गेल्या एक-दीड महिन्यात धर्मस्थळच्या बाबतीत जे बोलले जात होते. माध्यमांमध्ये जे दाखवले जात होते. त्यावरून धर्मस्थळमध्ये मोठे काही तरी कांड घडले आहे, अशीच समजूत होत होती. ज्यांनी तक्रार केली आहे, आता त्यांचीच चौकशी सुरू झाल्यामुळे त्या प्रकरणात षड्यंत्र नक्कीच आहे हे लपून राहिले नाही. कर्नाटकातील प्रमुख धार्मिक ठिकाण असलेल्या धर्मस्थळवरील आरोप ज्यांनी केला होता, त्यांच्यावरच उलटण्याची लक्षणे दिसू लागली आहेत. सुरुवातीला केवळ मास्कमॅन म्हणून जो ओळखला जात होता, धर्मस्थळमध्ये शेकडो महिलांचे मृतदेह आपण पुरलो आहे, आता त्याचा आपल्याला पश्चाताप होतो आहे. म्हणून मृतदेह जेथे पुरले आहेत ती जागा दाखवणार म्हणून तो आला होता. त्याने दाखवलेल्या 16 पैकी केवळ 2 जागांवर मानवी कवटी व अस्थी सापडल्या आहेत. उलट त्याच्यावरच एफआयआर दाखल झाला आहे. त्याचे नावही आता लपून राहिले नाही. चिन्नय्या असे त्याचे नाव आहे. कुख्यात चंदनतस्कर वीरप्पनच्या वास्तव्यामुळे एकेकाळी नेहमी चर्चेत असणाऱ्या सत्यमंगल येथील तो राहणारा आहे. म्हैसूर येथील वडनाडी या एनओजीसह काही एनजीओही धर्मस्थळ प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत.
धर्मस्थळला बदनाम करण्यासाठी षड्यंत्र रचण्यात आले आहे, असे स्वत: उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सांगितले होते. त्यानंतर मास्कमॅन चिन्नय्याची अधिकाऱ्यांनी ज्यावेळी उलट तपासणी केली, तेव्हा त्याने षड्यंत्राची कबुली दिली. सौजन्या नामक तरुणीच्या खून प्रकरणात गेल्या तेरा वर्षांपासून जे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनातील आघाडीचे नेते महेश शेट्टी तिमरोडी, माजी पोलीस अधिकारी गिरीश मट्टण्णावर, जयंत आदी नेत्यांची एसआयटीकडून चौकशी सुरू आहे. काही यूट्यूबरवरही एफआयआर दाखल करण्यात आला आहे. गेल्या एक-दीड महिन्यात धर्मस्थळच्या बाबतीत जे बोलले जात होते. माध्यमांमध्ये जे दाखवले जात होते. त्यावरून धर्मस्थळमध्ये मोठे काहीतरी कांड घडले आहे, अशीच समजूत होत होती. ज्यांनी तक्रार केली आहे, आता त्यांचीच चौकशी सुरू झाल्यामुळे त्या प्रकरणात षड्यंत्र नक्कीच आहे हे लपून राहिले नाही. धर्मस्थळ, मंजुनाथ व अण्णाप्पा स्वामींची कीर्ती मोठी आहे. त्यांना मानणारा वर्गही देश-विदेशात आहे. धर्मस्थळला मानणाऱ्यांच्या भावनांनाच धक्का पोहोचविण्याचे काम सुरू होते. एसआयटीने यामागचे षड्यंत्र उघडकीस आणण्याचे काम हाती घेतले आहे.
मास्कमॅन चिन्नय्याला पोलीस कोठडीत घेऊन त्याची चौकशी करण्यात येत आहे. सुजाता भट नामक महिला गेल्या महिन्याभरापासून केवळ कर्नाटकच नव्हे तर संपूर्ण देशभरात ठळक चर्चेत होती. धर्मस्थळमध्ये आपल्या मुलीची हत्या झाली आहे. खोदाईत तिच्या अस्थी मिळाल्या तर डीएनए चौकशी करून त्या मला द्या. तिच्या आत्म्याला शांती लाभण्यासाठी काही धार्मिक विधी करायचे आहेत, असे सांगणाऱ्या सत्तरी पार केलेल्या या वृद्धेने आपल्यावरही अत्याचार झाल्याचा आरोप केला होता. मुळात तिचे लग्नच झाले नाही. तिला मुलगीही नव्हती, असे चौकशीत स्पष्ट झाले आहे. स्वत: त्या वृद्धेनेच ही गोष्ट कबूल केली आहे. एसआयटीकडून सुजाता भट यांचीही चौकशी करण्यात येत आहे. त्यांच्याकडून होणाऱ्या आरोपांमुळे एसआयटीचे अधिकारीच थक्क झाले होते. प्रत्येक एक-दोन तासात त्या जबानी बदलतात. संपूर्ण चौकशी अंती धर्मस्थळबरोबरच्या जमीन वादामुळे सुजाता भडकल्या आहेत. त्यामुळेच हयातीत नसलेल्या मुलीचा खून झाल्याचा गंभीर आरोप करीत आहेत, ही गोष्टही आता लपून राहिली नाही.
