अधिवेशन संपले तरी उद्घाटन नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम
प्रतिनिधी/ बेळगाव
प्रादेशिक परिवहन विभागाकडून बेळगावमध्ये नवीन आरटीओ कार्यालय बांधण्यात आले. मागील दोन वर्षांपासून कार्यालयाचे काम सुरू होते. सुसज्ज यंत्रणा असलेल्या कार्यालयाचे उद्घाटन विधिमंडळ अधिवेशनादरम्यान होण्याची चिन्हे होती. परंतु अधिवेशन होऊन गेले तरी अद्याप आरटीओ कार्यालयाचे उद्घाटन झालेले नाही. त्यामुळे कार्यालयाचे उद्घाटन नेमके केव्हा होणार? याची प्रतीक्षा आहे.
बेळगावच्या शिवाजीनगर कॉर्नर परिसरात आरटीओ कार्यालय आहे. कार्यालयाची इमारत जुनी तसेच कामकाजासाठी अपुरी पडत होती. यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने नवीन कार्यालय बांधण्याचा निर्णय घेतला. यासाठी आरटीओ कार्यालय तात्पुरत्या स्वरुपात पॅम्प येथील बीएसएनएल कार्यालयात हलविण्यात आले. त्याठिकाणी कोणत्याही सुविधा उपलब्ध नसल्याने अनेकवेळा नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच नवीन कार्यालय लवकर सुरू करावे, अशी मागणी होत होती.
दोन मजली नवीन इमारत बांधण्यात आली असून याठिकाणी विविध विभागांसाठी स्वतंत्र खोल्या देण्यात आल्या आहेत. या ठिकाणी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. सध्या अंतिम टप्प्यात फेव्हर्स बसवण्याचे काम सुरू आहे. विधिमंडळ अधिवेशनादरम्यान नूतन आरटीओ कार्यालयाचे उद्घाटन होणार असल्याचे सांगितले होते. तशी तयारीही केली. परंतु अधिवेशन झाले तरी कार्यालयाचे उद्घाटन केलेले नाही.
आरटीओ कार्यालयाचा कारभार केव्हा सुधारणार?
बेळगावमध्ये नूतन आरटीओ कार्यालयाचे काम पूर्ण झाले असून ते उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. असे असताना आरटीओ कार्यालयाचा कारभार केव्हा सुधारणार असा प्रŽ उपस्थित होत आहे. नवीन वाहन परवाने वाहन बनवण्याचे नूतनीकरण वाहनांची नोंदणी यासाठी नागरिकांची पिळवणूक सुरूच आहे. एजंटांशिवाय कोणतेच काम होत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे किमान वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तरी सर्व कर्मचाऱ्यांना शिस्त लावणे गरजेचे आहे.









