महिलेची प्रेरणादायी कहाणी
आयुष्यात अनेक प्रकारच्या दुर्घटना घडतात, ज्यामुळे माणसांचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाते. काही लोक या दुर्घटनानंतर कोलमडून पडतात, तर काही जण त्यावर मात करत अधिक कणखरपणे उभे ठाकतात. चेल्सी हिलला नृत्याची मोठी आवड होती, परंतु वयाच्या 17 व्या वर्षी तिच्यासोबत एक दुर्घटना घडली. या दुर्घटनेमुळे ती कधीच स्वत:च्या पायांवर चालू शकणार नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. या दुर्घटनेपासून चेल्सी व्हिलचेअरवर आहे. ती चालू शकत नाही, परंतु नृत्य कसेही करा ते नृत्यच असते असे तिचे मानणे आहे.
चेल्सीच्या आईवडिलांनी तिला आयुष्यातील सर्वात वाईट काळातही सकारात्मक दृष्टीकोन राखण्याची शिकवण दिली. चेल्सीने देखील स्वत:च्या आयुष्यात याचे अनुकरण केले आहे. अमेरिकेच्या लॉस एंजिलिसमध्ये राहणारी चेल्सी यानंतर स्वत:च व्हिलचेअरवर नृत्य करू लागली. पूर्वीप्रमाणेच नृत्य करत असल्याचा आत्मविश्वास तिच्यामध्ये जागवू लागला. यानंतर तिने एक व्हिलचेअर डान्स टीम तयार केली. याद्वारे ती लोकांना भेटून त्यांच्याशी मैत्री करू इच्छित होती.
रॉलेट्टस नावाचा एक डान्सिंग ग्रूप तिने सुरू केला. यात दिव्यांग महिलांनी भाग घेतला. दिव्यांग महिला देखील नृत्य करू शकतात हे जगाला दाखवून देण्याची माझी इच्छा होती. नृत्याद्वारे मी दिव्यांग महिलांना सशक्त करू इच्छिते असे चेल्सीने एका मुलाखतीत सांगितले आहे.
पॅरालाइज्ड झाल्यावर कुणी माझ्यावर निस्वार्थी प्रेम करेल ही आशाच मी सोडून दिली होती. परंतु मी चुकीची ठरले. 7 वर्षांपर्यंत मी एका व्यक्तीबरोबर वेळ घालविला आणि अलिकडेच आम्ही दोघांनी विवाह केला आहे. मी ज्या स्थितीत आहे, त्यात स्वीकारणारा पती मिळाल्याने मी अत्यंत सुदैवी असल्याचे चेल्सी सांगते.
चेल्सी सोशल मीडियावर स्वत:च्या नृत्याचे व्हिडिओ शेअर करते आणि महिलांना प्रेरित करत असते. तिला 1 लाख 83 हजारांहून अधिक लोक फॉलो करतात. स्वत:च्या विवाहावेळी चालता यावे म्हणून तिने अनेक महिने सराव देखील केला होता. स्वत:च्या पतीसमोर उभे राहून प्रेमाने त्याच्या डोळ्यांमध्ये पाहण्याची तिची इच्छा होती आणि तिने ती पूर्ण देखील केली.









