अध्याय चौथा
कर्मयोग आणि संन्यास हे दोन्ही समान फल देणारे आहेत. सर्वसंग परित्याग केलेले संन्यासी आपण पाहतो. त्यावरून संन्यासी होणे सोपे असेल असे आपल्याला वाटते पण ही थोडीशी दुरून डोंगर साजरे ह्या म्हणीप्रमाणे परिस्थिती असते. जे संसारिक त्रासाला कंटाळून आता मी संन्यासच घेतो असे म्हणतात आणि त्याप्रमाणे वागतात त्यांना थोड्याच दिवसात घरादाराची आठवण येऊ लागते. त्यांच्या अपुऱ्या राहिलेल्या इच्छा डोके वर काढू लागतात. त्यांना त्याचा मानसिक त्रास होऊ लागतो आणि लवकरच त्यांच्या डोक्यातले संन्यासाचे खूळ नाहीसे होते. वास्तविक पाहता आपल्याला जे संन्यासी भेटलेले असतात त्यांनी पूर्वी कर्मयोगाचे आचरण केलेले असते. त्यामुळे मोक्षाकडे वाटचाल करू इच्छिणाऱ्याने मी एकदम संन्यास घेऊन सर्वसंगपरित्याग करतो असे जरी ठरवले तरी जन्मोजन्मीच्या सवयीने त्याला सर्व गोष्टीतून लक्ष काढून घेऊन संन्यस्त वृत्तीने राहणे शक्य होत नाही. म्हणून त्यांनी लागलीच घरादाराचा त्याग करून संन्यास घेण्याच्या फंदात न पडता संसारात राहून आपले कर्तव्य चोख बजावावे. त्याच वेळेस निभावलेल्या कर्तव्याचा मोबदला म्हणून एखाद्या गोष्टीची अपेक्षा करू नये. हीही गोष्ट वाटते तेव्हढी सोपी नाही हे त्यादृष्टीने कर्म करायला लागल्यावर लगेच लक्षात येते कारण आत्तापर्यंत गेले कित्येक जन्म मोबदल्याच्या अपेक्षेने कर्मे करण्यातच गेलेले असतात. त्यामुळे तो आपला स्वभाव बनलेला असतो.
कर्मयोगाचे आचरण करायला सुरवात केल्यावर आपल्या स्वभावाविरुद्ध निरपेक्षतेने कर्म करायला लागते. हे लक्षात घेऊन ज्याला मोक्षाची वाटचाल करायची इच्छा असते त्याने चिकाटीने निरपेक्षतेने काम करायला सुरवात करावी. हळूहळू ते त्याच्या अंगवळणी पडेल त्यामुळे त्याच्या स्वभावातही हळूहळू का होईना फरक पडायला लागेल. पुढे पुढे तर त्याच्या स्वभावात अमुलाग्र बदल झाल्याने, निरपेक्षतेने कर्म करायचे आहे हे लक्षातसुद्धा न ठेवता त्याच्याहातून निरपेक्षतेने कर्म होत राहील. आपण पाहत असलेल्या संन्याशानी ह्या पद्धतीनेच त्यांच्या स्वभावात बदल केलेला असतो. म्हणून बाप्पा सध्या आपण अभ्यासत असलेल्या
ब्रह्मरूपं जगत्सर्वं पश्यति स्वान्तरात्मनि।
एवं योगश्च संन्यास । समानफलदायिनौ ।। 36।।
ह्या श्लोकात म्हणतात, सर्व जग ब्रह्मरूप आहे व स्वत:च्या अंतरात्म्यामध्ये आहे असे कर्मयोग्याला जाणवत असते. या प्रकारे योग आणि संन्यास हे दोन्ही समान फल देणारे आहेत. याप्रमाणे वागून सर्व प्राणिमात्रांचे हित साधणाऱ्याला मी मुक्ती देतो असं बाप्पा ह्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात सांगत आहेत.
जन्तूनां हितकर्तारं कर्मणां फलदायिनम् ।
मां ज्ञात्वा मुक्तिमाप्नोति त्रैलोक्यस्येश्वरं विभुम् ।।37 ।।
अर्थ- सर्व प्राण्यांचे हित करणारा व कर्माचे फल देणारा, त्रैलोक्याचा ईश्वर व सर्वव्यापी अशा मला जाणल्यावर मनुष्याला मुक्ति प्राप्त होते.
निरपेक्ष स्वभावाच्या व्यक्ती किंवा संन्यासी यांना मुक्ती मिळते पण सहजासहजी मनुष्याला ही बाब पटत नाही म्हणून बाप्पा म्हणतात, मी अज्ञानी जीवांचा कल्याणकर्ता असून त्यांना मोहमायेपासून सोडवण्यासाठी मी उपदेश करत असतो. त्याचं जे तंतोतंत पालन करतील त्यांना मी माझ्यासारखे करून टाकतो. म्हणजेच त्यांना सायुज्य मुक्ती किंवा परमपद मिळतं.
अध्यायाच्या प्रारंभी वरेण्य राजाने प्रश्न विचारला होता की, कर्मयोग आणि कर्मसंन्यास यातील श्रेष्ठ काय? त्याला बाप्पांनी उत्तर दिले की, दोन्हीही श्रेष्ठ आहेत. संसारी माणसानं कर्मयोगाचं आचरण करावं म्हणजे आपोआपच त्याचा संन्यास योग साधला जातो.
वैधसंन्यासयोग नामक चौथा अध्याय समाप्त.








