सुवर्णमहोत्सवीनंतर दुध संकलन दिवसाला 50 हजार पुढे सरकेना : गोवा डेअरीची सहकार भवनात आज आमसभा ,14 सोसायटय़ा पुरवितात दिवसाला 1 हजाराहून अधिक दुध,23 सोसायटय़ाचे दिवसाला 50 लिटरपेक्षा कमी दुध
प्रतिनिधी /फोंडा
गोवा राज्य सहकारी दुध उत्पादक संघ म्हणजे गोवा डेअरीची बऱयाच अवधीनंतर आज बुधवारी 27 रोजी कुर्टी येथील सहकार भवनात आमसभा होणार आहे. गोवा डेअरीच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीचे पडघम वाजणार असून त्यात एकूण 173 सोसायटीचे अध्यक्ष हक्क बजावणार आहेत. मात्र गोवा डेअरीची वाटचाल बघता दुध उत्पादकांकडून साधारण दिवसाकाठी 54 हजार लिटर दुध पुरवठा गोवा डेअरीला होत आहे. वर्षाकाठी फक्त दोन कोटी लिटर दुध संचलित करण्यापुरती गोवा डेअरी स्वयंपुर्ण झालेली आहे.
राज्यात दिवसाकाठी ग्राहकांची सुमारे 3 लाख लिटर दुधाची मागणी आहे. गोवा डेअरीने सुवर्णमहोत्सवी साजरी केली तरी दिवसाकाठी 1 लाख लिटर दुध संकलन करणे गोवा डेअरीला जमलेले नाही. गोवा डेअरी ही राज्यातील साडेचार हजार दुध उत्पादकांची शिखर संस्था आहे. खेडोपाडय़ातील सामान्य दुध उत्पादक हा संस्थेचा कणा आहे. मात्र फक्त दुध उत्पादकांचे प्रतिनिधीत्व करणारे 178 सोसायटय़ाचे अध्यक्षावर संचालक मंडळाची निवडणूकीचे भविष्य अवलंबून असते.
गोवा डेअरीसाठी दिवसाला 1 लाख लिटर दुध संकलन अशक्यप्राय
निवडणूकीत सहभागी होण्यासाठी दुधपुरवठय़ाचे निकष ठेवणे जरूरीचे आहे. सोसायटीकडून किती दुध पुरवठा होतो याचे कुणालाच पडून गेलेले नाही. दिवसाकाठी चार लिटर दुध गोवा डेअरीला पुरविणाऱयाला सोसायटीला निवडणूकीत सहभागी होता येते मात्र शंभर लिटर दुध पुरविणाऱयाला तो हक्क मिळत नाही. जोपर्यंत साडे हजार दुध उत्पादकांना डेअरीचे संचालक मंडळ निवडण्याचा अधिकार प्राप्त होत नाही तोपर्यंत दिवसाकाठी 1 लाख लिटर दुध शक्य नसल्याचे काही खेडोपाडय़ातील दुध उत्पादकांनी प्रतिक्रीया दिल्या आहेत. सामान्य दुध उत्पादकाला सवलती, अनुदाने. सोयीसुविधा, त्याच्या उद्योगाला पशुसंवर्धन खात्याकडून जोपर्यंत प्रोत्साहन मिळत नाही तोपर्यंत गोवेकरांना दुधाची तहान शेजारील राज्यातील दुधावरच भागवावी लागणार आहे.
दिवसाकाठी 1 हजारहून जास्त दुध पुरवठा करणाऱया फक्त 14 सोसायटय़ा
एप्रिल 2020 ते मार्च 2021 पर्यंत गोवा डेअरीला सरासरी दिवासाकाठी 2179 लिटर दुध पुरवठा कासारपाल येथील नंदीनी दुध सहकारी संस्थेने केला आहे. संस्थेने वर्षाकाठी 795434 लिटर दुध पुरवठा गोवा डेअरीला केलेला आहे. द्वितीय स्थानी सत्तरी सहकारी दुध संस्था 2162 लिटर, तृतीय स्थानी मल्लिकार्जुन दुध संस्था भाटीतर्फे दिवसाकाठी 1761 लिटर दुध पुरवठा करीत आहे. अन्य दिवसाकाठी एक हजार लिटर दुध पुरवठा करणाऱयामध्ये सातेरी दुध संस्था हंसापूर, नेत्रावळी दुध संस्था, सातेरी इब्रामपूर, अभिनव डिचोली, सेरावलीम दुध संस्था, गोवर्धन भूईपाल, पिर्ण सहकारी, श्री येदाकेन देवी खोतीगाव, भूमिका सहकारी साळ, सिद्धनाथ सहकारी विलीयन, चंद्रेश्वर सहकारी विचुंद्रे या सोसायटीकडून सुमारे दिवसाकाठी हजार लिटर दुध पुरवठा करण्यात येत आहे. तसेच दिवसाला 50 लिटरहून कमी दुध पुरवठा करणाऱया 23 संस्था आहेत. त्यामध्ये नाममात्र 4 लिटर दुध पुरवठा प्रति दिवस करीत एका संस्थेने निच्चाक साधलेला आहे.
