आमदार व्हेंझी व्हियेगस यांचा सवाल
मडगाव : मंगळवारी पहाटे कोलवा येथून येणाऱ्या एका कारला मुंगूल-माडेल परिसरात रोखून दांडे, तलवार आणि कोयत्याने हल्ला करण्याचा प्रकार घडला. तसेच गोळीबार करण्याची घटना घडली. या प्रकारामुळे कोलवा येथील तो क्लब पुन्हा चर्चेत आला असून या क्लबवर कधी कारवाई होणार असा सवाल बाणावलीचे आमदार व्हेंन्झी व्हियेगस यांनी उपस्थित केला आहे. रात्री-अपरात्री पर्यंत चालणाऱ्या या क्लबमध्ये गुंडगिरीला वाव मिळत असल्याचा आरोप आमदार व्हेंन्झी व्हियेगस यांनी केला असून या क्लबचा मुद्दा आपण विधानसभेत ही उपस्थित केला होता तसेच कोलवा पोलिसस्थानकाचे निरीक्षक व दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक टिकमसिंग वर्मा यांच्याकडे ही तक्रार केलेली आहे.
परंतु, या क्लबवर कारवाई करण्यासाठी पोलिस पुढाकार घेत नसल्याचे त्यांनी सांगितले. या क्लबमध्ये तरूणांबरोबरच युवती असतात. याठिकाणी नको असलेल्या गोष्टी घडतात. तरी सुद्धा या क्लबवर कारवाई होत नाही. या क्लबला कुणाचा आशीर्वाद आहे का ? असा सवालही उपस्थित करण्यात आलेला आहे. मुंगूल-मांडेल परिसरात जो प्रकार घडला, त्यात सामील असलेले युवक हे कोलवा येथील त्या क्लबमध्ये रात्री उशिरा होते अशी माहिती आपल्याला प्राप्त झालेली असल्याचे आमदार व्हियेगस यांनी सांगितले. या क्लबमुळे नेहमीच वाद निर्माण झालेले आहेत. या क्लबमुळे आपल्या बाणावली मतदारसंघातील शांतता बिघडत असते. या क्लबद्वारे पोलिसांना हप्ता मिळतोय का ? असा सवाल ही त्यांनी उपस्थित केलेला आहे.
या पूर्वी ही अशा दोन घटना घडल्या
दरम्यान, कोलवा-मुंगूल रस्त्यावर यापूर्वी दोन घटना घडल्या असून काल तिसऱ्या घटणेची नोंद झालेली आहे. पोलिसांनी अशा ‘गँगवॉर’चा कायमचा बंदोबस्त केला पाहिजे. ही घटना जरी बाणावली व फातोर्डा मतदारसंघाच्या सीमेवर घडली असली तरी दोन्ही मतदारसंघाची शांतता अबाधित राहिली पाहिजे असे मत ही आमदार व्हेंन्झी व्हियेगस यांनी व्यक्त केले आहे. आपण आपल्या बाणावली मतदारसंघात गँगवॉर तसेच गुडगिरीला थारा देणार नाही. आपण हा विषय लावून धरणार असल्याचे आमदार व्हियेगस यांनी स्पष्ट केले आहे.









