मुलाखत देताना येणारे दडपण आणि त्यामधून होणाऱया चुका याबद्दल यापूर्वीच्या लेखामध्ये सविस्तर अनुभव कथन केले होते. त्यावर काही वाचकांनी विचारणा केली की मुलाखतीमध्ये विचारल्या जाणाऱया प्रश्नांना कशी उत्तरे द्यावीत, त्याबद्दल सांगा. तर अशी आदर्श एकवीस अपेक्षित उत्तरे पाठ करून मुलाखतीमध्ये बाजी मारता येणार नाही. मुलाखतीमध्ये प्रत्येक उमेदवाराचे उत्तर वेगळे असावे कारण मुलाखत घेणाऱया व्यक्तीचा उद्देश स्वतः विचार करून उत्तरे देणाऱया उमेदवाराचीच निवड करावी असा असतो.
आवडत्या विषयामध्ये ज्यांनी शिक्षण घेतले असेल, त्याना मुलाखती फार अवघड जात नाहीत. तरीही उत्तरे कशी असावीत याची मार्गदर्शक तत्वे सांगता येतील. पदवी असलेल्या परंतु अनुभव नसलेल्या उमेदवारांकडून मुलाखत घेणाऱयाची काय अपेक्षा असते, हे जाणून घेण्याची गरज आहे. नुकतीच पदवी घेतलेला / घेतलेली उमेदवार प्रामाणिकपणे उत्तरे देत असेल तर निवड केली जाते. खोटे बोलणाऱया, हवेत पतंग उडवणाऱया उमेदवारांवर फुली मारणे मुलाखत घेणाऱयास अधिक सोयीचे जाते. खोटे बोलायचे नाही याचा धडा घेऊन कोणा उमेदवाराने सगळेच खरे सांगण्यास सुरुवात केली तरीही निवड होऊ शकणार नाही. उदाहरणार्थ, “स्वतःचे अवलोकन करताना तुम्हाला स्वतःचे कोणते दोष (weaknesses) आढळून येतात?’’ अशा स्वरूपाचा प्रश्न विचारल्यास, “माझे इंग्रजी कच्चे आहे’’, “मी शीघ्रकोपी आहे.’’ अशी उत्तरे दिल्यास मुलाखतीचा ‘निकाल’ लागेल. त्यामुळे “गेली काही वर्षे मी माझे इंग्रजी सुधारण्यावर विशेष प्रयत्न करत आहे त्यामुळे माझे इंग्रजी सुधारत आहे, तरीही अजूनही सुधारणा करण्यास वाव आहे.’’ असे उत्तर देता येईल. या उत्तरावर साहजिकच पुढील प्रश्न असेल, “कोणते विशेष प्रयत्न सुरु आहेत?’’. याला उत्तर देण्यासाठी इंग्रजी पुस्तके वाचणे, रोज पाच नवे शब्द शिकणे, इंग्रजी चित्रपट सबटायटल्स वाचता वाचता बघणे, वेगवेगळ्या उच्चार पद्धतीचे (accent) इंग्रजी ऐकण्याचा रियाज करणे असे विशेष प्रयत्न मुलाखतीपूर्वी सहा महिने करावे लागतील.
मुलाखतीची सुरुवात “Tell me about yourself’’ अशा प्रश्नाने होत असते. या प्रश्नाच्या उत्तराची तयारी करताना स्वतःचे गुण, स्वतःचे आवडते विषय, आपल्याला कशाचा ध्यास आहे आणि त्यासाठी आपण काय करतो अशा आशयाची 30 वाक्ये इंग्रजीमध्ये लिहावी आणि त्यामधील अनावश्यक मजकूर काढून सुरुवात कशी करावी आणि शेवट कोणत्या वाक्याने करावा याचा रियाज करावा. उत्तर तोंडपाठ करू नये. ज्याप्रमाणे भाषण करताना महत्वाचे दहा मुद्दे नजरेसमोर असावेत त्याचप्रमाणे आपण काय बोलणार आहोत त्याची लेखी तयारी करावी, मुद्दे काढून ठेवावे परंतु त्या मुद्यांचा कागद / वही मुलाखतीसाठी जाताना बरोबर नसावी. उत्तरे देताना अस्वस्थतेने पाय हलवू नयेत, हातामधील पेन / कागद याबरोबर चाळा करू नये. आपली अस्वस्थता दाखवू नये. त्यासाठीच मंद स्मित चेहऱयावर असावे. मंद स्मित आणि छद्मी भाव असणारे हास्य यामध्ये पुसट रेषा असल्यामुळे असे मंदस्मित करताना आपण कसे दिसतो, हे घरामधील
आरशासमोर उभे राहून बघावे.
