अडगळीमध्ये काम करण्याची कर्मचाऱ्यांवर वेळ आल्यामुळे तीव्र नाराजी : नागरिकांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी
बेळगाव : सरकारी कार्यालयांचा कायापालट करून कर्मचाऱ्यांना अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जिल्ह्याचे केंद्र असणाऱ्या कार्यालयांचा कायापालट करण्यात आला आहे. मात्र येथील तहसीलदार कार्यालयाच्या भूमी विभागातील कर्मचाऱ्यांना अद्यापही जुन्या कार्यालयातच अडचणीच्या जागेमध्येच काम करावे लागत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
कर्मचाऱ्यांसाठी कोणत्याच स्वतंत्र व्यवस्था नसल्याने नाराजी
तहसीलदार कार्यालयाच्या व्याप्तीत येणाऱ्या भूमी विभाग कचेरी रोडवरील जुन्या तहसीलदार कार्यालयामध्येच कार्यरत आहे. ही इमारत अत्यंत जुनी असून अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. तर पावसाळ्यात गळती लागून भिंतींवर शेवाळ निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांना काम करावे लागत आहे. कार्यालयासाठी मुबलक प्रमाणात जागा असली तरी इमारत जुनीच असल्याने अडगळीचे ठिकाण ठरली आहे. भूमी विभाग असल्याने अनेक महत्त्वाची कागदपत्रे या कार्यालयामध्ये आहेत. सदर कागदपत्रांची व्यवस्थितपणे जपणूक करणे अत्यंत आवश्यक आहे. असे असतानाही कार्यालयातील व्यवस्थेकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांसाठी कोणत्याच स्वतंत्र व्यवस्था नसल्याने कार्यालयाला अडगळीचे स्वरुप आले आहे.
कार्यालयाचा कायापालट करण्याकडे दुर्लक्ष
भूमी विभागातून प्रशासनाला मोठ्या प्रमाणात महसूल उपलब्ध होत असला तरी कार्यालयाचा कायापालट करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. या ठिकाणी भूमी विभागातील आवश्यक कागदपत्रांसाठी येणाऱ्या नागरिकांची मोठी संख्या आहे. तसेच वेगवेगळ्या प्रमाणपत्रांसाठी अर्ज करण्याकरिता नाड कचेरी केंद्रेही याच ठिकाणी आहे. त्यामुळे या कार्यालयात नागरिकांची वर्दळ कायम असते. जुन्या तहसीलदार कार्यालयातील बहुतांश विभाग रिसालदार गल्ली येथील जुन्या महानगरपालिकेत स्थलांतरीत करण्यात आले आहे. केवळ भूमी विभाग जुन्या तहसीलदार कार्यालयात आहे. त्यामुळे शासनाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याची तक्रार कर्मचाऱ्यांतून केली जात आहे. सदर कार्यालयाचा कायापालट करण्यासाठी यापूर्वीच नियोजन करण्यात आले होते. मात्र त्यावर ठोस कारवाई झालेली नाही. जिल्हा प्रशासनाने भूमी विभागातील कर्मचाऱ्यांसह या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली जात आहे.









