कोल्हापूर जिल्हा परिषदेची स्थापना कधी झाली?.. 1962 साली.
कोल्हापूर जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष कोण?…..
शिरोळ तालुक्यातील दिनकरराव यादव.
जिल्हा परिषदेचे ऑफिस कोठे होते? …
जुन्या पॉवर हाऊसमध्ये. म्हणजे आताच्या करवीर पंचायत समितीच्या ऑफिसमध्ये. यापुढची माहिती खूप उत्सुकता वाढवणारी जरूर आहे . त्याची संगतवार माहिती या पिढीतील खूप कमी जणांना आहे. पण जिल्हा परिषदेच्या स्थापनेच्या पहिल्या दिवसापासूनच्या स्मृती मनापासून जपणारे एक व्यक्तिमत्व कोल्हापुरात आहे. त्यांचं नाव अरुणराव साळुंखे. वय 84. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष दिनकरराव यादव यांचे ते स्वीय सहाय्यक. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून ते एकूण कारभाराची पारदर्शी पद्धत ,त्यावेळची जिल्हा परिषद ,त्यावेळचे राजकारण , नेते त्यावेळचे प्रशासनातील अधिकारी या आठवणीची गुंफण त्यांनी आजही जपली आहे. जिल्हा परिषद स्थापनेचे ते प्रत्यक्ष साक्षीदार असल्याने त्यांच्याशी बोलत राहिले की या आठवणींचा एक एक पैलू उलगडू लागतो. आणि त्यावेळच्या जिल्हा परिषदेच्या कारभाराचा एक आदर्श पट एकेका शब्दातून जाणवायला लागतो.
जिल्हा परिषद म्हणजे लोकशाहीचा पाया. ग्रामीण स्तरावर नेणारी एक प्रशासकीय पद्धती. कोल्हापुरात त्यावेळच्या लोकल बोर्डाच्या वतीने हा प्रशासकीय कारभार पाहिला जात होता .त्यामुळे त्यात काही मर्यादा जाणवत होत्या.महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर दोन वर्षांनी म्हणजे 1962 साली कोल्हापूर जिल्हा परिषदेची स्थापना झाली लोकशाहीची कवाडे आणखी तळापर्यंत खुली झाली.त्यावेळी जिल्ह्यात काँग्रेसचे आणि शहर व ठराविक तालुक्यातच शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व होते.त्यामुळे जिल्हा परिषदेच्या पहिल्या सभागृहाची सत्ता काँग्रेसकडे आली . राजकीय पक्ष म्हटले की गटबाजी आली,ती काँग्रेसमध्येदेखील होती.त्यातून दताजीराव कदम ,अनंतराव भिडे, बाबासाहेब खंजिरे, कलाप्पाणा आवाडे यांच्या पाठबळावर शिरोळच्या दिनकरराव यादव यांची जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष म्हणून निवड झाली.पुढे ते आमदारही झाले.
जिल्हा परिषदेच्या कारभाराचा सर्वांनाच नवा अनुभव.यामुळे जिल्हा परिषदेचा एक जबाबदार व विश्वासू सेवक म्हणून अरुणराव साळुंखे यांच्यावर दिनकररावांनी स्वीय सहाय्यकाची जबाबदारी टाकली.तेव्हाची आत्ताची तुलना अशा अर्थाने नव्हे ,पण त्यावेळी अतिशय पारदर्शी कारभार होता.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सुब्रमण्य होते.लोकांची प्रत्येक मागणी पूर्ण झाली पाहिजे हीच भावना सोबत घेऊन अध्यक्षपदावर दिनकरराव यादव बसले होते.भिमगोंड पाटील,गणपतराव सरनोबत ,हरिभाऊ कडव ,शहापुरे,पी. डी पाटील,नामदेवराव कांबळे , खर्डेकर सरकार ,पाशा पटेल , दतवाडकर सरकार यांच्यासारखे जेष्ठ सदस्य सभागृहात होते.बाळासाहेब पाटील कौलवकर उपाध्यक्ष होते.आणि सध्याच्या करवीर पंचायत समिती कार्यालयात जिल्हा परिषदेचे ऑफिस होते.पॉवर हाऊस म्हणून ते ओळखले जात होते.अशा वातावरणात जिल्हा परिषदेचा कारभार सुरू झाला. साळुंखे यांच्या शब्दात सांगायचे झाले तर ,लोकांची कामे झालीच पाहिजेत यासाठी टोकाचा आग्रह दिनकराव यादव धरत असत.आपला पूर्ण वेळ ते जिल्हा परिषदेसाठी देत.कोणतेही शिष्टमंडळ भेटायला येऊ देत,त्यांच्या मागण्या ते मनपूर्वक ऐकत.कामाचे स्वरूप अडचणीचे असले तरीही काहीतरी मार्ग काढा पण लोकांची मागणी पूर्ण करा असा आग्रह अधिकाऱ्यांच्याकडे आग्रह धरायचे.अधिकाऱ्यांनाही दिनकरराव यादवांच्या या आग्रहामागे कसलाही लाभाचा हेतू नाही याची खात्री असायची.त्यामुळे थोडे मागेपुढे करत का होईना लोकांची कामे व्हायची.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना त्यावेळी पूर्ण अधिकार नव्हते.त्यामुळे ग्रामविकास विभागावर अवलंबुन रहावे लागत होते.त्यामुळे दिनकरराव यादव यांनी व अधिकाराची मागणी केली. पन्हाळ्यावर राज्यातील सर्व जिल्हा परिषद अध्यक्षांची परिषद आयोजीत केली.या परिषदेचा परिणाम असा झाला की पुढे ही मागणी शासनाने मान्य केली.त्यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षांना गुलाबी रंगाची अँबेसडर गाडी (एमएचके 907) होती. दिनकरराव यादव शिरोळचे.पण ते कोल्हापुरात राहायचे.त्यामुळे कायम जिल्हा परिषदेत ते उपलब्ध असायचे. कामाच्या निमित्ताने कर्मचाऱ्यांना धारेवर धरायचे.पण तो क्षण संपला की कर्मचाऱ्यांशी मिसळून राहायचे. पी.ए. म्हणून अरुणराव साळुंखे यांच्यावर त्यांचा विश्वास. वक्तशीरपणा , अचूकता या गुणामुळे अरुणराव साळुंखे यांनी तीन वर्षे पी.ए. म्हणून जबाबदारी पार पडली. त्याशिवाय जिल्हा परिषद कर्मच्रायांचे संघटन त्यांनी केले. कर्मच्रायांच्या आर्थिक विकासासाठी जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटी स्थापनेत त्यांचा मोठा वाटा राहिला. जिल्हा परिषद कर्मच्रायांचे स्नेहसंमेलन भरवण्याची प्रथा त्यांनी सुरू केली. त्यांनी पहिल्या स्नेहसंमेलनास जेष्ठ कवी ग.दि.माडगूळकर. कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य भा.शं. भणगे यांच्यासारख्या दिग्गजांना निमंत्रित केले. केशवराव भोसले नाट्यागृहात हा पहिला स्नेहसंमेलन सोहळा झाला.पण पुढे भविष्यात अशा सोहळ्यात खंड पडला. तीन वर्षाच्या जिल्हा परिषद सेवेनंतर अरुणराव साळुंखे महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या सेवेत रूजू झाले.पुढे महाव्यवस्थापक म्हणून निवृत्त झाले.आजही 84 व्या वयात त्यांच्याकडे या साऱ्या राजकीय आठवणींचा साठा ताजातवाना आहे.किंबहुना नव्या पिढीला हा सारा इतिहास कळावा ही त्यांची धडपड आहे.









