बँका, डेअरी, दुकानदार स्वीकारत नाहीत नाणी : भारतीय रिझर्व्ह बँक कारवाई करणार काय

फोंडा : दहा रुपयाची व्यवहारात असलेली चलनी नाणी स्वीकारायची नाहीत असे स्वयं घोषित निर्णय काही सहकारी बँका, गोवा डेअरीचे दूध बुथ, खासगी बस कंडक्टर व दुकानदारांनी घेतले आहेत. त्यामुळे या चलनी नाण्यांचे करायचे काय? असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. चलनी नोटा व नाण्यांचे नियंत्रण करण्याचा अधिकार भारतीय रिझर्व्ह बँकेला आहे व रिझर्व्ह बँकेने अद्याप तरी दहा रुपयांची नाणी चलनातून रद्द करण्याचा आदेश काढलेला नाही. त्यामुळे अशी नाणी ग्राहकांकडून नाकारण्याचा अधिकार बँका व पतसंस्थांना कुणी दिला, असा प्रश्न ग्राहक उपस्थित करीत आहेत. ज्या बँका व पतसंस्थेच्या शाखांकडून दहा रुपयांची चलनी नाणी स्वीकारण्यास नकार दिला जातो, त्यांनी त्यांच्या सूचना फलकावर शाखा व्यवस्थापक किंवा बँकेच्या सरव्यवस्थापकाच्या नावाने तशी अधिकृत नोटीस लावलेली दिसत नाही.
फोंडा येथील गोवा डेअरीच्या दूध बुथांवर ग्राहकांकडून रु. 10 ची चलनी नाणी स्वीकारली जात नाहीत. त्यामागील कारण म्हणजे या बुथवर जमा होणारी दिवसाची रक्कम ज्या गोवा राज्य सहकारी बँकेच्या शाखेत जमा केली जाते, तेथे रु. 10 ची नाणी स्वीकारली जात नाहीत. 1 रुपया, 2 किंवा 5 रुपयांची नाणी स्वीकारली जातात मग 10 रुपयाची चलनी नाणी का नाहीत? असा प्रश्न ग्राहक उपस्थित करीत आहेत. आता तर रिझर्व्ह बँकेने 20 रुपयांची नाणी चलनात आणली आहेत. तिही स्वीकारणार नाहीत का? याचे उत्तर या स्वयंघोषित पतसंस्था व बँकांनी द्यायला हवीत. निदान ग्राहकांना कळण्यासाठी शाखा व्यवस्थापक किंवा बँकेच्या सरव्यवस्थापकाच्या नावाने प्रत्येक शाखेच्या काऊंटरवर तशा अधिकृत नोटीसा लावाव्यात. रिझर्व्ह बँकेच्या गोवा विभाग प्रमुखांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन चलनी नाणी स्वीकारण्यास नकार देणाऱ्या पतसंस्था व बँक शाखांना कारणे दाखवा नोटिसा जारी कराव्यात, अशी मागणी ग्राहकांकडून केली जात आहे.









