परगावच्या बसेस परस्पर निघून जात असल्याने प्रवाशांची कोंडी : कारवार,उळवी यासह इतर मोजक्या बसेस येतात स्थानकात
बेळगाव : कॅन्टोन्मेंट बसस्थानक स्मार्ट झाले परंतु अद्याप तेथील बससेवेचा विस्तार झालेला नाही. यामुळे बसस्थानकातील प्रवाशांची संख्या रोडावली आहे. कारवार व कोकणात जाणारी बससेवा नगण्य आहे. तर ग्रामीण भागातील मोजक्याच गावांना येथून बससेवा सुरू असल्याने स्मार्ट बसस्थानक वापराविना पडून आहे. त्यामुळे या बसस्थानकातील बससेवेचा विस्तार करण्याची गरज निर्माण झाली आहे. स्मार्टसिटी अंतर्गत कॅन्टोन्मेंट बसस्थानकाचा विकास करण्यात आला. प्रवाशांसाठी पुरेशी जागा, बस पार्किंगसाठी प्रशस्त खुली जागा, हॉटेल तसेच छोटे स्टॉल यासह इतर सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यापूर्वी कॅन्टोन्मेंट बसस्थानकातून कोकणातील सावंतवाडी, वेंगुर्ला, कुडाळ, देवगड, कणकवली व राजापूर तर गोव्यातील वास्को, पणजी, मडगाव, फोंडा, म्हापसा, कारवार तर ग्रामीण भागातील हंगरगा, मंडोळी, जांबोटी, कणकुंबी या परिसरात जाणाऱ्या बस ये-जा करत होत्या. त्यामुळे नूतनीकरणापूर्वी प्रवाशांची मोठी गर्दी असायची.
परंतु, सध्या यातील बऱ्याचशा सेवा बंद आहेत. कारवार, उळवी यासह इतर बस मोजक्या प्रमाणात कॅन्टोन्मेंट बसस्थानकात येतात. उर्वरित बस थेट गोगटे सर्कलमार्गे खानापूरला निघून जात असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे प्रवाशांना गोगटे सर्कल येथील झाडाखाली थांबण्याची वेळ येत आहे. याऐवजी या सर्व सेवा कॅन्टोन्मेंट बसस्थानकातून सुरू झाल्यास प्रवाशांची सोय होण्यास मदत होईल. कोकणात जाणाऱ्या अधिक तर बस सध्या कॅन्टोन्मेंट बसस्थानकात न जाता सेंट झेवियर्स येथील चंदगड बसस्टॉप मार्गे सावंतवाडीच्या दिशेने जात आहेत. बऱ्याच वेळा कॅन्टोन्मेंट बसस्थानकात बसची वाट पहात प्रवासी ताटकळत बसतात. परंतु, बस थेट सावंतवाडीला निघून जात असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. परिवहन मंडळाने या सर्व बसचे योग्य नियोजन केल्यास कॅन्टोन्मेंट बसस्थानकाला गतवैभव मिळणार आहेच. त्याचबरोबर मध्यवर्ती बसस्थानकावरील भार कमी होण्यास मदत होईल.
कॅन्टोन्मेंट बोर्डकडून वारंवार स्वच्छता
कॅन्टोन्मेंट बोर्डकडून सध्या या ठिकाणी वारंवार स्वच्छता करण्यात येत आहे. त्याचबरोबर येथील दुकान गाळ्यांचा लिलाव करण्यात आला असून अनेक दुकान गाळे सुरू आहेत. त्यामुळे परिवहन मंडळाने या बसस्थानकाचा योग्य वापर करून घेणे गरजेचे आहे. तसेच रेल्वेतून उतरलेल्या प्रवाशांना कोकणासह कारवार व ग्रामीण भागात ये-जा करण्यासाठी मदत होईल.









