वरकुटे :
सातारा ते सोलापूर या महामार्गावरील सातारा ते पंढरपूर पर्यंत सुमारे २० ठिकाणी रस्त्यांचे काम अपूर्ण ठेवल्याने या रस्त्यावर वारंवार अपघात होत असून अनेकांनी या रस्त्यावर अपघातात जीव गमावला आहे. या कामाच्या पूर्ततेसाठी केंद्रीय दळणवळणमंत्री नीतीन गडकरी साहेबांनीच लक्ष घालावे, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
खराब रस्त्यामुळे अनेक वाहनांचे मोठे नुकसान होत आहे. तरी हा रस्ता दुरुस्त करावा. अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम झाले असून त्याचीही डागडुजी करावी.
गेली पाच ते सात वर्ष झाली सातारा ते सोलापूर या रस्त्याचे काम सुरू आहे. परंतु अनेक ठिकाणी हे काम अपूर्ण ठेवले आहे
त्या परिसरात पुढे खराब रस्ता आहे. किंवा अपघात प्रवण क्षेत्र असे बोर्ड लावलेले नाहीत. गोंदवले खुर्द ते पळशी या दरम्यान, तीन ठिकाणी, पंतवस्ती येथील पुल, म्हसवड येथे माणगंगा नदीच्या पुलावर, धुळदेव येथे सुमारे एक कि.मी. अंतराचा रस्ता, साळमुख जवळ, भाळवणी जवळ पुलाचे काम, पंढरपूरजवळ कामे अपुरी ठेवली आहेत. यामुळे या परिसरात आत्तापर्यंत अनेक अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागला आहे. तसेच अनेक जण अपघातात जखमी ही झाले आहेत. तसेच धुळदेव जवळील पुलाचे व रस्त्याचे काम गेली सात वर्ष झाली तरी अपूर्ण आहे. ओढ्यावरील हा पूल असून या ठिकाणी रस्ता खूपच अरुंद आहे. येथील रस्ता इतका खराब आहे की, या परिसराला रस्ता कोणी म्हणणारच नाही.
इतकी भयावह परिस्थिती असून रात्री येते बऱ्याच वेळा अपघात होतात. परंतु झोपलेलं रस्ते विकास मंडळ या परिसरात साधे फलक लावण्याचीही तसदी घेत नाही. या परिसरातील रस्त्याची पार चाळण झाली आहे. तीच अवस्था म्हसवड शहरात प्रवेश करताना आहे.
माणगंगा नदीच्या पुलावरील व परिसरातील काम बंद असल्याने, अर्धवट अवस्थेतील काम सोडून दिले आहे. तसेच पुढे गेल्यावर पिलीव पर्यंत अनेक ठिकाणी रस्त्याचे काम अपूर्ण आहे. एकूणच हा रस्ता प्रवाशाच्या सोयीसाठी आहे की गैरसोय निर्माण करण्यासाठी आहे, असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. रस्त्याला पूर्ण होण्या अगोदरच अनेक ठिकाणी भेगा पडल्या आहेत. जेथे जेथे रस्त्याचे काम निकृष्ट आहे. त्या भागाचे पुन्हा काम करावे या कामाच्या पुर्ततेसाठी केंद्रिय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनीच लक्ष घालावे, आशी मागणी जनतेतून व प्रवासी वर्गातून होत आहे.
- रस्त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष
सातारा ते सोलापूर हा महामार्ग असून या महामार्गावर पंढरपूर तीर्थक्षेत्र आहे. तसेच याच महामार्गावरून पुढे हैदराबाद पर्यंत हा महामार्ग जोडला जातो. महत्वाच्या या रस्त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले असून आणखी किती वर्ष या रस्त्याचे काम अपूर्ण राहणार असा प्रश्न जनतेतून विचारला जात असून या रस्त्याला कोणी वाली आहे का नाही अशी भयानक परिस्थिती या रस्त्याची झाली आहे.








