आज नगरसेवकांसह 48 जण चंदीगडला रवाना होणार
बेळगाव : चंदीगड अभ्यास दौऱ्यासाठी बेळगाव महानगरपालिकेचे 46 नगरसेवक आणि दोन अधिकारी असे एकूण 48 जणांचे पथक गुरुवार दि. 30 रोजी रवाना होणार आहे. गोवा येथून विमानाने चंदीगडला प्रस्थान केले जाणार असून सत्ताधारी व विरोधी गटातील नगरसेवकांचा यामध्ये समावेश आहे. विद्यमान सभागृहातील नगरसेवकांचा हा पहिलाच अभ्यास दौरा आहे. नगरसेवकांच्या या चंदीगड अभ्यास वारीने काय साध्य होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. चंदीगड अभ्यास दौऱ्या संदर्भात मंजुरी मिळावी यासाठी मनपा आयुक्त शुभा बी. यांनी नगरविकास खात्याकडे प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावाला काही अटींवर परवानगी देण्यात आली असून अभ्यास दौऱ्यासाठी 30 लाख रुपयांची खर्च मर्यादा घालून देण्यात आली आहे. गुरुवार 30 रोजी नगरसेवकांसाठी गोव्यातून चंदीगडला जाण्याची सोय करण्यात आली आहे. मात्र सर्वांसाठी एकच विमान उपलब्ध न झाल्याने वेगवेगळ्या विमानाने नगरसेवक व अधिकारी रवाना होणार आहेत.
यापैकी काही नगरसेवक 3 फेब्रुवारीलाच बेळगावला परतणार असून काही नगरसेवक मात्र दिल्लीला जाणार आहेत. त्यानंतर प्रयागराज येथील कुंभळमेळ्यात सहभागी होणार आहेत. कुंभमेळ्यात सहभागी झाल्यानंतर महापौर, उपमहापौर निवडणुकीसंदर्भात चर्चा केली जाणार असल्याचे समजते. या दौऱ्याची माहिती चंदीगड स्मार्ट सिटी विभाग व तेथील संब्ंधित कार्यालयांना देण्यात आली आहे. त्यामुळे नगरसेवकांना माहिती देण्यासाठी त्याठिकाणी अधिकारी उपलब्ध असणार आहेत. विद्यमान सभागृहातील हा पहिलाच अभ्यास दौरा असल्याने अनेक नगरसेवकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. महापालिकेतील लोकनियुक्त 58 नगरसेवक, 5 सरकारनियुक्त नगरसेवक व अधिकाऱ्यांसाठी हा दौरा आयोजित करण्यात आला होता. पण दौऱ्यासाठी केवळ 46 नगरसेवकच इच्छुक असल्याने ते दोन अधिकाऱ्यांसह एकूण 48 जण गुरुवारी चंदीगडलला रवाना होणार आहेत. अभ्यास दौऱ्यासाठी रवाना होणारे नगरसेवक, स्मार्ट सिटी व तेथील विकासकामांचा अभ्यास करणार की पर्यटन करणार हे मात्र पहावे लागणार आहे.









