बेंगळूर लोकायुक्तांकडे तक्रार : पथदीप सुरळीत करण्याची मागणी
बेळगाव : हिंडलगा-वेंगुर्ला रोडवरील पथदीपांचा प्रश्न संपता संपत नाही. वारंवार निवेदने व तक्रारी देऊनदेखील याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. आता याबाबतची तक्रार बेंगळूर लोकायुक्तांकडे करण्यात आली आहे. आतातरी गांभीर्याने घेणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, येथील पथदीप बंद असल्याने अपघाताच्या संख्येत वाढ होत आहे. परिणामी याचा फटका नागरिकांना सहन करावा लागत असून पथदीप तातडीने सुरू करावेत, अशी मागणी होत आहे.
याठिकाणी अपघात घडण्याचे प्रकार वारंवार होत आहेत. या रस्त्यावरील पथदीप बंद असल्याने एका कारने दुभाजकाला ठोकरल्याचा प्रकार घडला होता. मध्यंतरी हे पथदीप सुरळीत सुरू होते. आता काही महिन्यांनंतर ते पुन्हा बंद पडले आहेत. आताही ग्राम पंचायतीला याबाबत सांगण्यात आले आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. हिंडलगा कारागृहासमोरच एका कारने दुभाजकाला ठोकर दिल्याची घटना नुकतीच घडली असली तरी याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी आता याची तक्रार बेंगळूर येथील लोकायुक्त कार्यालयात करण्यात आली आहे. आरटीआय कार्यकर्ते नागेश माने यांनी ही तक्रार केली.
बेळगाव-वेंगुर्ला रोडवर अपघात घडण्याचे प्रकार नित्याचेच आहेत. हिंडलगा जेलसमोरील पथदीपांची देखभाल करण्यासाठी ग्राम पंचायतीकडे जबाबदारी देण्यात आली आहे. काही महिने हे पथदीप सुरळीत सुरू होते. त्यानंतर यातील काही पथदीप बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे याकडे आता गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. दरम्यान पीडिओंनी याकडे साफ दुर्लक्ष केल्याचा ठपकाही तक्रारीत करण्यात आला आहे. अधिकारी किंवा कोणीही ग्राम पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष असो नागरिकांच्या सेवेसाठी येथील पथदीप बसवावेत, अशी मागणी होत आहे. आता लोकायुक्त काय आदेश बजावणार, याकडे लक्ष लागून आहे.