आपली तांत्रिक कौशल्ये काय आहेत किंवा पाच बलस्थाने (Strengths) सांगताना ज्या विषयावर आपले प्रभुत्व आहे, ज्याबद्दल आपल्याला कोणताही प्रश्न विचारल्यास त्याचे उत्तरे देता येईल असेच पाच व्यक्तिविशेष सांगावे. “Hard work’’ असे उत्तर देण्यापेक्षा “दिलेले काम वेळेत पूर्ण करणे, दिलेली वेळ पाळणे’’ असे उत्तर जास्त योग्य आहे. “SQL’’ असे उत्तर दिल्यास मुलाखत घेणारी व्यक्ती एक अवघड SQL तयार करायला सांगणार, त्याचे उत्तर लिहून देण्याची तयारी असावी. नुकतीच पदवी परीक्षा पास झालेल्या उमेदवाराने “माझ्यामध्ये उत्तम नेतृत्वगुण आहेत’’ असे उत्तर देऊ नये कारण अनुभव नसलेल्या उमेदवाराने आधी उत्तम सांघिक कौशल्य (team player) दाखवणे अपेक्षित
असते.
आपण कोणत्याही शैक्षणिक शाखेचे पदवीधर असलात तरी, “शिक्षणामध्ये हीच शाखा का निवडली?’’ या प्रश्नावर स्वतःचे उत्तर तयार असावे. उत्तम इमारती बांधणे हा माझा ध्यास आहे, असे उत्तर सिव्हील इंजिनिअरने दिल्यास तुम्ही पाहिलेल्या उत्तम इमारती आणि त्याची वैशिष्टय़े सांगता येणे गरजेचे आहे. ‘बँकिंग आणि फायनान्स’ हे माझे आवडीचे आणि अभ्यासाचे विषय आहेत असे उत्तर कॉमर्स पदवीधर उमेदवाराने दिल्यास ‘50,000 रुपये दोन वर्षासाठी कुठे गुंतवावे?’, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्याचे अभ्यासपूर्ण उत्तर देण्याची तयारी करावी.
“पुढील पाच वर्षांचे करियरचे कसे नियोजन केले आहे?’’ अशा स्वरूपाच्या प्रश्नांना उत्तर देताना, “माझ्या आवडीच्या क्षेत्रात मला किमान पाच वर्षे नोकरी करता करता शिकण्याची इच्छा आहे.’’ असे उत्तर देता येईल. पाच वर्षात दोन बढत्या, ठराविक पगारवाढ मिळवणे, मिळणारी नोकरी सोडून UPSC ची तयारी करणे, अमेरिकेत वास्तव्य करणे अशी उद्दिष्टे असू नयेत, असल्यास मुलाखतीमध्ये सांगू नयेत, कारण याचा अर्थ “तुमच्या कंपनीत फार काळ राहण्याची माझी इच्छा नाही’’ असा निघू शकतो.
मुलाखतीमध्ये आपण काय बोलणार आहोत, त्याचा गैर अर्थ निघणार नाही, याची काळजी बोलताना घ्यावी. “कॉलेजचे शिक्षण घेताना कोणते प्रोजेक्ट केले, त्यामधील अडचणी कशा सोडवल्या?’’ अशा प्रश्नांची उत्तरे देताना तीन-चार मित्रांनी मिळून कसे काम केले, त्यांची कामाची वाटणी कशी केली, स्वतः काय केले, इतरांनी काय केले, त्यांचे कौतुक आपण कसे केले, अडचणीच्या वेळी कोणत्या मित्राचे कसे मार्गदर्शन घेतले अशी माहिती थोडक्यात द्यावी. कोणत्याही उत्तराला कोठे पूर्णविराम द्यायचा आहे हे ठरवावे. मुलाखत घेणाऱया व्यक्तीला उत्तर कधी संपते याची वाट बघायला लावू नये. जे काही चांगले काम आहे ते मीच एकटय़ाने केले असा बडेजाव कधीही दाखवू नये. अर्थात हे तत्व नोकरी मिळाल्यानंतरही पाळणे गरजेचे आहे.
