खराब रस्त्यामुळे अपघाताच्या संख्येत वाढ
बेळगाव : वडगाव-यरमाळ रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत आहे. उर्वरित रस्ता पूर्णपणे खराब झाला असून याठिकाणी दररोज अपघात घडत आहेत. दुचाकी, चारचाकी वाहने रस्त्यावरून गेल्यानंतर खडी इतरत्र विखरून पडत आहेत. त्यामुळे उर्वरीत रस्त्याचेही डांबरीकरण जूनअखेरपर्यंत पूर्ण करावे, अशी मागणी वडगाव, यरमाळ, अवचारहट्टी, देवगनहट्टी परिसरातील नागरिकांमधून केले जात आहे. वडगावच्या विष्णू गल्ली कॉर्नरपासून यरमाळ गावापर्यंत संपर्क रस्ता जोडण्यात आला आहे. हा रस्ता पुढे केके कोपमार्गे राष्ट्रीय महामार्गाला जोडण्यात आल्याने दररोज शेकडो वाहनधारक या मार्गाने ये-जा करतात. दहा वर्षांपूर्वी तत्कालीन खासदार कै. सुरेश अंगडी यांच्या प्रयत्नांतून ग्रामसडक योजनेंतर्गत या रस्त्याचे काम करण्यात आले होते. या रस्त्यावरून खडी, वाळू, विटा यांच्या अवजड वाहनांची वाहतूक करण्यात आल्याने रस्ता लवकर खराब झाला. वडगाव बाळकृष्णनगरपासून ते येळ्ळूर कॉर्नरपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण महिनाभरापूर्वी करण्यात आले. तेथून अवचारहट्टी गावापर्यंत एक किलोमीटरचा रस्ता अद्याप डांबरीकरण होणे बाकी आहे. परंतु पुढील डांबरीकरणाचे काम बंद ठेवण्यात आले आहे. यासंदर्भात रस्ता करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विचारले असता, इथपर्यंतच रस्ता करण्याचे कंत्राट असल्याचे त्यांनी सांगितले. या एक किलोमीटरच्या रस्त्याची अक्षरश: दुर्दशा झाली आहे. रस्त्याची खडी वरती आली असून रात्रीच्यावेळी भरधाव येणारी वाहने खडीमध्ये अडकून अपघात होत आहेत. त्यामुळे जूनअखेरपर्यंत किमान अवचारहट्टी गावच्या कॉर्नरपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे.









