कोल्हापूर / अहिल्या परकाळे :
चित्रपट महामंडळाची निवडणूक सदस्य संख्येच्या वादावरून रखडली आहे. हा वाद मिटवून चित्रपट महामंडळाच्या हितासाठी समझोता करण्याचा निर्णय अध्यक्ष व उपाध्यक्षांनी घेतला. यासंदर्भात पुणे, मुंबई आणि कोल्हापुरात बैठका झाल्या. परंतू या बैठकांमध्ये नुसतीच कोरडी चर्चा झाली असून लेखी स्वरूपात कागदावर काहीच उतरलेले नाही. ऐवढेच काय पण या बैठकांमधील चर्चांमध्ये चित्रपट महामंडळाच्या हितासाठी एकत्र येवून निर्णय घेण्याचे ठरले. परंतू महिना उलटून गेला तरी पदाधिकाऱ्यांच्या चर्चेचे गुऱ्हाळ काही केल्या थांबेनासे झाले आहे. तसेच निर्णयाच्या अंमलबजावणी शून्य असल्याने चित्रपट महामंडळाचे कामकाज अद्याप ठप्पच आहे.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या विद्यमान संचालक मंडळातच गेल्या चार वर्षापासून वाद सुरू आहे. एकमेकांवर आरोप करीत अक्षरश: महामंडळाचे कार्यालयच बंद ठेवण्यात आले होते. हा वाद येवढा विकोपाला पोहचला असून, हायकोर्टातही एकमेकांच्या विरोधात याचिका दाखल करण्यापर्यंत संचालक मंडळ गेले आहे. अशा वादातच चित्रपट महामंडळाची निवडणूक प्रक्रिया जाहीर झाली, काहींनी उमेदवारी अर्जदेखील भरले. त्यानंतर सदस्य संख्येवरून पुन्हा निर्माण झालेला वाद विकोपाला पोहचला. धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडून निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे हा वाद कधी मिटणार की नाही? असा प्रश्न सदस्यांमधून उपस्थित केला जात आहे. हा वाद मिटवून निवडणूक प्रक्रिया त्वरीत पूर्ण करण्यासाठी चर्चा सुरू असली तरी अंमलबजावणी मात्र शून्य आहे. कोल्हापूर, मुंबई, पुणे आदी ठिकाणी बैठकांचा सिलसिला सुरू आहे. या बैठकांनाही संपूर्ण संचालक मंडळ उपस्थित राहात नसल्याने तोंडी चर्चांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होताना दिसत नाही. परिणामी कार्यालयीन कर्मचाऱ्यांना कित्येक महिन्यापासून वेतन मिळालेले नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना आपला घर–संसार कसा चालवायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. संचालक मंडळ मात्र बैठकांमध्येच अडकले असून कोणताच ठोस निर्णय अद्याप झालेला नाही.
चित्रपट महामंडांतर्गत अनेक चित्रपट, मालिकांची निर्मिती करून सदस्यांना रोजगाराच्या संधी मिळवून देणे हे मुख्य काम असते. परंतू सध्याच्या संचालक मंडळातील सदस्यांनी अंतर्गत वाद सुरू करून कलाकारांचे प्रश्न गेल्या कित्येक वर्षापासून जैसे थे आहेत. चित्रपट महामंडळ आणि सदस्यांच्या हितासाठी झालेल्या बैठका कुठेतरी फोल ठरतात की काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. कोल्हापुरात झालेल्या बैठकीमध्ये समझोता एक्सप्रेस झाल्याचे सांगण्यात आले. परंतू फक्त कर्मचाऱ्यांचे पगार आणि प्रलंबित असलेली कार्यालयीन कामकाजाला मंजूरी देण्यासाठीच ही बैठक होती, असा दावा काही संचालकांनी केला आहे. मग अध्यक्ष आणि उपाध्यक्ष महामंडळाच्या हितासाठी आम्ही एकत्र आल्याचे सांगतात ते काय खोटे आहे ?
- काही संचालकांना वाद मिटण्याची खात्री नाही
चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष व उपाध्यक्षांचा वाद मिटणार म्हंटल्यावर कलाकार सदस्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दुसरीकडे मात्र हा वाद मिटू नये यासाठी काही संचालक प्रयत्न करीत असल्याचे असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे बहुतांश संचालक व कलाकारांना हा वाद मिटेल याची खात्री नाही.
- बैठका संपवून त्वरित निवडणूक घेण्याचा प्रयत्न
चित्रपट महामंडळात राजकारण न करता चित्रपट महामंडळाच्या हितासाठी एकत्र येण्यासाठी बैठका सुरू आहेत. शासन दरबारी कलाकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे. तसेच चित्रपट महामंडळाच्या जुन्या सदस्यांना वाढीव पेन्शन देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. येत्या काही दिवसात बैठका संपवून चित्रपट महामंडळाची लवकरात लवकर निवडणूक घेण्याचा प्रयत्न करणार आहे.
धनाजी यमकर (उपाध्यक्ष, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ)








