Kolhapur News : शेंडा म्हणजे शेवटचे टोक.आणि गावाच्या शेवटच्या टोकाला असलेला पार्क म्हणजे शेंडा पार्क.कोल्हापुरातला शेंडा पार्क 1890 साली म्हणजे 133 वर्षांपूर्वी वसला . तेथे संस्थान काळात घोड्याची दगडी कमानीची पागा होती.या गवती माळावर घोड्याची देखभाल केली जात होती.हात एक पाण्याचा हौद,मारुतीची छोटे मंदिर आणि समोर घोड्यांना रोज रपेट देण्यासाठी गोलाकार मैदान असे त्याची मूळ स्वरूप होते. या रस्त्यावरून दिवस मावळल्यावर सोडाच पण दिवसाही कोणी फारसं जायचं नाही.गेलच तर एखादी बैलगाडी खाड ,खाड चाके वाजवत जायची.त्यामुळे शेंडा पार्कच्या माळावर फक्त आणि फक्त घोंगावणाऱ्या वाऱ्याचीच साद असायची.हल्ली या मोकळ्या माळावरच्या जागेत कुष्ठधाम उपचार केंद्र सुरू झाले.त्यापूर्वी ते उचगाव परिसरात होते.
कुष्ठरोग्यांना समाज सामावून घेत नाही त्यामुळे त्यांनी शेती करून जगावे म्हणून या माळावर कुष्ठरोग्यांकडून शेती केली जाऊ लागली.राहण्याची व्यवस्था केली गेली. माळावर कुष्ठरोग उपचार केंद्र सुरू झाल्यावर तर या माळावरून पुढे जाणाऱ्यांनीही आपली वाट बदलली. कारण कुष्ठरोग संसर्गातून होतो ही मनात घट्ट करून राहिलेली भीती.त्यामुळे शेंडा पार्क आणखीनच निर्मनुष्य झाला. आर. के. नगर ,खडीच्या गणपती परिसरात सुरुवातीला लोक राहायला येतानाही दबकायचे ,जाता येता नाकाला रुमाल बांधायचे .पण हळूहळू कुष्ठरोगाची संसर्गाची भीती कमी होत गेली , शेंडा पार्कच्या पलीकडे एखाद्या छोट्या गावाएवढी वस्ती उभी राहिली.वाहनांची सुसाट येजा सुरू झाली. आणि आज जो काही नवा सरकारी प्रस्ताव प्रस्तावित आहे तो शेंडा पार्कच्या जागेत घोषित होऊ लागला आहे. इमारत ,खंडपीठ ,मेडिकल कॉलेज ,फुटबॉल अकादमी ,डर्ट ट्रॅक ,समाज कल्याण व सतीगृह,नवीन कलेक्टर ऑफिस ,पोलीस ठाणे ,हॉस्पिटल,वखार महामंडळ गोदामे याची तर या जागेवर चर्चा आहेच.पण आणखी नवीन काही कल्पना सुचली तर शेंडा पार्क हे जणू ठरुनच गेले आहे.
वास्तविक शेंडा पार्कची नेमकी जागा किती हा विषय महसुली अँगलने थोडा क्लिष्ट आहे.जागेतील मोठा भाग शेती व आरोग्य विभागाकडे आहे.शेंडा पार्क कुष्ठधाम साठी स्वाधार नगरातली थोडी जागा आहे.गतिमंदाच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करणारी एक संस्था आहे.प्रशासकीय इमारत नियोजित खंडपीठाच्या जागेसाठी व मेडिकल कॉलेजच्या नियोजित जागेसाठी त्या जागेचा सातबारा आहे .नियोजित जे सरकारी प्रकल्प आहेत त्याला तिथे जरूर जागा आहे.पण शेंडा पार्क मोकळा आहे , म्हणून तेथे काय काय उभे करायचे यावर या निमित्ताने एकदा विचार करण्याची गरज आहे.कारण शेंडा पार्कचा माळ म्हणजे नैसर्गिक ऑक्सिजन पार्क आहे.तो एकदा एकापाठोपाठ एक बांधकामाच्या आड दडला गेला तर कोल्हापूरवरून वाहणारी वाऱ्याची झुळूक हा प्रकारच बंद होणार आहे.आणि त्यानंतर सगळा शेंडा पार्क रोज एका नव्या बांधकामासाठी का म्हणून दिला यावर चर्चासत्रे घेण्याची वेळ येणार आहे.
शेंडा म्हणजे गावाच्या शेंड्याला अशी जशी एक ओळख आहे तसे ,या माळावर उगवण्राया निवडुंगाच्या मोठ्या मोठ्या फडामुळे शेंडा असेही म्हटले जात होते .या विस्तीर्ण माळावर शेंडा पार्क पागा ,कुष्ठरोगी उपचार केंद्र ,नाईकबा ,म्हसोबा मंदिर एवढ्याच वास्तू होत्या .गोमती नाल्याचा पाट या माळावरून वाहत होता. त्याला एक जुना दगडी बंधाराही होता.तो मेडिकल होस्टेलच्या मागे एका घळीत आहे.त्या माळा भोवती असलेल्या धामोडकर पोवार, मंडालिक या शेतकऱ्यांच्या जमिनी या पाण्यावरच होत्या. या माळावर दरवर्षी घटस्थापनेच्या दिवशी ठरल्याप्रमाणे नाईकबाची मोठी बैलगाडी शर्यत होत होती. या माळाजवळच हशामदार मंडलिक यांची विहीर आहे.या विहिरीतल्या पाण्याचा तेथे दहा लाख मुस्लिमांच्या उपस्थितीत झालेल्या इजतेमाला पाणीपुरवठा केला गेला होता.
या शेंडा पार्कला कोल्हापूरचा ऑक्सिजन पार्क म्हणून त्याचे थोडेफार तरी अस्तित्व ठेवणे ही काळाची गरज आहे.जे कोल्हापूरच्या विकासासाठी अगदी आवश्यक आहे त्यासाठी शेंडा पार्क नक्की अपरिहार्य आहे .पण शेंडा पार्क म्हणून त्याचे मूळ अस्तित्व काही प्रमाणात तरी ठेवण्याचे नियोजन आवश्यक आहे ृ.नाहीतर शेंडा पार्क कोठे होता? तेथे मोकळी हवा कशी खेळत होती ? हे शोधायची भविष्यात वेळ येणार हे स्पष्ट आहे.
शेंडा पार्क नेमका कसा आहे ?
शेंडा पार्कचे नेमके क्षेत्र किती ? त्यातला किती भाग कोणाच्या ताब्यात ? पार्काची हद्द? तेथे नियोजीत काय काय आहे याचा एकदा लेखाजोखा महसुल विभागाने जाहिर करण्याची गरज आहे.