प्रतिनिधी /पणजी
गोवा सरकारचा प्रतिष्ठेचा गोमंत विभूषण पुरस्कार जो इ.स. 2021 चा द्यायचा आहे तो अद्याप दिलेला नाही आणि जाहीर देखील केलेला नाही. नेमका कशासाठी जाहीर करण्यात आला नाही हे कळण्यास मार्ग नाही.
या संदर्भात प्राप्त माहितीनुसार कला व संस्कृती संचालनालयाने गेल्यावर्षी सदर पुरस्कारासाठी संस्थांकडून नामांकन मागविले होते. संस्थांनी शिफ्ढारसी केलेली नावे कला व संस्कृती संचालनालयाकडे पोहोचली. त्यांनी वर्गीकरण केले व अंतिम निर्णयासाठी फ्ढाईल मंत्री गोविंद गावडे यांच्याकडे पाठविली. त्यांनी आपली प्रतिक्रीया लिहून अंतिम निर्णयासाठी फ्ढाईल मुख्यमंत्र्यांकडे पाठविली. आता ही फ्ढाईल मुख्यमंत्र्याकडेच कित्येक दिवस पडून आहे. अद्याप गोमंत विभूषण पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात येईल, हे जाहीर करण्यात आलेले नाही. नेमके कोणत्या कारणास्तव हा पुरस्कार जाहीर केलेला नाही हे कळत नाही.
आता इ.स. 2022 चे 6 महिने उलटले तो पर्यंत यावर्षीचा पुरस्कार जाहीर करण्याची वेळ आलेली आहे आणि अद्याप 2021 चा पुरस्कार जाहीर केला जात नाही. जोपर्यंत हा पुरस्कार दिला जात नाही तोपर्यंत इ.स. 2022 च्या पुरस्काराविषयी प्रक्रिया सुरू केली जात नाही. यापूर्वी ते रघुनाथ माशेलकर, डॉ. रामाणी, चार्ल्स कुरैय्या इत्यादींना मिळून सहा जणांना आतापर्यंत हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे.








