दोन्ही रस्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष : खड्ड्यांमुळे वाहनधारकांना त्रास : लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
वार्ताहर /किणये
कावळेवाडी-कर्ले व बिजगर्णी-कावळेवाडी या दोन्ही संपर्क रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. यामुळे किरकोळ अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या अनेक महिन्यापासून या रस्त्याकडे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे साफ दुर्लक्ष झाले असल्याच्या तक्रारी नागरिकांतून आहेत. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती होणार कधी? असा सवाल सर्वसामान्य नागरिकांतून उपस्थित करण्यात येऊ लागला आहे. तसेच या रस्त्यांच्या दुरुस्तीकडे लोकप्रतिनिधी लक्ष देतील का, अशी चर्चाही सध्या या भागात सुरू आहे. कर्ले-कावळेवाडी व कावळेवाडी-बिजगर्णी रस्त्यांवर ठिकठिकाणी पडलेले खड्डे निदर्शनास येत आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना ये-जा करणे मुश्किल बनले आहे. रात्रीच्या वेळी खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे अनेक अपघातांच्या घटना घडलेल्या आहेत, अशी माहिती काही स्थानिक नागरिकांनी दिली आहे. पश्चिम भागातील वाहनधारकांसाठी हे दोन्ही रस्ते महत्त्वाचे आहेत. अनेक गावांना ये-जा करण्यासाठी या रस्त्यांचा संपर्क रस्ते म्हणून वाहनधारक उपयोग करतात. मग या रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का झाले आहे, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
बिजगर्णी, कावळेवाडी, कर्ले, जानेवाडी, बहाद्दरवाडी, नावगे, बेळवट्टी, बेळगुंदी भागातील वाहनधारकांची या संपर्क रस्त्यावर रोज वर्दळ असते. कर्ले शिवाराच्या बाजूला रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. तसेच कावळेवाडी गावाजवळील पुलानजीक रस्ता अत्यंत खराब झाला आहे. भलेमोठे खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांमध्ये सध्या पावसाचे पाणी साचलेले आहे. या ठिकाणचा रस्ताही उघडून गेला आहे. याचा वाहनधारकांना अधिक त्रास होत आहे. तसेच बिजगर्णी पुलाजवळ मोठा खड्ड पडलेला आहे. या खड्ड्यांच्या ठिकाणी 2019 साली अतिवृष्टीमुळे रस्त्यावर पाणी आले होते. त्यावेळी रस्त्याचा काही भाग बाजूला असलेल्या शिवारात वाहून गेला होता. सदर शेतकऱ्यांनी आपल्या शिवाराच्या बाजूवरील वाहून गेलेल्या रस्त्याच्या ठिकाणी माती टाकून तात्पुरती दुरुस्ती केली आहे. मात्र मुख्य रस्त्यावर मध्यभागीच भलामोठा खड्ड भरलेला आहे. स्थानिक ग्रामपंचायत सदस्य व पुढाऱ्यांनी या दोन्ही रस्त्यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती द्यावी व रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी या भागातील वाहनधारक व नागरिक करू लागले आहेत.









