खरीप हंगामात अतिवृष्टीने नुकसान : शेतकरी वर्ग भरपाई मिळण्याच्या प्रतीक्षेत
बेळगाव : संकटकाळात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी भरलेल्या पीक विम्यातून अद्याप शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही. त्यामुळे शेतकरी उदासीन आहेत. खरीप आणि रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे. मात्र, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली नाही. मागील खरीप हंगामातील पीक विमा भरपाई नोव्हेंबर महिन्यापर्यंत मिळायला हवी होती. मात्र, अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाईचा निधी आलेला नाही. अतिवृष्टी, दुष्काळ आणि इतर कारणांमुळे शेती पिकांना फटका बसतो. अशा परिस्थितीत पीक विमा आधार ठरतो. दरम्यान, कृषी खात्याकडून पीक विमा भरून घेतला जातो. संकटकाळात शेतकऱ्यांना भरपाई दिली जाते. यंदाच्या वर्षात पीक विम्याच्या माध्यमातून कोटी रुपये जमा झाले आहेत. मात्र, पीक विमा भरलेले शेतकरी अद्याप भरपाईपासून दूर आहेत. खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामातील भरपाईसाठी शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे. विशेषत: खरीप हंगामात ऊस, भात, सोयाबिन, ज्वारी आदी पिकांची पेरणी आणि लागवड केली जाते. पावसाळ्या दरम्यान या पिकांना अतिवृष्टीचा फटका बसतो. यासाठी संभाव्य धोका ओळखून शेतकऱ्यांनी विमा भरला आहे. दरम्यान, पावसाळ्यात नदीकाठावरील पिकांना फटका बसला होता. मात्र, अद्याप ही भरपाई मिळाली नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.









