उत्पल पर्रीकर यांचा सवाल ; पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण व्हावीत
पणजी : राजधानी पणजीतील नागरिक तसेच रोज पणजीत ये-जा करणाऱ्या लोकांना गेल्या अनेक महिन्यांपासून मातीची होळी झेलावी लागत असल्याची टीका उत्पल पर्रीकर यांनी केली आहे. आता रंगपंचमीच्या निमित्ताने एका दिवसापुरते खरे रंग खेळायला मिळाले असले तरी पुन्हा काही महिने पणजीत मातीचे रंग खेळावे लागणार असल्याचे टोमणे पर्रीकर यांनी मारले आहेत. पुढील वर्षीच्या रंगपंचमीपूर्वी या मातीच्या रंगातून जनतेची सुटका होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.
पणजीत सध्या स्मार्ट सिटीच्या विविध कामांमुळे मातीचे साम्राज्य पसरले असून त्यातून जनतेची सुटका कधी होणार? हा प्रश्न असल्याचे पर्रीकर यांनी बोलून दाखवले. गेल्या अनेक महिन्यांपासून ती कामे चालू असून लवकर संपण्याची कोणतीही लक्षणे सध्या तरी दिसत नाहीत. निदान पावसाळ्यापूर्वी ती सर्व कामे पूर्ण होणे गरजेचे आहे. म्हणून त्या कामांना उशीर करू नका. ती प्रलंबित ठेवू नका, नाहीतर पावसाळ्यात पणजी चिखलमय होऊन त्याचा त्रास जनतेला होणार याकडे पर्रीकर यांनी लक्ष वेधले आहे. जी 20 परिषदेच्या बैठकांमुळे कामे बंद करू नका, त्या बैठकीस येणाऱ्यांना पर्यायी मार्ग शोधा व तेथील कामे प्रथम पूर्ण व पूर्ववत करा. इतर मार्गातील कामे चालू ठेवण्यास हरकत नाही, परंतु ती पावसाळ्यापूर्वी पूर्ण झाली पाहिजेत. पावसात ती कामे प्रलंबित राहिली तर पणजीची अवस्था बिकट होईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.









