गॅरंटी योजनांसाठी रेशनकार्ड गरजेचे
प्रतिनिधी / बेळगाव
शासनाच्या गॅरंटी योजनांसाठी रेशनकार्ड बंधनकारक आहे. त्यामुळे नागरिक नवीन रेशनकार्डच्या प्रतीक्षेत आहेत. नवीन रेशनकार्डच्या कामाला अद्याप सुरुवात झाली नाही. त्यामुळे नागरिकांचे हेलपाटे सुरू आहेत. दरम्यान नवीन रेशनकार्ड अर्ज स्वीकृती कधी सुरू होणार? असा प्रश्नदेखील नागरिकांतून उपस्थित होत आहे.
अंत्योदय आणि बीपीएल शिधापत्रिकांसाठी जिल्ह्यातून तब्बल 85 हजार नागरिकांनी अर्ज केले आहेत. त्याचबरोबर नवीन अर्ज देणाऱ्या नागरिकांची संख्यादेखील मोठी आहे. मात्र अद्याप अर्ज स्वीकृती सुरू झाली नाही. त्यामुळे नागरिकांना नवीन रेशनकार्डच्या कामाची प्रतीक्षा लागली आहे. सरकारने पाच गॅरंटी योजनांची घोषणा केली आहे. त्यापैकी महिलांना मोफत बससेवेची सुविधा सुरू केली आहे. शिवाय जुलैपासून 10 किलो रेशन देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे नवीन रेशनकार्ड मिळविण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू झाली आहे. मात्र अद्याप अन्न व नागरी पुरवठा खात्याने रेशनकार्डच्या कामाला सुरुवात केली नसल्याने नागरिकांची निराशा होऊ लागली आहे.









