तासगाव / सुनील गायकवाड :
तासगाव शहरात रस्त्यावर बाजार भरवून तालुका वेठीस धरला जात आहे. हा बाजार कधी हटणार असा सवाल उपस्थित होत आहे. तासगाव नगरपरिषदेकडून विकासाच्या नावावर सात वर्षांत उभारलेल्या अनेक इमारती धूळ खात पडल्या आहेत. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या इमारती केवळ नियोजनाच्या अभावामुळे बंदिस्त राहिल्या आहेत. या इमारती आता मद्यपींचे अड्डे बनले आहेत. नगरपरिषद आणि राजकीय ढिसाळपणा याला जबाबदार असल्याचे आरोप नागरिकांतून होत आहेत.
तासगाव नगरपरिषद ‘क’ वर्ग नगरपरिषद आहे. मात्र तरी देखील माजी खासदार संजय पाटील यांनी प्रयत्न करून भुयारी गटार, पालिकेची नूतन इमारत, बाजार कट्टे, मंगल कार्यालय अशा अनेक इमारतींसाठी कोट्यवधींचा निधी आणला. सत्ताधारी गटाच्या तत्कालीन नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी या इमारतींचा जनतेसाठी किती उपयोग होतीय किंवा होईल का, याबाबत विचार केला का? असा सवाल उपस्थित होत आहे.
श्री छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलामध्ये ५५ लाख रुपये खर्च करून हॉल उभारण्यात आला. मोठ्या बझारसाठी किंवा एखाद्या कंपनीसाठी हा हॉल भाड्याने देण्यात येईल, त्यातून पालिकेला कर मिळेल, अशी स्वप्ने दाखवण्यात आली. पण प्रत्यक्षात हा हॉल बांधल्यापासून पाच वर्षे बंद अवस्थेत आहे.
गावामध्ये वाढती वाहतूक आणि आठवड्याचे तीन बाजार, यामुळे होणारी गर्दी टाळण्यासाठी बसस्थानक चौकात बाजारकट्टे उभारण्यात आले. वीस लाखांचा खर्च करण्यात आला. मात्र भाजीपाला विक्रेत्यांनी याठिकाणी बसण्यास नकार दिला.
शहराला वेठीस धरून या निर्णयाला काही माजी नगरसेवकांनी साब दिली. सहा वर्षे हे बाजारकट्टे ओस पडले आहेत. येथे मद्यपींनी अड्डा केला आहे. अंधार पडल्यानंतर याठिकाणी मद्यपींची गर्दी आणि बाटल्यांचा खच पडलेला दिसतो. नागरिकांसाठी कमी पैशात उपयोगी येईल, असे सांगून अडीच कोटी रुपये खर्च करून नगरपरिषद मालकीचे मंगल कार्यालय म्हणजेच हॉल उभारण्यात आला.
मात्र त्रिसदस्यीय समितीने याचे भाडे आवाक्याबाहेर ठरवल्याने याठिकाणी एकही कार्यक्रम झाला नाही. पर्यायाने हे कार्यालयदेखील बंद अवस्थेत आहे. याठिकाणी वीज बिल आणि अन्य खर्च अद्यापही सुरू असून फायदा मात्र शून्य आहे.
शहरातील आठवडा बाजार वगळता रोजचा बाजार रस्त्यावरून कधी हटणार असा सवाल तासगाव सह परिसरातील नागरिकांतून केला जात आहे. बाजार विक्रेत्यांशी चर्चा करून रोजचा बाजार मार्केटमध्ये भरेल यासाठी नगरपरिषद प्रशासनाने यासाठी आक्रमक पाऊल उचलावे असेही बोलले जात आहे. पुढील चार महिन्यांत निवडणूक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र शहरातील कोट्यवधीच्या इमारती बंद असल्याबद्दल कोणीच बोलत नाही. सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत आवाज उठविण्याची मागणी होत आहे.








