुने बेळगाव, कुडचीमार्गे सुळेभावी आणि हुदलीला जाऊन पोहोचतो. हा नाला दरवषीच शेतकऱयांना त्रासाचा ठरत आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली बेळगाव शहराची वाताहात केली गेली आहे. या स्मार्ट सिटीचे डेनेजचे पाणी चक्क या नाल्यात सोडण्यात येत आहे. त्यामुळे शहर स्मार्ट आणि ग्रामीण भागात अस्वच्छता असा प्रकार सुरू झाला आहे. नदी-नाले यामध्ये डेनेजचे आणि गटारीचे पाणी सोडल्यामुळे शहरापासून जवळ असलेल्या ग्रामीण भागातील जनतेला जीवन जगणे कठीण बनले आहे.
बळ्ळारी नाल्यामध्ये केवळ डेनेजचे पाणी नाही तर कचराही फेकण्यात येत आहे. त्यामुळे पाण्याचा निचरा होणे अशक्मय झाले आहे. जोपर्यंत शहराच्या सांडपाणी व डेनेजचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत बळ्ळारी नाल्याची दुरवस्था थांबत नाही, हे निश्चित आहे. कोणतेच नियोजन नाही. कोणालाच सर्व काही सुरळीत करण्याची इच्छाच नाही, अशी अवस्था सध्या बेळगाव परिसराची झाली आहे. बळ्ळारी नाल्याची खोदाई करण्यासाठी यापूर्वी प्रयत्न झाले. मात्र, ते कधीच यशस्वी झाले नाहीत.
बळ्ळारी नाला ठरतोय शेतकऱयांसाठी शाप
बळ्ळारी नाल्याच्या खोदाईसाठी दिवंगत खासदार सुरेश अंगडी यांनी निधी मंजूर केला होता. मात्र, अधिकारी आणि काही जणांमध्ये वादावादी झाली होती. त्यानंतर ते काम अर्धवटच राहिले. आलेला निधीदेखील वाया गेला. त्या निधीचा आजतागायत हिशोबही देण्यात आला नाही. त्यामुळे सरकारचे मोठे नुकसान झाले. मात्र, काही जणांच्या अहंकारी वृत्तीमुळे शेतकरी मात्र भरडला जात आहे. बळ्ळारी नाला हा शेतकऱयांसाठी शाप ठरला आहे. आपल्याला कोणीच वाली नाही, अशा खेदपूर्ण प्रतिक्रिया शेतकऱयांतून उमटू लागल्या आहेत.
दरवर्षीच्या नुकसानीमुळे शेतकरी हतबल
बळ्ळारी नाल्यातील जलपर्णी तसेच गाळ काढला असता तर भातपीक वाचले असते. मात्र, दमदार पावसामुळे बळ्ळारी नाल्यातून पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे हजारो एकर जमीन आता पाण्याखाली गेली आहे. त्या जमिनीतील भातपीक पूर्णपणे कुजून जाणार आहे. दरवषीच हा प्रकार घडत आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाले
आहेत.
येळ्ळूर पुलामध्येच शहरातील कचरा
येळ्ळूरपासून सुरू झालेल्या बळ्ळारी नाल्याजवळ पूल असून त्या पुलामध्येच शहरातील कचरा फेकला जात आहे. आनंदनगर, भाग्यनगर, अनगोळ या परिसरातील डेनेजचे पाणी थेट या नाल्याला सोडण्यात येत आहे. त्याबद्दल कोणीच विचार करत नाही. या नाल्यामध्ये मैला साचून आहे. त्याचबरोबर कचरादेखील फेकला जात आहे. त्यामुळे हा नाला पूर्णपणे बुजला आहे. वडगाव, शहापूर शिवारातील पाणी निचरा होत नसल्यामुळे पाणी साचून पिके वाया गेली आहेत.
विकासाच्या वल्गना केल्या जातात. मात्र, देशाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाकडे कोणाचेच लक्ष नाही. एकतर महागाईमुळे जीवन जगणे शेतकऱयाला कठीण झाले आहे. त्यातच अशाप्रकारे फटका बसत आहे. त्यामुळे शेतकऱयांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
बळ्ळारी नाल्याची डोकेदुखी असताना हलगा-मच्छे बायपास रस्ता करण्याची प्रशासनाला घाई झाली आहे. बेकायदेशीररित्या कामे केली जात आहेत. या रस्त्यासाठी मातीचा भराव टाकला जात आहे. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील पाणी साचून आहे. पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे हलगा-मच्छे बायपास रस्त्याच्या बाजूची जमीनदेखील आता पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे येळ्ळूर, मच्छे, पिरनवाडी, वडगाव, शहापूर, जुने बेळगाव, कुडची परिसरातील शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. अशीच परिस्थिती राहिल्यास एक दिवस या परिसरात शेतकरीच राहणार नाही. तेव्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ व जिल्हा प्रशासनाने तातडीने पाहणी करून या नाल्याच्या खोदाईबाबत आतापासून आराखडा तयार करून कायमस्वरुपी तोडगा काढावा, अशी मागणी जोर धरत आहे.
कचरा-जलपर्णीमुळे पाण्याचा निचरा होणे कठीण
येळ्ळूरपासून सुरू झालेल्या या नाल्यामध्ये झाडे, झुडुपे, जलपर्णी आणि गाळ साचून आहे. त्यानंतर या नाल्यावर असलेल्या अनेक पुलांच्या मुशी आणि पाईपदेखील बुजून गेल्या आहेत. कचरा अडकल्यामुळे पाण्याचा निचरा होणे कठीण झाले आहे. येडियुराप्पा रोडजवळ असलेल्या पुलाजवळ कचरा अडकला आहे. त्यामुळे पाण्याचा निचराच पुढे होत नाही. त्यानंतर राष्ट्रीय महामार्गाजवळही जलपर्णी वाढल्याने तेथेही पाणी तुंबून असून पाण्याचा पुढे निचराच होत नाही. त्यानंतर बागलकोट रोडवरील बसवन कुडचीजवळ तर पूर्ण पुलच बुजून गेला आहे. केवळ एका मुशीतून पाणी जात आहे. त्यामुळे त्याचा फटका वडगावसह जुने बेळगावपर्यंतच्या शेतकऱयांना बसू लागला आहे.









