भाविकांची आर्त हाक : हुन्नुरातील पुरातन विठ्ठल मंदिर पुन्हा पाण्याखाली
संकेश्वर : सन 1928 साली बांधलेले हुन्नूर गावचे ग्रामदैवत श्री विठ्ठल मंदिर बुधवार दि. 19 रोजी पुन्हा पाण्याखाली गेले आहे. या विठ्ठल मंदिराचे गत दोन महिन्यांत कर्नाटक व महाराष्ट्रातून लाखो भाविकांनी दर्शन घेतले. दोन दिवसांपासून सातत्याने कोसळणाऱ्या पावसाने हिडकल जलाशयाच्या हुन्नूर येथील पाणलोट क्षेत्रात पाणी पसरल्याने मंदिर पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे दर्शनाची आस लागून राहिलेल्या भाविकांनी अखेर कळसाचे दर्शन घेत ‘बा विठ्ठला’ आता दर्शन कधी होणार, अशी आर्त हाक देवाला घातल्याचे दिसून आले. मंदिर आवारात यमकनमर्डी पोलिसांच्यावतीने कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
हिडकल जलाशयाच्या मागील बाजूच्या पाणीपात्रातील जागेत प्राचीन विठ्ठल मंदिर आहे. हुन्नूर गावचे हे ग्रामदैवत आहे. जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रातील मध्यभागी हुन्नूर गाव आल्याने ग्रामस्थांचे दुसऱ्या ठिकाणी पुनर्वसन करून हा भाग पाणलोट क्षेत्रात सामावून घेण्यात आला. मात्र मंदिर जैसे थे ठेवण्यात आले. मंदिराचे बांधकाम दगडाने घडविण्यात आल्यामुळे सुमारे 95 वर्षे हे मंदिर पाण्याखाली असूनही मंदिराला कोणताही धक्का बसलेला नाही किंवा पडझडही झालेली नाही. त्यामुळे या मंदिराचे महत्त्व अगाध आहे. 1928 नंतर 49 वर्षांनी या मंदिराचे भाविकांना दर्शन मिळाले. त्यानंतर मे 2023 म्हणजेच 46 वर्षांनी हे मंदिर पाणी ओसरल्यानंतर दर्शनासाठी खुले झाले. हे मंदिर दर्शनासाठी खुले झाल्याची माहिती समजताच भाविकांसह पर्यटकही दर्शनासाठी मोठी गर्दी करीत होते. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून पर्यटकांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे रांगेत राहून विठुरायाचे दर्शन घ्यावे लागले. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता. मंगळवार सायंकाळपर्यंत भाविकांनी मंदिराकडे गर्दी केली होती. मध्यरात्रीपासून पाणीपातळीत झालेली वाढ व बुधवारी दुपारी मंदिर पाण्याखाली गेल्यामुळे भाविकांना याठिकाणी जाण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे.









