पोलीस निरीक्षकाची पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध तक्रार : अन्यायाविरुद्ध छेडले आंदोलन
प्रतिनिधी/ बेळगाव
पोलीस उपनिरीक्षकाच्या त्रासामुळे आपल्या वडिलांचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत एका पोलीस निरीक्षकाने वडिलांचा मृतदेह पोलीस ठाण्यासमोर ठेवून आंदोलन केल्याची घटना शुक्रवारी रात्री हारुगेरी, ता. रायबाग येथे घडली आहे. न्यायासाठी पोलीस अधिकाऱ्यावरच पोलीस दलाविरुद्ध आंदोलन छेडण्याची वेळ आली आहे. यावरून पोलीस ठाण्यातील कारभार कसा चालतो? हे लक्षात येते.
विजापूर जिल्ह्यातील देवदुर्ग पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक अशोक सदलगी व त्यांच्या कुटुंबीयांनी शुक्रवारी रात्री हारुगेरी पोलीस स्थानकासमोर आंदोलन केले. त्यांचे वडील आण्णाप्पा सदलगी (वय 80) रा. हारुगेरी क्रॉस यांचा शुक्रवार दि. 7 फेब्रुवारी रोजी बेळगाव येथील एका खासगी इस्पितळात मृत्यू झाला. हारुगेरी पोलिसांच्या त्रासामुळे वडिलांचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत मृतदेह बेळगावहून थेट पोलीस स्थानकात नेण्यात आला. पोलीस निरीक्षक रविचंद्र यांनी कुटुंबीयांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
हारुगेरीचे पोलीस उपनिरीक्षक माळाप्पा पुजारी यांनी जमीन वादातून आपल्या वडिलांना नाहक त्रास दिला आहे. बेकायदा कोंडून ठेवले होते. 18 वर्षांपूर्वी वडिलांनी हारुगेरी क्रॉसनजीक अडीच एकर जमीन खरेदी केली होती. रितसर खरेदीही झाली आहे. आता या जमिनीतून आपले वडील व भावाला बाहेर काढण्याचे प्रयत्न झाले. 10 जानेवारी 2025 रोजी ही घटना घडली. त्याचदिवशी वडिलांनी 112 क्रमांकाशी संपर्क साधून तक्रार केली.
केवळ पंधरा मिनिटांत पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आपल्या जमिनीत बाबू नडोणी, प्रताप हारोली, वसंत चौगला आदींनी बेकायदा प्रवेश केला होता. पोलिसांनी दोघांनाही हारुगेरी पोलीस स्थानकात बोलावले. रितसर जमिनीचे मालक आम्ही असूनही पोलिसांनी दुसऱ्यांची बाजू घेऊन वृद्ध वडील व भावावर दमदाटी केली. आमची तक्रारही दाखल करून घेतली नाही. त्या दिवसापासून वडिलांची साखर व रक्तदाब वाढला. सुरुवातीला स्थानिक इस्पितळात नंतर रायबाग इस्पितळात उपचार करण्यात आले. गोकाक येथील खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. तरीही प्रकृती सुधारली नाही म्हणून बेळगावला हलविण्यात आले. शुक्रवारी 7 फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलीस निरीक्षक अशोक सदलगी यांनी सांगितले.
आपल्या वडिलांवर खासगी इस्पितळात उपचार सुरू होते, त्यावेळी 2 फेब्रुवारी रोजी जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सदाशिव मारुती सवदी ऊर्फ रड्डेरहट्टी यांच्याकडून 18 वर्षांपूर्वी वडिलांनी ही जमीन खरेदी केली होती. आता ही जमीन ताब्यात घेण्यासाठी सदाशिवसह काही जणांनी प्रयत्न सुरू केले होते. पोलिसांनी कागदपत्रांची पडताळणी न करता सदाशिव व त्यांच्या साथीदारांना पाठीशी घालण्यासाठी आमचे वडील व भावाला त्रास दिला आहे, असा आरोप पोलीस अधिकाऱ्याने केला आहे.
यासंबंधी जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी खुलासा केला आहे. आण्णाप्पा सदलगी यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाला नाही, त्यांना आरोग्याची समस्या होती. कुटुंबीयांनी खासगी इस्पितळात दाखल केले होते. ते हृदयरोगानेही त्रस्त होते. त्यामुळे कुटुंबीयांनी केलेला आरोप बिनबुडाचा असल्याचे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, जिल्हा पोलीसप्रमुख घटनास्थळी यावेत, यासाठी शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत मृतदेह हारुगेरी पोलीस स्थानकातच ठेवण्यात आला होता. एका पोलीस अधिकाऱ्याच्या कुटुंबीयानेच न्यायासाठी पोलीस स्थानकात मृतदेह ठेवून आंदोलन छेडले आहे, त्यामुळे जमीनवाद, खासगी व्यवहारात पोलीस अधिकाऱ्यांची वागणूक कशी असते? याचा सर्वसामान्यांना त्रास कसा होतो? यावर प्रकाश पडला आहे.









