‘सीखे’ संस्थेकडून नवीन अध्यापन तंत्राची माहिती : सरकारी शाळांचा खालावलेला दर्जा सुधारण्यासाठी उपयुक्त
बेळगाव : सरकारी शाळांमधील गुणवत्ता वाढावी या उद्देशाने मुंबई येथील सेंटर फॉर इक्वॅलिटी अँड क्वॉलिटी इन युनिव्हर्सल एज्युकेशन (सीखे) या संस्थेच्यावतीने बेळगावमधील सरकारी शाळांमधील शिक्षकांसाठी टीचर इनोव्हेटर प्रोग्रॅमचे आयोजन करण्यात आले होते. 25 सप्टेंबर रोजी शिक्षकांना प्रशिक्षण आणि त्याचबरोबर नवनवीन अध्यापन तंत्रे यांची माहिती देण्यात आली. बेळगाव जिल्हा सार्वजनिक शिक्षण विभागाच्या सहयोगाने हे शिबिर 26 पर्यंत चालले.
‘सीखे’ ही स्वयंसेवी संस्था असून सध्या महाराष्ट्र व मध्यप्रदेश या राज्यांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी काम करत आहे. कर्नाटकात प्रथमच बेळगावमध्ये शिक्षकांसाठी प्रशिक्षण घेण्यात आले. केवळ प्रशिक्षणावर न थांबता पुढील पाच वर्षे शिक्षकांसोबत ही संस्था काम करणार आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील शिक्षकांचे दोन गट तयार करण्यात आले असून सोमवारी 170 शिक्षकांना नव्या अध्यापन पद्धतींविषयी माहिती देण्यात आली. सीखे संस्थेच्या सीईओ उमा कोगेकर यांनी शिक्षकांना मार्गदर्शन करत अनेक नव्या संकल्पना मांडल्या. गणित व भाषा या विषयांमधील अध्यापन पद्धती शिक्षकांना समजावून सांगण्यात आल्या. बेळगावमध्ये प्रथमच असे प्रशिक्षण होत असल्याने शिक्षकांची मोठी उपस्थिती होती. सरकारी शाळांचा दर्जा सुधारायचा असेल तर सर्वप्रथम शिक्षकांना नव्या अध्यापन पद्धती शिकविणे गरजेचे असल्याचे मत उमा कोगेकर यांनी व्यक्त केले. मराठी व कन्नड या दोन माध्यमांमध्ये हे प्रशिक्षण चालले. शिक्षण विभागासोबत सीखे संस्थेने समन्वय करार केला असून यापुढील काळातही संस्था काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन शिक्षण विभागाचे क्षेत्र समन्वय अधिकारी आय. डी. हिरेमठ, डायटचे प्राचार्य गांजी, प्राथमिक शाळा शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयकुमार हेब्बळ्ळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बेळगाव परिसरातील शिक्षक उपस्थित होते.
प्रशिक्षणार्थी शिक्षकांमध्ये उत्साह
एरव्ही प्रशिक्षण म्हटले की शिक्षकांच्या कपाळावर आठ्या पडतात. परंतु, सोमवारी सीखे संस्थेच्यावतीने हसत खेळत शिक्षण पद्धती शिक्षकांना समजावून देण्यात आल्याने प्रशिक्षणासाठी शिक्षकांमध्ये उत्साह दिसून आला. आपल्याला जाणवणाऱ्या समस्या शिक्षकांना मार्गदर्शकांसमोर मांडता आल्याने त्यांना समर्पक उत्तरे मिळाली.









