कंपनीकडून प्लॅटफॉर्मचा वापर जबाबदारीने करण्याचाही सल्ला : वापरकर्त्यांच्या सुरक्षेसाठी सतत काम
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जगातील दिग्गज कंपनी मेटा यांच्या मालकीचे लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने नुकतेच सांगितले आहे की, त्यांनी फेब्रुवारी 2025 मध्ये भारतात 97 लाखांहून अधिक व्हॉटअॅप खात्यांवर बंदी घातली आहे. ही कारवाई व्हॉट्सअॅपच्या अटी आणि नियमांचे उल्लंघन केल्यामुळे करण्यात आली असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे यापैकी 14 लाखांहून अधिक अकाउंट्स वापरकर्त्यांच्या तक्रारींपूर्वीच बंदी घालण्यात आली होती. दर महिन्याला प्रसिद्ध होणाऱ्या मासिक सुरक्षा अहवालात व्हॉट्सअॅपने ही माहिती दिली आहे. दरम्यान या अहवालात वापरकर्त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी आणि प्लॅटफॉर्मचा योग्य वापर करण्यासाठी अनेक सूचना देखील देण्यात आल्या आहेत.
14 लाखांहून अधिक अकाउंट्सवर कोणत्याही वापरकर्त्याने तक्रार करण्यापूर्वीच बंदी घालण्यात आली होती, व्हॉट्सअॅपने आपल्या अहवालात म्हटले आहे. कंपनीने असेही म्हटले आहे की ते वापरकर्त्यांच्या सुरक्षेसाठी सतत काम करत आहेत. यासाठी व्हॉट्सअॅपने आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. डेटा सायंटिस्ट आणि तज्ञांची टीम देखील या कामात सहभागी आहे.
प्लॅटफॉर्मवर चुकीचे व्यवहार रोखण्यासाठी भविष्यातही असे कठोर उपाय करत राहतील असे कंपनीने म्हटले आहे. व्हॉट्सअॅपने सांगितले की ते भारतातील लाखो वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेबद्दल गंभीर आहे. कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की ‘व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांना सुरक्षित अनुभव देण्यासाठी वचनबद्ध आहे. आयटी नियम 2021 अंतर्गत, आमच्या नवीन अहवालात वापरकर्त्यांकडून प्राप्त झालेल्या तक्रारी, आम्ही केलेल्या कृती आणि गैरवापर रोखण्यासाठी उचललेल्या पावलांचा तपशील आहे. त्यात तक्रारीपूर्वी बंदी घालण्यात आलेल्या खात्यांचा समावेश आहे,’