‘मी हे केले, मी ते केले’’ अशा पद्धतीच्या मुलाखती धोनीसारख्या खेळाडूने कधीही दिलेल्या नाहीत. सामना जिंकल्यानंतर त्यामधील फोटोमध्ये सर्व खेळाडूंना पुढे करून त्या फोटोमधून आपण बाजूला होण्याची पद्धत महेंद्रसिंह धोनीने सुरु केली. “तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत का?’’ अशा प्रश्नावर प्रश्न विचारताना पगार, सुट्टय़ा, कामाचे तास, याबद्दल चौकशी करू नये. ज्या कंपनीमध्ये काम मिळवण्यासाठी मुलाखत घेतली आहे, त्या कामासंबंधी उत्सुकता दाखवणारा प्रश्न विचारावा. “कामाचे तास दुपारी 2 ते रात्री 10 पर्यंत आहेत, चालेल का?’’ अशा प्रकारचा प्रश्न विचारल्यास “कंपनीमधून घराजवळ जाण्यासाठी रात्री उशिरा वाहतुकीची सोय आहे का?’’ असा प्रश्न विचारू शकता परंतु मी अशा वेगळ्या कामाच्या वेळांमध्ये काम करण्यास तयार आहे असे वाक्य आधी सांगावे. “पगाराची अपेक्षा’’ विचारल्यास “कंपनीच्या धोरणानुसार आपण मला उत्तम पगार द्याल अशी मला खात्री आहे’’ अशी उत्तरे द्यावीत परंतु ठराविक पगाराची मागणी करू नये.
मुलाखतीमध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना एखाद्या गावामधून आलो आहोत याचा न्यूनगंड बाळगू नये, ठराविक कॉलेजमधून शिक्षण घेतले आहे याचा वृथा अभिमान दाखवू नये. मुलाखतीमधील प्रश्नांची उत्तरे देताना वृत्तपत्रांमधील अग्रलेखांचे वाचन, विविध विषयांवरील पुस्तकांचे वाचन करण्याची सवय कामी येते.
कोणत्याही प्रकारची राजकीय मते व्यक्त करणे टाळावे. राजकीय परिस्थितीबद्दल सहसा प्रश्न विचारले जात नाहीत, तरीही असा प्रश्न विचारल्यास दोन्ही बाजू संतुलितपणे मांडाव्या. धर्म, जात याविषयी आपली व्यक्तिगत मते घरी ठरवून मुलाखत देण्यासाठी बाहेर पडावे. मुलाखतीपूर्वी मसालेदार आणि भरपेट खाणे टाळावे. मुलाखत असलेल्या दिवसभरात च्युईंगगम किंवा तत्सम सवयी असलेले खाणे टाळावे. मुलाखतीसाठी इस्त्राr केलेले कपडे परिधान करावेत परंतु नवे कपडे वापरणे टाळावे कारण त्याची आपल्याला सवय नसते आणि आपले लक्ष वेधण्यासाठी नवे कपडे घालण्याची आवश्यकता नसते. त्यामुळे पुरुषांनी असा स्वतःला अस्वस्थ करणारा पेहराव टाळावा. कॉलर किंवा विना कॉलरचे टी शर्ट टाळावे. थोडक्यात सांगायचे तर औपचारिक कपडे परिधान करावेत. स्त्रियांनी मुलाखतीसाठी साडी नेसण्याची आवश्यकता नसते. ज्या कपडय़ांची सवय आहे असे कपडे परिधान करावे उदाहरणार्थ पंजाबी ड्रेस. भडक मेकअप करू नये. लग्न समारंभात परिधान करावयाचे कपडे मुलाखतीसाठी अयोग्य असतात.
आपली निवड आपण कसे दिसतो यापेक्षा कशी अभ्यासपूर्ण उत्तरे देतो यावर होत असते, त्यामुळे कोणता सुगंधी स्प्रे मारलेला चांगला, यावर विचार करण्यात वेळ घालवू नये आणि स्प्रेचा वापर टाळावा. ज्या नोकरीसाठी आपण मुलाखत देणार आहोत त्या ‘जॉब-रोल’ संबंधी माहिती घेऊन त्यासाठी आपल्याकडे कोणते कौशल्य आहे त्यानुसार अभ्यासपूर्वक उत्तरे देण्याची तयारी करण्यात अधिक वेळ व्यतीत करावा.
-सुहास किर्लोस्कर