राज्य सरकारने ज्यावेळी एसआयटीची स्थापना केली. त्यावेळी धर्मस्थळचे धर्माधिकारी वीरेंद्र हेगडे यांनीच त्याचे स्वागत केले होते. एसआयटीच्या चौकशीतून षड्यंत्र बाहेर पडताच आता धर्मस्थळच्या मुद्द्यावरून राजकारण रंगले आहे. भाजप नेत्यांनी धर्मस्थळमध्ये मोठा मेळावा भरवून धर्मस्थळच्या मागे आम्ही आहोत, केंद्र सरकारही आहे, हा संदेश दिला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, विरोधी पक्षनेते आर. अशोक यांच्यासह अनेक नेत्यांनी या मेळाव्यात भाग घेतला. भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी तर तेरा वर्षांपूर्वी खून झालेल्या सौजन्याच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांना धीर दिला. या प्रकरणाच्या फेरचौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केलात तर त्याचा संपूर्ण खर्च आपला पक्ष करेल, अशी ग्वाही दिली आहे. एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी सौजन्या अत्याचार व खून प्रकरणाची चौकशीही हाती घेतली आहे. या प्रकरणात ज्यांच्यावर आरोप केले जात होते, त्या संशयितांची पुन्हा चौकशी करण्यात येत आहे.
भाजपपाठोपाठ निजद व काँग्रेस नेत्यांचेही धर्मस्थळ चलोचे अभियान सुरू झाले आहे. या प्रकरणावर एकमेकांवर आरोप केले जात आहेत. धर्मस्थळ या पवित्र धार्मिक ठिकाणच्या बदनामीला सत्ताधारी काँग्रेस पक्षच जबाबदार आहे, असा थेट आरोप भाजपने केला आहे.
कर्नाटकातील विविध मठाधीश, हिंदू व जैन समाजही रस्त्यावर उतरला आहे. धर्मस्थळची बदनामी थांबवा, असे आवाहन राजकीय व धार्मिक नेत्यांनी केले आहे. स्वत: धर्माधिकारी वीरेंद्र हेगडे यांनीही चौकशीतून सत्य बाहेर येऊ द्या, अशी भूमिका मांडली आहे. कोणीतरी आरोप केले म्हणून एसआयटी स्थापन करणेच मुळाच चुकीचे आहे, असा अभिप्राय आता भाजप नेते व्यक्त करू लागले आहेत. सर्वोच्च न्यायालयात धर्मस्थळसंबंधी गंभीर आरोप करून तेथे शेकडो खून झाले आहेत, ही सर्व प्रकरणे दडपण्यात आली आहेत, असे सांगितल्यानंतरही एसआयटीची स्थापना केली नसती तर सरकारवर आणखी टीका झाली असती. मुख्यमंत्री सिद्धरामय्या, गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर आदी नेत्यांनी तर चौकशी होऊ द्या, सत्य बाहेर पडू द्या. यामध्ये कोणी दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई होणारच, अशी भूमिका मांडून या भूमिकेवर ते ठाम राहिले.
महिलांवरील अत्याचार, खून आदी प्रकरणांवरून कर्नाटकात राजकीय वातावरण तापलेले असतानाच अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अल्पवयीन मुली माता बनण्याचे प्रकार वाढले आहेत. यासंबंधीची आकडेवारी थक्क करणारी आहे. संपूर्ण राज्यात 80 हजारहून अधिक अल्पवयीन मुली गर्भवती झाल्या आहेत. बेंगळूर, बेळगाव, विजापूरमध्ये ही संख्या अधिक आहे.
एका बेळगाव जिल्ह्यातील परिस्थिती पाहता अडीच वर्षात 8 हजार 891 अल्पवयीन मुली गर्भवती झाल्याच्या नोंदी आहेत. यादगिरीमध्ये नववीत शिकणारी, शिमोग्यात नववीत शिकणाऱ्या मुलींची प्रसूती झाली आहे. बागलकोट जिल्ह्यातील एका निवासी शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीनेही एका बाळाला जन्म दिला आहे.
बालविवाह रोखण्यासाठी सातत्याने प्रयत्न करूनही ते रोखता येईनात, हे वास्तव आहे. हुक्केरी तालुक्यातील (जि. बेळगाव) बसापूर ग्राम पंचायतीच्या अध्यक्षानेच एका अल्पवयीन मुलीबरोबर लग्न केले असून सतराव्या वर्षी या मुलीने बाळाला जन्म दिल्याचे उघडकीस आले आहे. या घटना गंभीर आहेत. कधी बालविवाहातून तर आणखी कधी लैंगिक अत्याचारातून अल्पवयीन मुली गर्भवती होण्याचे प्रकार वाढले आहेत. या परिस्थितीत बदल करण्यासाठी सरकारबरोबरच सर्वसामान्य नागरिकांनीही अभियान उघडण्याची गरज आहे.








