कोकणातून जाणाऱया मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे दरवर्षी गणेशोत्सव जवळ आला की राजकीय पक्षांना दिसू लागतात. मग त्यासाठी इशारे, आंदोलने यांचे पेव फुटते. खासदार, आमदार मंत्र्यांबरोबर बैठका घेतात. मग ते खड्डे भरण्याच्या जोरदार चर्चा, चकाचक रस्त्याची आश्वासने, डेडलाईन्स, मंत्री दौरे … आणि ज्यासाठी आरडृओरडा ते खड्डे मात्र जैसे थे… गेल्या अनेक वर्षापासून गणेशोत्सव जवळ आला की हे सारे घडत जाते. यावर्षीचा गणेशोत्सव तरी याला अपवाद कसा ठरेल?
यावर्षी 31 ऑगस्टला गणेशोत्सवाचा प्रारंभ होत आहे. गेली दोन वर्षे कोरोना लॉकडाऊनमध्ये गेल्यानंतर मुंबई, पुणेकर चाकरमान्यांना आता गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोकणातील आपापल्या गावांची ओढ लागली आहे. कोकणात सार्वजनिक गणेशोत्सवापेक्षा घरगुती गणेशोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. कामानिमित्त मुंबईसह इतर शहरांत असणारे चाकरमानी गणेशोत्सवाला आवर्जून गावी येतात. देश-विदेशातूनही अनेकजण केवळ गणेशोत्सवासाठी आपल्या गावी येतात. कोरोनाचे संकट दूर झाल्याने यावर्षी अधिक उत्साहात गणेशोत्सव साजरा होणार हे निश्चित आहे.
यावर्षीच्या गणेशोत्सवाला कोकणात येणाऱया चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वेने गणपती स्पेशल गाडय़ा सोडल्या आहेत. या गाडय़ांचे आरक्षणही फुल्ल झाले आहे. जादा एस.टी. बसेस सोडण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर खाजगी बसेस व इतर खासगी वाहनांचेही आरक्षण झाले आहे. त्यामुळे यावर्षी गणेशोत्सवात लाखोंच्या संख्येने चाकरमानी मोठय़ा उत्साहात कोकणातील गाव-वाडय़ांत दाखल होणार आहेत. कोकणात कोकण रेल्वेनंतर सुरक्षित प्रवासाचा एकमेव पर्याय मुंबई-गोवा महामार्ग हाच आहे.
मात्र याच मुंबई-गोवा महामार्गाची रडकथा गेल्या बारा वर्षापासून सुरूच आहे. दरवर्षी गणेशोत्सवानिमित्ताने लाखे नागरिक मुंबई-गोवा मार्गे कोकणात येतात. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी होते. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा कोकणात जाण्यासाठी मोठी झुंबड उडाली आहे. रेल्वेचे तिकीट उपलब्ध होत नसून एसटी गाडय़ांचेही मोठय़ा प्रमाणात आरक्षण होत आहे. त्यामुळे खासगी प्रवासी बस किंवा वैयक्तिक वाहने घेऊन कोकणात जाणाऱयांचीही संख्या यावेळी अधिक असणार आहे. गणेशोत्सवात कोकणापर्यंतचा खडतर प्रवास सुकर करण्यासाठी महामार्ग पोलिसांनीही कंबर कसली आहे. सध्या मुंबई-गोवा महामार्गावर 24 क्षेत्रांत खड्डे आहेत. यापैकी वाकण पट्टय़ात सर्वाधिक म्हणजे आठ, महाड पट्टय़ात सात ठिकाणी रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणात खड्डे आहेत, तर पळस्पे, कशेडी, चिपळूण या पट्टय़ातही मोठय़ा प्रमाणात खड्डे आहेत. या पट्टय़ात वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न महामार्ग पोलिसांना करावा लागणार आहे.
मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण व्हावा असे प्रत्येक कोकणवासियांचे स्वप्न होते. मात्र केंद्र किंवा राज्य सरकारकडून 12 वर्षे उलटली तरी हा महामार्ग पूर्णत्वास गेलेला नाही ही वस्तूस्थिती आहे. गोव्याच्या हद्दीपासून लांजा तालुक्यातील वाकेडपर्यंतचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे, पण वाकेड ते पनवेलपर्यंतचा रस्ता पूर्णतः तशाच परिस्थितीमध्ये आहे. सुरू असलेल्या राज्याच्या पावसाळी अधिवेशनात कोकणातील आमदारांनी पोटतिडकीने या महामार्गाचा प्रश्न उपस्थित केला. एका आमदाराने तर महाड ते पनवेलपर्यंत सुमारे दोन तासांचे अंतर पार करण्यासाठी पाच तास लागल्याची वस्तूस्थिती सभागृहासमोर ज्याप्रकारे कथन केली ते पाहता महामार्गाची सद्यस्थिती समोर येत आहे.
