कोल्हापूर :
छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रूग्णालयातील (सीपीआर) अतिक्रमण व पार्कींगचा प्रश्न गेली कित्येक वर्षे भेडसावत आहे. तशी मागणीही रूग्ण व नातेवाईकांतून वारंवार केली जात आहे. न्यालयाचा आदेश मिळूनही राजकीय संघटनांचा दबाव, प्रशासनाची उदासिनता, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आदी कारणामुळे अतिक्रमाणाचा प्रश्न जैसेथे स्थितीत आहे. त्यामुळे सीपीआर परिसर अतिक्रमण व पार्कींगमुक्त होऊन मोकळा श्वास घेणार कधी..? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मागील आठवड्यात एका कार्यक्रमात वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी सीपीआरमधील अतिक्रमण काढा अशा सुचना दिल्या. न्यायालयाचे आदेश असताना कारवाई का केली नाही असा प्रश्न उपस्थित करत सीपीआर अधिष्ठातांना सुनावलेही. मात्र, आठ दिवसाचा कालावधी लोटला तरी मुश्रीफ यांनी घेतलेली भुमिका व दिलेल्या सुचनांचं काय झालं? असा प्रश्न आता नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. सीपीआर प्रशासनाकडून कारवाई करायची म्हंटले की, राजकीय संघटना आडव्या येऊन दबाव टाकत असल्याचे सांगितले जाते. संघटनांच्या दबावामुळे कारवाईस अडथळा येत असेल तर लोकप्रतिनिधींनी टोकाची भुमिका घेण्याची गरज आहे. लोकप्रतिनिधींनी प्रशासनाच्या बाजूने ठामपणे उभे राहत पाठबळ दिल्यास अतिक्रण काढण्याचा मार्ग नक्कीच सुकर होईल, अशी आशा आहे. …अन्यथा मंत्री मुश्रीफ यांनी दिलेल्या सुचना हवेत विरळ होऊन अतिक्रमण व पार्कींगचा प्रश्न तसाच लेंबकळतच राहील, अशी भिती व्यक्त केली जात आहे.
सीपीआरचा श्वास कोंडतोय
सीपीआरमध्ये रोज 1 हजार ते 1500 रूग्ण उपचारासाठी येतात. त्यांच्यासोबत नातेवाईकांची संख्याही अधिक असते. नातेवाईकांच्या दुचाकी, चारचकी वाहने येथेच पार्कींग केले जातात. येथील वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी, निवासी डॉक्टर, प्राध्यापक, कर्मचारी वर्ग, नर्सिंग स्टाफ, स्वच्छता कर्मचारी आदोची हजारो वाहने असतात. बेशिस्त पार्कींग त्यासोबतच झालेली अतिक्रमणे यामुळे सीपीआरचा श्वास कोंडतोय.
टपऱ्यांना परवानगी नाहीच…
सीपीआर आवारात चहा, नाष्टा, खाद्यपदार्थांसह विविध वस्तूंच्या स्टॉल उभारण्यासाठी प्रशासनाकडून कोणतीही परवानगी दिली जात नाही. परवानगी नसतानाही टपऱ्या सुरू केल्या जात आहेत. कारवाई करताना मात्र, प्रशासनावरच दबाव टाकला जात आहे. त्यामुळे प्रशासनाची कोंडी झाली आहे.
पुढील आठवड्यात नोटिस बजावणार
दोन वर्षापुर्वी अतिक्रमण काढण्याचे न्यायालयाने आदेश दिले होते. मात्र त्याला 1 महिन्याची स्थगिती मिळाली होती. स्थगितीची मुदत संपली असुन न्यायालयाकडून अतिक्रमण काढण्याच्या आदेशाची प्रत प्राप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आदेशाची प्रत मिळताच अतिक्रमण करणाऱ्यांना नोटीशी बजावणार असल्याचे सीपीआर प्रशासनाने सांगितले.
पुढील काही दिवसात प्रशासनाशी चर्चा करून कारवाई
सीपीआर परिसरातील अतिक्रमण काढण्यासाठी न्यालयाने आदेश दिले आहेत. पुढील काही दिवसात जिल्हा प्रशासनाशी चर्चा करून कारवाईची प्रक्रिया राबवली जाणार आहे. अतिक्रमणासह पार्कींगलाही शिस्त लावण्याचे नियोजन सुरू आहे.
डॉ. सत्यवान मोरे, अधिष्ठाता, सीपीआर