गोवा डेअरीचे दुध संकलन 50-60 हजार लिटरपुरते
राज्यातील ग्राहकांसाठी सुमारे 3 लाख लिटर प्रति दिवस दुध पुरवठयाची मागणी आहे. मात्र आजपर्यत सुमारे 1 लाख लिटर दुध पुरवठा करण्यात गोवा डेअरीला अजुनपर्यंत शक्य झालेले नाही. गोवा डेअरीला राज्यातील दुध उत्पादकाकडून सुमारे दिवसाकाठी 54 हजार लिटर दुध पुरवठा होत आहे. या परिस्थितीबाबत गोवा डेअरी अजून गंभीर नाही. युवा दुध उत्पादक या व्यवसायात येऊ पाहत नाही. त्यामुळे सांघिक तत्वावर गोपालन करून दुध पुरवठा वाढविण्याकडे भविष्यात वेळ येणार आहे. काही स्थानिक दुध उत्पादक सुमुल डेअरीकडे वळलेले आहे. त्यामुळेचे गोवा डेअरीच्या दुध पुरवठय़ात घट होत आहे. मागील महिन्याभरापासून हाय फॅट दुध पिशवी बाजारातून गायब झालेली आहे. या सर्व बाबीवर गोवा डेअरील मात करून गरूडभरारी घेण्यासाठी पशुसंवर्धन खात्य़ाच्या सहकार्याने युवा दुध उत्पादकाना प्रोत्साहीत करावे लागेल. तसेच गोवा डेअरी जोपर्यंत आपल्या सर्व शेतकऱयांना मतदानाचा हक्क देत नाही तोपर्यंत दिवसाकाठी एक लाख लिटर दुध पुरवठा होणे मुष्किल असल्याची प्रतिक्रीया काही शेतकऱयांनी वारंवार दिलेली आहे. त्यामुळे सामान्य शेतकऱयांना गोवा डेअरीवर कोण प्रतिनिधीत्व करतो याचे कोणतेचे सोयरसुतक नसून त्याला आपला व्यवसाय कसा शाबूत ठेवावा हीच मोठी चिंता सतावत आहे. गोवा डेअरीच्या दुधाला सर्वाधिक मागणी असूनही आजपर्यंत ग्राहकांच्या मागणीचा पुरवठा करण्यात गोवा डेअरी सपशेल अपयशी ठरलेली आहे. याबाबत आमसभेतून विचार होणेही गरजेचे आहे.
गोवा डेअरीचा दुध पुरवठा घटतोय, हाय फॅट दुध मिळेना
गोवा डेअरीच्या हाय फॅट दुध पिशव्या महिन्याभरापासून बाजारात उपलब्ध होत नाही. त्यामुळे गोवा डेअरीच्या दुधावर अवलंबून राहणाऱयांनी अमूल व इतर ब्रॅन्डच्या हायफॅट दुधाचा पर्याय स्वीकारण्यास सुरूवात केली असून गोवा डेअरीच्या दुधविक्रीवरही परिणाम जाणवू लागला आहे. दिवसाकाठी गोवा डेअरीच्या सुमारे 8000 लिटर हायफॅट दुधाला बाजरात मागणी आहे. राज्यातील दुधाची आवक कमी झाल्याने ही परिस्थिती उद्भवलेली असल्याचे गोवा डेअरीतर्फे सांगण्यात येते. गोवा डेअरीच्या वाढती मागणी असताना दुध संकलन वाढविण्यावर भर का दिला जात नाही हेच नेमके मोठे कोडे आहे. दरवेळी दुधासाठी शेजारील राज्यावर अवलंबून राहण्यापेक्षा दुध पुरवठय़ात गोवा स्वयंपुर्ण होणे गरजेचे आहे तेव्हाच गोव्यातील दुध उत्पादकांनाही सुगीचे दिवस येईल.