सद्यस्थितीत काही शेतकऱयांना जागेचा मोबदला मिळालेला नाही, लवाद आणि न्यायालयाचे निर्णय प्रलंबित आहेत, असंख्य पुलांची कामे अर्धवट आहेत. या मार्गावरील पाईपलाईन, विजेच्या तारा टाकण्याचे काम अपूर्ण आहे. शिवाय चौपदरीकरणाचे सध्या झालेले कामही निकृष्ट असल्याच्या तक्रारी सुरू आहेत. कॉंक्रीटला तडे जाणे, रस्ते खचणे असे प्रकार आजही रत्नागिरी जिल्हय़ात सुरू आहेत. मंजूर झालेले पूल, अंडरपास मनासारखे नाहीत, त्यात बदल केले जात नाहीत म्हणून काही कामे अडवून ठेवण्यात आली आहेत. स्थानिक आमदार रखडलेल्या कामाबाबत कंत्राटदार कंपनीला कधी जाब विचारताना दिसत नाहीत. केंद्राचा प्रकल्प म्हणून हात वर केले जात आहेत. खासदार कधी महामार्ग कामाचा आढावाही घेताना दिसत नाहीत. तसे झाले असते तर महामार्ग केव्हाच पूर्ण झाला असता. मुंबई-गोवा महामार्गाच्या मागून मंजूर झालेला समृध्दी महामार्ग पूर्णत्वास जाऊ शकतो, तर मुंबई-गोवा महामार्ग का नाही, असा प्रश्न जनतेला पडला आहे.
महामार्गावरील परशुराम घाट गेल्या जुलै महिन्यापासून केवळ दिवसा आणि तोही अवजड वाहतुकीसाठी खुला आहे. मात्र त्याचेही कुणाला पडलेले नाही. स्थानिकांना तर फार मोठय़ा समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सध्या पावसाचा जोर कमी झाला आहे. गेल्या पावणेदोन महिन्यात दरड कोसळल्याची घटना घडलेली नाही. तेथे सुरक्षिततेच्यादृष्टीने 24 तास यंत्रणा कार्यरत आहे. मात्र घाट सुरू केला जात नाही. याचाही जाब कंत्राटदार अथवा प्रशासनाला विचारताना कुणी दिसत नाही. आता गणेशोत्सवापूर्वी घाट खुला केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र तो खरंच खुला होईल का, याबाबत साशंकता आहे. पावसाचा जोर वाढला तर घाट बंद करावा लागणार आहे आणि असे झाल्यास गणेशोत्सवातील वाहतुकीचे नियोजन करताना प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची त्रेधातिरपीट उडणार आहे. कारण घाटाचे पर्यायी मार्गही सुरळीत केले गेलेले नाहीत.
वर्षभर काहीसे शांत असलेले आमदार, खासदार दरवर्षी गणेशोत्सव जवळ आला की खड्डेप्रश्नी पावसाळी अधिवेशनात आवाज उठवतात. कधी कधी हिवाळी अधिवेशनातही लक्ष वेधतात. मात्र उर्वरीत काळात कोकणातील सारे आमदार, खासदार एकत्र येतात तसे चित्र गेल्या 12 वर्षात रखडलेल्या महामार्गाबाबत का दिसत नाही? पश्चिम महाराष्ट्रातील प्रश्न कोणताही असो, तेथे सारे लोकप्रतिनिधी एकत्र येतात तसे चित्र कोकणात फार अभावानेच दिसते आणि हीच कोकणची वेदना आहे. किंबहुना म्हणूनच कोकण मागे आहे असे म्हणावेसे वाटते.
दोन दिवसांपूर्वी कोकणातील आमदार, खासदारांची सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासमवेत बैठक झाली. यामध्ये 25 ऑगस्टपर्यंत या रस्त्यावरील सर्व खड्डे बुजवण्यात येणार असून 26 ऑगस्टला महामार्ग पाहणी दौरा करण्यात येणार आहे. अर्थात केवळ दोन दिवसात या वातावरण निर्मितीच्या पुढे जाऊन प्रत्यक्ष खड्डे भरण्याचे काम किती होणार याचा अनुभव कोकणी माणसाला असल्याने त्याने फारशा अपेक्षाच ठेवलेल्या नाहीत. चाकरमानीही खडय़ांतून प्रवासाच्या तयारीनेच प्रवास सुरु करणार आहेत. यावर्षीचा प्रवास खड्डय़ातून आदळत, आपटत झाला तरी किमान पुढील वर्षी चौपदरीकरण झालेल्या दर्जेदार महामार्गावर सुस्साट जाता येईल, एवढीच अपेक्षा कोकणी माणूस करतोय. त्याची ही तरी अपेक्षा पूर्ण होणार का, हे येणारा काळच सांगणार आहे!
राजेंद्र शिंदे








