उन्हाळा तोंडावर : हर घर नल से पाणी कधी येणार : काही गावांमध्ये योजनेकडे दुर्लक्ष
बेळगाव : ग्रामीण भागातील प्रत्येक घराला नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या जलजीवन मिशन योजनेचे काम कधी पूर्णत्वाकडे जाणार? असा प्रश्न पडू लागला आहे. या योजनेद्वारे प्रत्येक घराला नळाद्वारे पाणी देणे हा उद्देश आहे. मात्र काही ठिकाणी अद्याप योजनाच राबविली गेली नसल्याने येत्या उन्हाळ्यातही महिलांच्या डोक्यावर पुन्हा हंडाच घ्यावा लागणार आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. ग्रामीण भागातील कुटुंबाबरोबरच शाळा, अंगणवाडी, ग्राम पंचायत, आरोग्य केंद्र, समुदाय भवन, मंदिरे आणि इतर सार्वजनिक ठिकाणी या योजनेद्वारे पाणीपुरवठा करणे आवश्यक आहे. मात्र काही गावांमध्ये ही योजना अद्याप सुरू झालेली नाही.
काही ठिकाणी 80 टक्के योजना प्रगतीपथावर आहे. मात्र काही ठिकाणी अद्याप योजनेची अंमलबजावणी झालेली नाही. या महत्त्वाकांक्षी जलजीवन योजनेला 2019 पासून प्रारंभ झाला आहे. बहुतांशी गावांच्या योजना मंजूर झाल्या असून कामेही युद्धपातळीवर सुरू आहेत. मात्र काही ठिकाणी अद्याप या योजनेचा मुहूर्त मिळाला नाही. ग्रामीण भागातील पाणीटंचाई दूर करून शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी ही योजना राबविली गेली आहे. मात्र काही गावात उन्हाळा आला की, पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनतो. त्यामुळे शुद्ध पाणी नको साधे पाणी तरी उपलब्ध करा, असे म्हणण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.
काही गावांमध्ये उद्दिष्ट पूर्ण
जिल्ह्यातील काही गावांमध्ये हर घर नल से जल ही योजना राबवून घरोघरी नळ देण्यात आले आहेत. मात्र नळांना पाणीच नाही. अशी परिस्थिती पहावयास मिळत आहे. त्यामुळे घरासमोरील नळ पाण्याअभावी शोभेच्या वस्तू ठरू लागल्या आहेत. जिल्ह्यातील काही गावांमध्ये ही योजना पूर्णत्वाकडे आली आहे. शिवाय घरोघरी उपलब्ध करण्यात आलेल्या नळांना पाणीदेखील येऊ लागले आहे. त्यामुळे योजना ग्रामस्थांनाही दिलासा देणारी ठरली आहे. मात्र काही गावांमध्ये पाण्याचे स्त्राsत उपलब्ध नसल्याने घरोघरी बसविलेले नळ केवळ नावापुरतेच राहिले आहेत. पाण्याअभावी ही योजना रखडली असल्याचे चित्र दिसून येत आहे.
योजनेचे काम 70 टक्के पूर्ण
जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेचे काम 70 टक्के पूर्ण झाले आहे. काही ठिकाणी केवळ नळ बसविणे आणि जलवाहिनी घालण्याचे काम शिल्लक आहे. येत्या दोन-चार महिन्यांत सर्वत्र हे काम पूर्ण होणार आहे. शिवाय सर्व घरांना पाण्याचा पुरवठाही केला जाणार आहे.
– शशिकांत नाईक,(कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग)









