रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य : वाहतुकीसाठी रस्ता बनला धोकादायक : प्रशासनाचे दुर्लक्ष : नागरिकांतून संताप
वार्ताहर/किणये
तालुक्याच्या पश्चिम भागातील कर्ले-बेळवट्टी संपर्क रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. रस्त्याचा बहुतांशी भाग उखडून गेला आहे. तसेच रस्त्याच्या बाजूने मोठमोठे भगदाड पडलेले आहेत. त्यामुळे वाहतुकीसाठी हा रस्ता धोकादायक बनला आहे. गेल्या दहा वर्षापासून या रस्त्याच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. बेळवट्टी ते कर्ले गावच्या संपर्क रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. खड्डेमय रस्त्यामुळे वाहनधारक व स्थानिक नागरिक अक्षरश: वैतागलेले आहेत. प्रशासनाकडून हा रस्ता बेदखल झाला आहे. या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी मुहूर्त कधी सापडणार, असा सवाल नागरिक करत आहेत.
कर्ले-बेळवट्टी संपर्क रस्ता या दोन्ही गावांसह जानेवाडी, नावगे, राकसकोप, बिजगर्णी, कावळेवाडी, इनाम बडस, सोनाली, येळेबैल, किणये, बहाद्दरवाडी या गावातील वाहनधारकांसाठी महत्त्वाचा रस्ता आहे. वाहनधारक अनेक गावांना जाण्यासाठी संपर्क रस्ता म्हणून या रस्त्यावरून ये-जा करीत असतात. मात्र सध्या रस्त्याची अवस्था पाहिल्यास बैलगाडी जाणेही मुश्किल बनले आहे. बेळवट्टी भागातील विद्यार्थ्यांनाही या रस्त्यावरून जावे लागते. मात्र विद्यार्थ्यांना बरीच कसरत करावी लागत असल्याची माहिती पालकांनी दिली आहे. कर्ले व बेळवट्टी या दोन्ही गावांच्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी या रस्त्याच्या आजूबाजूला आहेत.
त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शिवाराकडे रोज या रस्त्यावरून यावे लागते. जनावरांना ओला चारा घेऊन जाताना बरेच शेतकरी या खड्ड्यांच्या रस्त्यामध्ये पडून किरकोळ जखमी झालेले आहेत. 2019 साली अतिवृष्टी झाली. यावेळी रस्त्यावर पाणी आले होते. त्याचवेळी रस्त्याच्या बाजूला बऱ्याच ठिकाणी मोठमोठे भगदाड पडलेले आहेत. तेव्हापासून सदर भगदाड अद्यापही बुजविलेले नाहीत. हा रस्ता इतका दुर्लक्षित का झाला आहे? या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी आपण दाद मागायची कुणाकडे, असा सवालही सर्वसामान्य नागरिक करू लागले आहेत.
रस्ता दुरुस्त न झाल्यास मोर्चा
दहा वर्षापासून या संपर्क रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. शेतकरी, विद्यार्थ्यांसाठी हा रस्ता महत्त्वाचा आहे.कामगार वर्ग उद्यमबाग मच्छे औद्योगिक वसाहतींमध्ये जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर करतात. मात्र खड्ड्यांमुळे रात्रीच्या वेळी त्रास सहन करावा लागतो. वाहने खराब होत आहेत. रस्त्यासाठी निधी उपलब्ध होत नाही काय? संबंधित अधिकाऱ्यांनी रस्त्याचे डांबरीकरण त्वरित करावे. अन्यथा आम्ही मोर्चा काढू.
– कल्लाप्पा सुतार, बेळवट्टी










