अपशब्द प्रकरणाच्या चौकशीसाठी कायदेतज्ञांशी चर्चा
प्रतिनिधी/ बेळगाव
विधानपरिषद सदस्य सी. टी. रवी यांनी विधानपरिषदेच्या सभागृहात मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना अपशब्द वापरल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेले एफआयआर सीआयडीकडे पाठविण्यात आले आहेत. या प्रकरणी पुढील कायदेशीर सोपस्कार पूर्ण करण्यासाठी सीआयडीला सभागृहात पंचनामा करावा लागणार आहे. यासाठी परवानगी कुणाकडून घ्यायची, याविषयी तिढा वाढला आहे. त्यामुळे सीआयडीचे पथक बेळगावला कधी पोहोचणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी दि. 19 डिसेंबर रोजी सी. टी. रवी यांनी लक्ष्मी हेब्बाळकर यांना अपशब्द वापरल्याचा प्रकार घडला होता. त्याच दिवशी हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात एफआयआरही दाखल करण्यात आला होता. बेळगाव पोलिसांनी त्याच दिवशी सायंकाळी सी. टी. रवी यांना अटक करून बेळगाव, धारवाड, बागलकोट या तीन जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी रात्रभर फिरविले होते.
गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी हे प्रकरण सीआयडीकडे सोपविल्याचे जाहीर केले आहे. सी. टी. रवी यांच्यावर सुवर्ण विधानसौधच्या आवारात हल्ला केल्यासंबंधीही 22 डिसेंबर रोजी सरकारतर्फे एफआयआर दाखल करण्यात आला आहे. 10 अज्ञातांवर हिरेबागेवाडीचे पोलीस उपनिरीक्षक अविनाश ए. वाय. यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही प्रकरणांची चौकशी सीआयडीकडे सोपविण्यात आली आहे.
या प्रकरणांची चौकशी सीआयडीकडे सोपविल्याचे जाहीर केल्यानंतर हिरेबागेवाडी पोलिसांनी बेंगळूरला जाऊन दोन्ही प्रकरणांची कागदपत्रे सीआयडीकडे सोपविली आहेत. आता पुढील तपास सीआयडीलाच करावा लागणार आहे. पंचनामा करण्यासाठी विधानपरिषदेच्या सभापतींची परवानगी घ्यावी लागणार आहे. परवानगी कुणाकडे मागायची? याविषयी कायदेतज्ञांशी चर्चा करण्यात येत आहे.
सी. टी. रवी यांनी विधानपरिषदेच्या सभागृहात अपशब्द वापरल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. यासंबंधी दाखल झालेल्या एफआयआरवरून सभागृहात पंचनामा करावा लागणार आहे. तर दुसऱ्या प्रकरणात विधानसभेच्या इमारतीच्या आतच सी. टी. रवी यांच्यावर हल्ला झाला आहे. या प्रकरणाचा पंचनामा करण्यासाठी सभाध्यक्षांची परवानगी घ्यावी लागणार आहे. यासंबंधी अॅड. जनरल के. शशीकिरण शेट्टी यांच्याशी सीआयडीचे अधिकारी चर्चा करीत आहेत, अशी माहिती मिळाली आहे.









