चोरीचा बनाव करणे आले अंगलट : शिंदोळी येथील घटना
प्रतिनिधी /बेळगाव
आपल्या घरात चोरी झाल्याचा बनाव करणाऱ्या घरमालकाविरुद्धच एफआयआर दाखल करण्यात आला आहे. शनिवारी शिंदोळी, ता. बेळगाव येथे ही घटना घडली असून आपण घरात नसताना कपाट फोडून चोरट्यांनी 30 लाख रुपये चोरल्याचे त्याने पोलिसांना सांगितले होते.
शिंदोळी येथील इरफान शमसुद्दीन सनदी (वय 21) या युवकावर भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 212 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. शनिवार दि. 31 मे रोजी दुपारी 2.30 ते सायंकाळी 6 या वेळेत आपल्या घरात चोरी झाल्याचे इरफानने सांगितले होते. चोरीची घटना समजताच मारिहाळ पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस निरीक्षक मंजुनाथ नायक, उपनिरीक्षक चंद्रशेखर सी., बी. एन. बळगन्नावर, आर. एच. तळवार, आर. एस. बळुंडगी, पी. जी. सुळकोड, राजू केळगिनमनी आदी अधिकारी व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. 30 लाख रुपये रोकड पळविण्यात आली आहे, असे सांगितल्यामुळे हे प्रकरण गांभीर्याने घेऊन श्वानपथक, ठसेतज्ञ व ‘सोको’ अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले.
पोलिसांना घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर संशय येऊन चोरीची माहिती देणाऱ्या इरफानचीच चौकशी केली असता प्रत्यक्षात चोरी झाली नसून त्याने चोरीचा बनाव केल्याचे उघडकीस आले. इरफान हा शिंदोळी येथील बसवेश्वर फायनान्समध्ये काम करतो. 2015 पासून घरचे व्यवहारही तोच सांभाळतो. त्याच्या घरात एकूण 30 लाख रुपये असायला हवे होते.
प्रत्यक्षात त्याच्याकडे पैसे नाहीत. कुटुंबीयांनी विचारणा केल्यास आपण उघडे पडणार, म्हणून शनिवारी दुपारी इरफान आपल्या घराला कुलूप लावून बस्तवाड येथील नातेवाईकांच्या घरी गेला. जाण्याआधी कपाट जोरात ओढून ड्रॉवर उघडून ठेवले होते. तो सायंकाळी घरी आल्यानंतर चोरी झाल्याची माहिती त्याने पसरविली होती. चोरीचा आव आणणाऱ्या इरफानवरच एफआयआर दाखल करण्यात आला आहे.









