कोल्हापूर / इम्रान गवंडी :
महापालिकेच्यावतीने दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर होऊन पाच महिन्याचा कालावधी लोटला तरी पुरस्कार वितरणासाठी मनपा प्रशासनाला मुहूर्त मिळेना, अशी स्थिती झाली आहे. चालू शैक्षणिक वर्ष संपले तरी पुरस्काराचा थांगपत्ता लागत नसल्याने आणखी किती दिवस या पुरस्काराची प्रतिक्षा करायची? असा प्रश्न विचारला जात आहे.
त्याहूनही कहर म्हणजे मागील तीन वर्षाच्या पुरस्कारांचे एकाच वेळी वितरण केले होते. त्यामुळे पुरस्कार वितरणातील अनागोंदी कारभार समोर आला होता. यंदाही हीच स्थिती निर्माण होणार का? अशी शंका उपस्थित केली जात आहे. मनपा प्रशासनाकडून पुरस्काराचे वितरण वेळेत केले जात नसल्याने याचे महत्वच कमी केले जात असल्याने शिक्षकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
दरवर्षी महापालिका व खाजगी अनुदानित शाळेतील शैक्षणिक, सामाजिक, सांकृतिक, क्रीडा आदी उपक्रमातून उल्लेखनिय कामगिरी करून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणाऱ्या शिक्षकांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कारा’ने सन्मानि केले जाते. गतवर्षी महापालिका शाळेतील 5 सहाय्यक शिक्षक, 1 कला शिक्षक, खाजगी अनुदानित शाळेतील 3 सहाय्यक शिक्षक अशा 9 शिक्षकांना पुरस्कार जाहीर झाले आहेत.
देशाचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून साजरा केल्या जाणाऱ्या जागतिक शिक्षक दिनादिवशीच आदर्श शिक्षक पुरस्कार बहाल करुन शिक्षकांचा गौरव केला जातो. शिक्षकांच्या योगदानाची प्रशंसा व त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जागातिक शिक्षक दिनी मिळणाऱ्या पुरस्काराला महत्व आहे. यातून शिक्षकांना उर्जा मिळत असते. मात्र, चालु शैक्षणिक वर्ष संपत आले तरी पुरस्काराचे वितरण झाले नसल्याने याचे महत्वच कमी केले जात असल्याच्या भावना शिक्षकांतून व्यक्त होत आहेत.
प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्या सूचनेनुसार शहरस्तरीय आदर्श शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार समिती स्थापन केली होती. यामध्ये उपायुक्त साधना पाटील, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या अधिव्याख्याता डॉ. अंजली रसाळ, प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासन अधिकारी आर. व्ही. कांबळे, प्रा. प्रभाकर हेरवाडे, शैक्षणिक पर्यवक्षक विजय माळी यांचा समावेश होता. समितीमार्फत 27 ऑगस्ट 2024 रोजी शिक्षकांच्या मुलाखती घेवून गुण दिले होते. त्यानुसार पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
- वितरणाचा खेळखंडोबा
पुरस्कार जाहीर झाल्यापासुन वितरणाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहूणा मिळत नसल्याने वितरण कार्यक्रम लांबत असल्याचे बालले जात आहे. विधानसभा निवडणूक व मंत्रीमंडळ स्थापनामुळे कार्यक्रम घेतला जात नव्हता. आता मंत्रींमडळ स्थापन होऊन कोल्हापूरला तीन मंत्रीपद मिळाले आहेत. तरीही पुरस्कार वितरणाचा खेळखंडोबा सुरू आहे.
- पुरस्काराचे वेळेत वितरण व्हावे
दरवर्षी पुरस्कार जाहीर झाल्यानंतर वितरणाच्या कार्यक्रमाची वाट पहावी लागते. या ना त्या कारणाने पुरस्कार वितरणाला विलंब केला जातो. याबाबत प्राथमिक शिक्षक संघटनेच्यावतीने पुरस्कार वितरणाबाबत निवेदनाद्वारे वेळोवेळी मागणी केली आहे. मात्र प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. पुरस्कार वेळेत प्राप्त झाला तरच त्याचे महत्व अबाधित राहील.
सुधाकर सावंत, राज्य प्रमुख, मनपा प्राथमिक शिक्षण संघटना








