कोल्हापूर :
छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रूग्णालयामध्ये (सीपीआर) मागील आठवड्यात डॉक्टरांच्या संगनमताने खासगी लॅबचे प्रतिनिधीकडून विविध तपासण्या केल्या जात असल्याचे संभाजी ब्रिगेडने उघड केले होते. यातून उपचारासाठी येणाऱ्या सामान्य नागराकंची होणारी लुट उघडकीस आणली होती.
या घटनेला दहा दिवसाचा कालावधी होऊनही अद्याप कोणावरही कारवाई झालेली नाही. त्यामुळे डॉक्टर व खासगी लॅब प्रतिनिधींवर कारवाई कधी होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. घटना घडल्याच्या दुसऱ्या दिवशीच सीपीआर प्रशासनाने संबंधितांवर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. पण अद्यापही पुढील कार्यवाही झालेली नाही.
सीपीआर प्रशासनाने याच्या चोकशीसाठी समिती नेमली आहे. मात्र, दहा दिवसाचा कालावधी लोटला तरीही त्यांच्याकडून कसालाच अहवाल आलेला नाही. अजुनही केवळ चौकशीच सुरू असल्याचे बोलले जात आहे. लॅब प्रतिनिधी कसे येतात?, त्यांना कोणते डॉक्टर सामील आहेत?, सीपीआरमधील तपासणी यंत्रात बिघाड आहे का? अशा विविध प्रश्नांची उत्तरे अजुनही समितीकडून मिळालेली नाहीत. कारवाई झाली नाही तर अशा लोकांना कोणाचेच भय राहणार नाही व पुन्हा अशा प्रकारांना सुरूवात होणार आहे.
सीपीआर प्रशासनाकडून नेमलेल्या समितीने अद्यापही कोणाताच अहवाल दिलेला नाही. केवळ पोलिसांत तक्रार दिली आहे. मात्र, यामध्ये लॅब प्रतिनिधी व डॉक्टरांच्या चौकशीचा अहवाल मिळाल्याशिवाय गुन्हा दाखल होत नसल्याने सीपीआर प्रशासनाने अहवाल द्यावा, अशी मागणी पोलिसांनी केली आहे.








