फलटण :
सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, फलटण तालुक्यातील दिग्गज नेते, प्रथितयश व्यावसायिक श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या बंगल्यावरील आयकर विभागातील अधिकाऱ्यांनी गेल्या तीन दिवसापासून सुरू केलेली तपास प्रक्रिया अद्यापही सुरू आहे. दि. 8 रोजी चौकशीचा चौथा दिवस होता. चौकशीचा फेरा कधी संपणार? या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित आहे. बंगल्यात आयकर विभागाच्या चौकशीचे काम सुरू तर बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी असल्याचे सद्य चित्र आहे. बंगला प्रवेशद्वारावर बसलेल्या शेकडो कार्यकर्त्यांना राजघराण्यातील व्यक्तींकडून शांत राहण्याचे आवाहन केले जात असुन श्री प्रभू रामचंद्रच्या आशिर्वादाने सगळं काही व्यवस्थीत चाललं असल्याचा धीर कार्यकर्त्यांना दिला जात आहे.
जिल्हा परिषदेच्या सदस्या, संजीवराजे यांच्या सुविद्य पत्नी श्रीमंत शिवांजलीराजे, चिरंजीव श्रीमंत सत्यजीतराजे यांनी बंगल्याबाहेर येवुन कार्यकर्त्यांशी संवाद साधला असता उपस्थित कार्यकर्त्यांनी चौकशीचे सत्र कधी संपणार चार दिवस झाले, यावर सत्यजीतराजे म्हणाले, बहुतेक आज आयकर विभागाच्या चौकशीचे काम संपेल. तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात आम्हाला आधार वाटला. सगळं काही सुरळीत चाललंय. मीही याठिकाणी (फलटण) नव्हतो. मलाही टेन्शन होतं. मात्र, तुम्हा सर्वांना बघुन मोठा आधार वाटला. चौकशीचा चौथा दिवस आहे. आज संपेल, काही पेपर वर्क बाकी आहे. त्यांना (अधिकारी) प्रोटोकॉल असल्याचे सांगत असताना आज हे काम संपले पाहिजे. आम्ही तर या ठिकाणी आपल्यासोबत आहोतच असा धीर कार्यकर्त्यांनी दिला.
चार दिवसांच्या चौकशीत तपास यंत्रणेला काही आढळुन आले नाही. राजकीय आकसापोटी व द्वेषापोटी ही चौकशी होत आहे. आपल्या अनेक संस्थाचा कारभार पारदर्शी चालतोय. अनेकांना रोजगार दिला जातोय. तालुक्यातील कोणत्याही प्रश्नांचे निवारण बाबांशिवाय होत नाही. जनतेच्या सेवेला ते सदैव हजर असतात. चौकशी कधी संपणार? आयकर विभागातील आधिकाऱ्यांनी जनतेचे टेन्शन लवकर दूर करून बाबांना मोकळे करावे. आम्हाला त्यांना भेटता येत नाही. या आणि अशा अनेक प्रतिक्रीया कार्यकर्त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केल्या.








