अध्याय सविसावा
पुरूरव्याचा पूर्ण कथाभाग सांगून भगवंत म्हणाले, पुऊरव्याचा स्वभाव अत्यंत शुद्ध झाल्यामुळे त्याला विवेकवैराग्यरूप संपत्ती प्राप्त झाली. त्याच्या गैर वागणुकीचा त्याला पूर्ण पश्चात्ताप झाल्याने तो माझ्या कृपाप्रसादाला पात्र झाला. पूर्ण अनुताप होण्यासाठी माणसाला त्रिगुणांच्या पकडीतून निसटावे लागते आणि त्यासाठी माझी कृपा व्हावी लागते. माझ्या कृपेशिवाय देहात कधी अनुताप उत्पन्न होत नाही. ज्याच्या ठिकाणी पूर्ण अनुताप झालेला दिसेल, त्याच्या ठिकाणी माझी परिपूर्ण कृपा आहे म्हणून समजावे. थोडक्मयात माझी कृपा होणे आणि गैर वर्तणुकीचा पश्चात्ताप होऊन तो टिकून राहणे या दोन्ही गोष्टी एकदमच घडतात. माझी कृपा झाली असता जीव पूर्ण ब्रह्मरूप होतो आणि देहाभिमान समूळ गळून जाऊन मीतूपणही त्याला भासत नाही. तेंव्हा कार्य, कर्म आणि कर्ता, भोग्य, भोग आणि भोक्ता, दृश्य, दर्शन आणि द्रष्टा, अशा त्रिपुटी मुळीच उरत नाहीत. तीन गुणांच्या त्रिपुटीचे कारण अज्ञान असते. सद्गुऊकृपेने त्याचा बिमोड होतो. अंधारात दोरी बघितली की, सापाचा भास होतो पण त्या दोरावर उजेड पडला की, दोराचा सापपणा, निखालस नाहीसा होतो. त्याप्रमाणे सद्गुरूंची कृपा झाली की, त्रिगुणांचा प्रभाव तर नाहीसा होतोच आणि अविद्याही नष्ट होते. सद्गुरूच्या उपदेशाप्रमाणे पाहिले असता द्वैताचे भानच दिसत नाही. राजाचे तसेच झाले. माझ्या कृपेने राजा आत्मानंदाने तृप्त झाला आणि उर्वशीचा त्याला विसर पडला. राजा ब्रह्मरसाने तृप्त झाला व स्वर्गलोक टाकून देऊन आत्मानंदाने तृप्त होऊन तेथून निघाला. उद्धवा हे सगळे भोग माया माणसाला यासाठी दाखवत असते की, त्याने त्या भोगातील निरर्थकता वेळीच ओळखावी आणि त्यात गुंतून न पडता, त्यापासून स्वत:ची सुटका करून घ्यावी व आत्मोद्धाराचा मार्ग पकडावा. प्रथम माणसाला विषयांची भोगार्थता दाखवली जाते आणि त्यातून त्याने त्यातली अपवर्गथा ओळखावी अशी ईश्वराची अपेक्षा आहे. ती त्याने तशी ओळखली आणि स्वखुशीने विषयांचा त्याग केला की, त्रिगुणांचे कार्य संपते आणि ते त्याच्या जीवनातून निघून जातात आणि मग फक्त स्वरूपाचे भान शिल्लक राहते. इतर ज्ञातेही स्त्रियांचा त्याग करतात पण त्यांची कामाची आवड संपलेली नसते त्यामुळे त्यात गुंतलेल्या मनातील इच्छांचा त्याग त्यांच्याकडून घडत नाही पण तशी काही राजाची स्थिती नव्हती. त्याने उर्वशीचा त्याग तर केलेला होताच आणि तो त्याने करायचा म्हणून केलेला नसून, त्यातली निरर्थकता जाणून मनापासून केलेला असल्याने त्याच्या मनातील तिच्या उपभोगाची मनातील इच्छेचाही त्याग घडलेला असल्याने तो खऱ्या विरक्तीला पोचला होता. जो साधक परस्त्री संगापासून लांब गेलेला असतो त्याला विरक्ती आलेली असल्याने त्याच्या मनात स्त्रीविषयी विचार येत नाहीत. विरक्त साधकासाठी सारी सृष्टी ब्रह्मानंदाने भरून गेल्याने, आत्मानंदाच्या पुष्टीने तो तृप्त झालेला असतो. मी असाच तृप्त असल्याने, असा साधक सहजी माझ्यासारखाच होतो आणि अंती मला येऊन मिळतो. कामाच्या उपभोगातच सर्व सुख दडलेले आहे अशी त्याची सुरवातीला कल्पना असल्याने त्याच्या सर्व हालचाली त्या दिशेनेच होत असतात पण जेव्हा त्याचा भ्रमनिरास होतो तेव्हा कल्पनेने उत्पन्न केलेल्या काम-विषयाला जिंकून तो आत्मानंदाने नाचू लागतो. एखाद्या गोष्टीतील निरर्थकता मनापासून पटते तेव्हा मनुष्य स्वत:हून त्या गोष्टीचा त्याग करतो. अर्थात असे घडण्यासाठी परमभाग्य उदयास यावे लागते. तसे झाले की, माझी त्याच्यावर कृपा होते. मग प्रारब्धानुसार त्याच्या हातून जे कार्य होण्याचे बाकी असेल ते पूर्ण करून तो आयुष्याच्या शेवटी मला येऊन मिळतो. माझ्या कृपेने त्याने मृत्यूवर मात केलेली असते. तेव्हा उद्धवा एवढा निजलाभ पाहिजे असेल तर परस्त्रियांची विषयासक्त सोडून द्यावी. दु:संग असेल तर तेथे आत्मघात ठेवलेलाच असतो हे लक्षात ठेव.
क्रमश:








