नवीन सीईओंनी लक्ष देण्याची आवश्यकता : तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याने नागरिकांमधून संताप
बेळगाव : कॅन्टोन्मेंट परिसरातील कचऱ्याच्या समस्येने नागरिक हैराण झाले आहेत. नवीन सीईओ बेळगावमध्ये येऊन 15 दिवस उलटले तरी कचऱ्याबाबत ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत. त्यामुळे कॅम्प परिसरात ठिकठिकाणी साचलेला कचरा दृष्टीस पडतो. नागरिकांनी तक्रार करून देखील त्याची दखल घेतली जात नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डला मागील काही महिन्यांपासून कायमस्वरुपी सीईओ नसल्याने अनागोंदी कारभार सुरू होता. कचऱ्याची उचल वेळच्यावेळी होत नसल्याने सर्वत्र ढीग साचत आहेत. फिश मार्केट परिसर, हॅवलॉक रोड, चंदगड बस स्टॉप, कॅन्टोन्मेंट बसस्थानक या परिसरात कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. कचरा उचल होत नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
अधिकाऱ्यांचा वचक नसल्यामुळे कचऱ्यामध्ये वाढ
नवीन सीईओंनी कॅन्टोन्मेंट परिसराला भेट देऊन कचऱ्याचे व्यवस्थापन पाहणे गरजेचे आहे. कॅन्टोन्मेंटमध्ये कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर स्वरुप धारण करत आहे. अधिकाऱ्यांचा वचक नसल्यामुळे कचऱ्यामध्ये वाढ होत असल्याच्या प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत. त्यामुळे नवीन सीईओंनी तरी कचऱ्याच्या समस्येमध्ये लक्ष घालून योग्य व्यवस्थापन करावे व कचरामुक्त कॅन्टोन्मेंट ही संकल्पना राबवावी, अशी मागणी केली जात आहे.









