ग्रामपंचायतीकडे वारंवार अर्जविनंत्या करूनही दुर्लक्ष
वार्ताहर/येळ्ळूर
गेले वर्षभर पाठपुरावा करुनही पदरी काही न पडल्याने हनुमाननगर व चांगळेश्वरीनगरमधील रहिवाशांना रस्ते, गटार व पाणीसारख्या भौतिक सुविधा कधी मिळणार, अशी विचारणा होत आहे. यासाठी ग्रामपंचायतीकडे वारंवार, अर्जविनंत्या करुनही त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे रहिवाशांमध्ये नाराजी पसरली आहे. हनुमाननगर तसेच चांगळेश्वरीनगरमधून पुढे जाणारे रस्ते खड्ड्यांनी भरलेले असून वाहनधारकांना कसरत करत मार्ग काढावा लागतो. विराट गल्लीतून अनगोळमार्गे उद्यमबागमध्ये कामाला जाणाऱ्या कामगारांची संख्या लक्षणीय आहे. विराट गल्ली ते हनुमाननगरपर्यंतचा रस्ता पूर्ण उखडलेला असून डांबरीकरणाचे अस्तित्वच नाही. खड्ड्याशिवाय रस्ताच नसल्याने अनेकांनी सोयीसाठी लांबचा मार्ग पत्करला आहे. याच नागरातील काही भागात गटारींची सोयच नसल्याने सांडपाणी कोठे सोडावे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर काही ठिकाणी गटारीचे फक्त अस्तित्वच तेवढेच दिसते आहे.
ज्या ठिकाणी गटारी आहेत त्या जाळ्या व घाणीने भरलेल्या असल्याने पाण्याचा निचरा योग्यप्रकारे होत नाही. पावसाळ्यात हे पाणी सखल भागात साचून दलदल निर्माण होते. तर कांही पाणी भातशेतीमध्ये साठून पिकाचे नुकसान करते. तानाजी गल्लीमार्गे येणारे गटारीचे पाणी जवळपास अर्ध्या गल्ली व विराट गल्ली यांचे पाणी येवून मिळत असल्याने पाण्याचा प्रवाह मोठा होतो. पण हे पाणी पुढे वाहून नेण्यासाठी मोठी पक्की गटार नसल्याने हेच पाणी सखल भागात साचून दलदलीमुळे डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. याचा फटका हनुमाननगर व चांगळेश्वरीनगरातील रहिवाशांना बसतो. हनुमाननगर, चांगळेश्वरीनगर, मारुती गल्ली परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न वर्षभर सुटत नसल्याने या प्रभागातील सदस्य नेमके काय करतात? पाण्यासारख्या प्रश्नावर उठवलेला आवाज वर्षभर ग्रा.पं. सदस्यांना व अधिकाऱ्यांना ऐकू जात नाही काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे येऊ घातलेल्या निवडणुकीत मतदान करावे की नाही? सदस्यांना जर मतदानापुरतेच मतदान पाहिजे असतील आणि प्रभागातील समस्यांकडे पाठ फिरवित असतील तर मतदान तरी करून काय फायदा, अशी चर्चा सुरू आहे.









