नागरिकांचे हेलपाटे : त्वरित नेमणुकीची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
हेस्कॉममध्ये अनेक पदे रिक्त असून इतर अधिकाऱ्यांकडे प्रभारी म्हणून पद्भार दिला आहे. याचा परिणाम दैनंदिन कामकाजावर होत असून नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. एकाच अधिकाऱ्यांकडे सध्या दोन पदांची जबाबदारी दिल्याने हेस्कॉममधील सावळा गोंधळ समोर येत आहे. नागरिकांच्या सोयीसाठी अधिकाऱ्यांची लवकरात लवकर नेमणूक करावी, अशी मागणी केली जात आहे.
हेस्कॉमचे शहर कार्यकारी अभियंता एम. टी. अप्पण्णावर महिनाभरापासून रजेवर आहेत. त्यामुळे शहराची जबाबदारी साहाय्यक कार्यकारी अभियंता विनोद करुर यांच्याकडे सोपविली आहे. त्यातच शहर उपविभाग-1 चे साहाय्यक कार्यकारी अभियंता राजेंद्र वाघफाटे हे मे अखेरीला निवृत्त झाले. त्यामुळे त्यांचाही कार्यभार करुर यांच्याकडे सोपविला आहे. त्यामुळे एकाच अधिकाऱ्याला शहरासह दोन विभाग सांभाळावे लागत आहेत.
नवीन व टेम्पररी कनेक्शनसह इतर कामांकरिता साहाय्यक कार्यकारी अभियंता कार्यालयात उपस्थित असणे महत्त्वाचे असते. त्यांच्या सहीकरिता नागरिकांना कार्यालयापर्यंत यावे लागते. परंतु, सध्या अधिकारीच नसल्याने नागरिकांना कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. सर्वसामान्य नागरिकांना कार्यालयीन कामकाजाविषयी तितकीशी माहिती नसल्याने एका कामासाठी पंधरा ते वीस दिवस लागत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
कर्मचारी भरती कधी?
हेस्कॉमच्या शहर विभागामध्ये मागील अनेक दिवसांपासून पदे रिक्त आहेत. रिक्त पदांवर नेमणूक होत नसल्याने इतरांकडे पदभार दिला आहे. बऱ्याच विभागांमध्ये सेक्शन ऑफिसर नसल्याने इतर कर्मचाऱ्यांना काम ओढून घेऊन जावे लागते. लाईनमन, ज्युनिअर इंजिनिअर यांचीही संख्या कमी असल्यामुळे नवीन कर्मचारी भरती केव्हा होणार, असा प्रश्न पडत आहे.