कोल्हापूर :
महापालिकेने दिलेल्या पत्रानुसार कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीमध्ये आठ गावांच्या समावेशाचा अहवाल तयार करण्याचे काम झाले आहे. हा अहवाल पूर्ण गोपनीय असून मंगळवारी कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासकांना सादर करण्यात येणार आला. अहवाल पूर्ण गोपनीय आहे. यामुळे अहवालात दडलंय काय अशी चर्चा होत आहे.
कोल्हापूर शहराची हद्दवाढ गेल्या अनेक वर्षापासून झालेली नाही. त्यामुळे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शहराची हद्दवाढ करण्याबाबत अनेक वर्षांपासून मागणी सुरु आहे. यासंदर्भात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार राजेश क्षीरसागर यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांची भेट घेऊन हद्दवाढीबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी केली होती. यावेळी झालेल्या चर्चेमध्ये उजळाईवाडी, उचगांव, सरनोबतवाडी मोरेवाडी, पाचगांव, कळंबा, बालिंगा, पाडळी या आठ गावांचा पहिल्या टप्प्यात हद्दवाढीमध्ये समावेश करण्याचा निर्णय झाला होता.
आता हद्दवाढीचा प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. 1 जुलै रोजी मनपा प्रशासनाने जि.प. प्रशासनाला संबंधित गावांची 2011 साली लोकसंख्dया किती होती, शेती, बिगरशेती क्षेत्र किती आहे, अशी सविस्तर माहिती मागवली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेकडून गेली पंधरा दिवस गोपनीय अहवाल तयार करण्यात आला आहे. मंगळवारी आठ गावांच्या हद्दवाढीबाबतचा अहवाल महापालिका प्रशासकांना सादर करण्यात येणार आला अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन.एस यांनी दिली.
- संबंधित गावांची भूमिका महत्वाची
महापालिकेने प्रस्तावित हद्दवाढीच्या आठ गावांची माहिती जिल्हा परिषदेकडे मागवली होती. त्याप्रमाणे जिल्हा परिषदेने ही माहिती महापालिकेला सादर केली.पण यासाठी ग्रामपंचायतीचे ठराव महत्वाचे आहेत. यामुळे संबंधित आठ गावांची भूमिका महत्वाची आहे.
- गावातील लोकांच्या विविध मागण्या
हद्दवाढीत समाविष्ट करण्यात येणाऱ्या संबंधित गावांच्या विविध मागण्या आहेत. कुणाला गावठाण तसेच राहावे वाटते तर कुणाला हद्दवाढीत यायचे आहे. गावातील लोकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया असल्याची चर्चा आहे.
- प्रस्तावित हद्दवाढीतील गावे
उजळाईवाडी, उचगांव, सरनोबतवाडी मोरेवाडी, पाचगांव, कळंबा, बालिंगा, पाडळी








