वनखात्याला प्रतीक्षा, कर्मचारी तळ ठोकून, शेतकऱ्यांना भीती
प्रतिनिधी/ बेळगाव
मागील सहा दिवसांपासून कर्नाटक-महाराष्ट्र सीमाहद्दीवर हत्ती स्थिरावला आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांबरोबर वनखात्याची झोप उडाली आहे. हा हत्ती डेंगर पायथ्याशी असलेल्या शिवारातील पिकांची नासधूस करून पुन्हा डोंगर क्षेत्रात विश्रांती घेत आहे. दरम्यान हत्तीला हुसकावून लावण्यात वन खात्याला अपयश आले आहे. त्यामुळे हत्तीचा मुक्काम दिवसेंदिवस वाढू लागला आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
चाळोबा गणेश नावाचा हा हत्ती मूळचा आजरा तालुक्यातील आहे. मात्र सध्या तो कळपातून बाहेर पडून सैरभैर झाला आहे. यापूर्वी राजगोळी परिसरात त्याने महिनाभर ठाण मांडले होते. त्यानंतर तो कामेवाडी, किटवाड मार्गे बेळगाव तालुक्यात दाखल झाला आहे. कर्नाटक-महाराष्ट्र सीमा हद्दीवरील डोंगर क्षेत्रात विसावला आहे. डोंगर पायथ्याशी असलेल्या शिवारातील रताळी, भुईमूग, ऊस आदी पिकांचे त्याने नुकसान केले आहे. शिवाय कृषीपंप पाईप आणि इतर शेती अवजारांचेही नुकसान झाले आहे.
दिवसा अंदर, रात्री बाहर
डोंगर क्षेत्रातून हत्ती बाहेर पडण्याची प्रतीक्षा वनखाते करीत आहे. मात्र हत्ती रात्रीच्यावेळी बाहेर येऊन पुन्हा दिवसभर डोंगर क्षेत्रात विश्रांती घेऊ लागला आहे. मागील सहा दिवसांपासून या छोट्याशा डोंगरात मुक्काम ठोकला आहे. त्यामुळे परिसरामध्ये धास्ती कायम आहे. शिवाय डोंगर पायथ्याशी शेती असलेल्या शेतकऱ्यांना भीतीच्या छायेखालीच वावरावे लागत आहे.
डोंगर क्षेत्रातून हत्ती बाहेर पडताच त्याला मूळ आधिवासाकडे हुसकावून लावण्यासाठी वन कर्मचारी तळ ठोकून आहेत. मात्र अद्याप हत्ती डोंगर क्षेत्राच्या बाहेर पडला नाही. केवळ खाण्यासाठी रात्रीच्यावेळीच बाहेर येऊ लागला आहे. त्यामुळे अद्याप हा हत्ती अजून किती दिवस या ठिकाणी राहणार याबाबत प्रश्न पडू लागला आहे.









