इम्रान गवंडी,कोल्हापूर
Kolhapur News : कोल्हापूर-रत्नागिरी राज्य मार्गावर पंचगंगा नदीवरील संस्थानकालीन शिवाजी पुलाचा वापर नव्या पुलामुळे थांबला आहे. जुन्या पुलावर हेरिटेज कॉरिडॉर करण्याची चर्चा झाली, पण त्यानंतर या पुलाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. जुना पुल अडगळीत जाऊ नये यासाठी लोकप्रतिनिधींनी पुलाच्या संवर्धन आणि जतनासाठी पुढाकार घेण्याची मागणी वाढत आहे. संस्थानकालीन शिवाजी पूल ही पुरातन वास्तू असल्याने त्याचे पर्यटनस्थळात रूपांतर शक्य आहे. 1875 ते 1878 दरम्यान या पुलाची उभारणी झाली. पुल ब्रिटिश रॉयल कंपनीने बनवला असला तरी त्यासाठी लागणारा सर्व खर्च तत्कालीन चौथे शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीत संस्थानाच्या तिजोरीतून केला होता. या पुलाला चौथ्या शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले. शंभर वर्षाची मुदत असलेल्या पुलाने 137 वर्षे वाहतुकीचा भार पेलला. त्यानंतर या पुलाशेजारीच पर्यायी पुलाची उभारणी झाली. गेल्या 4 वर्षांपासून नव्या पुलावरून वाहतूक सुरू आहे. पर्यायाने जुना पुलावरील वाहतूक थांबली आहे. सद्यस्थितीत पुलाची दुरावस्था झाली आहे. पुलाच्या कमानीतून झुडपे वाढली आहेत. संरक्षक कठड्याचे दगड निखळत आहेत. पुलाच्या पुर्वेला दुचाकींचे पार्कींग वाढले आहे. सुचना फलक दुर्लक्षित झाला आहे. याचा वापर कपडे वाळवण्यासाठी होत आहे. पुलावरील संस्थानकालीन पथदिव्यांची दुरावस्था झाली आहे. ते केव्हाही कोसळण्याचा धोका आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने पर्यायी पुल 2019 मध्ये सुरू झाल्यानंतर जुना पूल वाहतुकीसाठी बंद झाला. त्यानंतर तत्कालीन लोकप्रतिनिधी, महापालिकेचे आयुक्त, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग उपअभियंता आदींनी जुन्या पुलाची पाहणी केली. पुलाच्या डागडूजीसह पर्यटन स्थळाच्या दृष्टीने जतन व संवर्धन करण्याचे आश्वासन दिले होते. यामध्ये लाईट अँड साऊंड शो, हरितक्रांतीचा इतिहास पुल परिसरात मांडून वॉकिंग म्युझियमसाठी निधीची घोषणा झाली, त्याचे पुढे काय झाले? असा प्रश्न केला जात आहे. विकासात्मक प्रकल्प सोडाच याच्या डागडूजीकरणाकडे लक्ष देण्यासाठी प्रशासनाकडे वेळ नसल्याचे दिसून येत आहे.

पंचगंगा नदी परिसर पर्यटन स्थळ होण्यासाठी जुना पूल हेरिटेज स्पॉट व्हावा, अशी अपेक्षा आहे. जुन्या पुलाची दुरूस्ती, संस्थानकालीन पथदिव्यांची नव्याने उभारणी गरजेची आहे. नदीघाट पाहण्यासाठी पिकनिक पॉईंटच्या सुशोभीकरणाची गरज आहे. नदीघाट, पिकनिक पॉईंट आणि शिवाजी पूल असा हेरिटेज कॉरीडॉर विकसित होण्याची मागणी परिसरातून होत आहे.

पर्यायी पुलामुळे तब्बल 141 वर्षांनी जुन्या शिवाजी पुलावरील वाहतूक थांबली. संस्थानकाळात बैलगाडी, घोडागाडीची वर्दळ या पुलावर होती. स्वातंत्र्यानंतर सायकली, दुचाकी, कार, बस, ट्रकची अवजड वाहतूक पुलावरून वाढली. पुलाची मुदत संपल्याने पर्यायी पूल झाला. पर्यायी पूल सुरू झाल्यानंतर याकडे दुर्लक्ष झाले आहे. पुलाचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास व्हावा, अशी मागणी होत आहे.

पाच वर्षापुर्वी झालेल्या दुर्दैवी घटनेत ट्रॅव्हलर पुलाचा कठडा तोडून नदीत कोसळली होती. त्यानंतर प्रशासनाने याची दुरूस्ती केली, पण संस्थानकालीन दगड तसेच पडले आहेत. पुलावर कठड्यावरील एका दगडावर पंचगंगा नदी अशी कोरलेली पाटी अजूनही शिल्लक आहे. हे साक्षीदार जपण्याची मागणी वाढत आहे.










