कोल्हापूर / दीपक जाधव :
शेती उत्पन्न बाजार समितीच्या मालकीचे असलेले शाहू सांस्कृतिक मंदिर गेल्या अडीच वर्षांपासून बंद असून दिवसाकाठी लाखो रुपये उत्पन्न भाड्याच्या रुपाने देणारे सांस्कृतिक मंदिराची सध्या दुरावस्था झाली असून,स्ट्रक्चरल ऑडिटच्या अहवाला नुसार ते वापरण्यास अयोग्य असल्याचे सांगण्यात आले असून जो पर्यंत ही वास्तु खाजगी संस्था चालवत होती तोपर्यंत चांगली होती आता करार संपल्या नंतर इमारत वापरण्यास अयोग्य कशी झाली?
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीला उत्पन्न मिळवून देणारी महत्त्वाची वास्तू असूनही एवढी अनास्था का आहे हे समजू शकत नाही. काही महिन्यांपूर्वी केशवराव भोसले नाट्यागृहाला आग लागल्याने कोल्हापुरात मोठे सांस्कृतिक सभागृह नसल्याने नाट्यारसिकाच्यात नाराजी असून सध्य स्थितीत जर का हे सभागृह चालु असते तर गैरसोय दुर झाली असती व बाजार समितीला उत्पन्न मिळाले असते. कोल्हापूर शहरात 1 हजार लोकांची क्षमता असणारे हे ऐकमेव सभागृह होते,पण त्याची अवस्था खूपच वाईट झाली आहे. शहराच्या प्रवेशद्वारावरील मोक्याच्या ठिकाणी बंद अवस्थेत असलेले शाहु सांस्कृतिक मंदिर भग्नावस्थेत पाहून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
- दृष्टीक्षेपात सांस्कृतिक मंदिर
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीने सन 1974 मध्ये 2 एकर जागेत सांस्कृतिक सभागृहा बरोबर आखाडा उभा करण्यास सुरुवात केली होती. बाधकाम होऊन प्रत्यक्षात मे 1979 मध्ये त्याचे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री व जेष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते तर सहकार मंत्री स्व. एन.डी.पाटील व कृषी राज्यमंत्री स्व. श्रीपतराव बोंद्रे यांच्या उपस्थित झाले होते.
ही वास्तु उभारत असताना नेटके नियोजन करून वास्तू उभारली होती. त्यानंतर साधारणता वीस वर्षे समितीने स्वता चालवून त्यातून चांगले उत्पन्न मिळविले. कालांतराने 2001 मध्ये खाजगी ‘पंचरत्न‘ या फर्मला वार्षिक एक लाख भाड्याने दिले. त्यात दर तीन वर्षांनी मूळ भाड्यात 15 टक्के वाढ करण्याचा करार झाला होता.‘पंचरत्न‘ ने समिती कडून घेतल्यानंतर थोडीफार डागडुजी करून ही वास्तु तब्बल 21 वर्षे वापरल्या नंतर ऑक्टोबर 2022 मध्ये त्यांची मुदत संपल्याने समितीने ताब्यात घेतले तेव्हापासून ते बंदच अवस्थेत आहे.
- झाडा झुडपाने व्यापले
सध्या शाहू सांस्कृतिक मंदिराच्या इमारतीवर झाडे – झुडपे वाढली असून पुर्ण वास्तु बाहेरील झाडांच्या फांद्यानी झाकोळून गेली आहे.
- मंदिर कमकुवत झाले कसे?
शाहू सांस्कृतिक मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर लगेच 1984 ला वालचंद इंजिनिअरिंग महाविद्यालयातील तज्ञ कमिटी कडून ऑडिट करून घेण्यात आले होते.त्यावेळेस बाल्कनीत वाळूची भरलेली पोती ठेऊन क्षमता तपासण्यात आली. त्यावेळे वापरलेले साहित्य व त्याची मजबुती पाहून या वास्तु ला किमान शंभर वर्षे काही होणार नसल्याचे सांगण्यात आले होते, मग 50 वर्षांच्या आतच ही वास्तु वापरण्यास अयोग्य कशी झाली? हा प्रश्न पडतो आहे.
सध्या शाहू सांस्कृतिक मंदिर हे बंद असून ते आहे त्या स्थितीत त्याची डागडुजी करुन चालु करण्याचा आमचा प्रयत्न असून तशी तज्ञ व्यक्ती च्या बरोबर चर्चा सुरु आहे.
प्रकाश देसाई.
सभापती,शेती उत्पन्न बाजार समिती,कोल्हापूर.








