पोलीसांनी कार्यक्षमता दाखवणं महत्त्वाचे..
सतेज पाटील यांचे वक्तव्य
कोल्हापूर
इंडिया आघाडीतर्फे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर आमदार सतेज पाटील पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी आमदार सतेज पाटील म्हणाले, गृह खात्याने आरोपी मिळवण्यासाठी बक्षीस जाहीर केलेला आहे मुख्य आरोपी मिळाल्याशिवाय या केसचा उलगडा होणार नाही. पोलिसांनी कार्यक्षमता दाखवणे गरजेचे आहे. सत्ता कोणाची आहे यापेक्षा सिस्टीम काय करते हे महत्त्वाचं आहे. वेगळा दिशेला हा केस घेऊन जाण्याचा प्रयत्न सुरू आहे का असा संशय येत आहे. या केसमध्ये राजकीय पक्षांच्या नेत्यांपेक्षा पोलिसांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. २० – २२ दिवस आरोपी सापडत नसेल तर देश पातळीवर आम्ही काय उत्तर देणार ? असा प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी केला.
पुढे आमदार पाटील म्हणाले, महायुतीच्या खाते वाटपातील नाराजी दिसू लागली आहे. एकेक खात्याचा अर्ध खातं करण्यात आलेला आहे यामुळे नाराजी दिसू लागली. अनेक मंत्री अद्याप देखील ऑफिसला गेलेले नाहीत. राज्याचे आर्थिक परिस्थितीचा आढावा अद्याप घेण्यात आलेला नाही. नेमकं कोणत्या दिशेने जावं हे मंत्र्यांना कळत नाही आहे. अडचणी भरपूर आहेत मात्र सरकार सुरू नाही ही वास्तवता आहे. बहुमत भाजपला मिळाला आहे यामुळे घटक पक्षांना महत्त्व राहील नाही असं वाटत आहे. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी यातारखांना झेंडावंदनसाठी फक्त पालकमंत्री नसतो. जिल्ह्याचे एकूण नियोजन पालकमंत्र्यांकडे असते. लवकरात लवकर वाद मिटवून जिल्ह्याचा पालकमंत्री मिळावा अन्यथा पालकमंत्री द्या म्हणून आम्हाला उपोषणाला बसावं लागेल.
याप्रसंगी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर बोलताना आमदार पाटील म्हणाले, जेव्हा ही योजना सुरू झाली तेव्हा अर्थ खात्याने फाईलवर काय लिहिलं होतं? फाईलवर अटी व शर्ती घाला असं लिहिण्यात आलं होतं का? अटी व शर्ती घाला असे म्हणण्यात आले होते तर तेव्हा का घातला नाही? मग आता का घालत आहात? या अटी व शर्ती तुम्हाला आज आठवल्या का? सुरुवातीला बहिणींना दिवाळी भाऊबीज म्हणून पैसे दिले मग आता त्या बहिणी मधला दुरावा तुम्हाला दिसू लागला आहे का? आता यापैकी दोन लाडक्या बहिणी राहिलले आणि तीन नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे का? ज्यांना आधी तुम्ही दिला आहे त्यांना आता पुन्हा तुम्हाला थांबवता येणार नाही. दिवाळी चांगल्या पद्धतीने साजरी केली असं तुम्ही जाहीरपणे सांगता मग आता भावाने त्याच बहिणींना वाऱ्यावर सोडणार आहेत का?
पुढे एफआरपी विषयी बोलताना आमदार पाटील म्हणाले, केंद्र सरकारकडे एमएसपी वाढवण्यासाठी प्रयत्न आमचा सुरू आहे. साखर ३२०० आणि ३३०० रुपयांनी सुरू आहे… एफ आर पी ३२०० आणि ३३०० रुपये दिली आहे. अर्थकारण बिघडलेले आहे. एम एस पी वाढवल्याशिवाय शेतकऱ्याला जास्त पैसे देणे कारखान्यांना परवडणार नाही. साखरेचे दर वाढू द्यायचे नाही तिकडे शेतकऱ्याला बिलं मिळू द्यायचे नाहीत असे सरकारचे धोरण सुरू आहे. नेमकं काय चाललंय कळत नाही. शेतकऱ्याला जास्त भाव मिळावा अशी आमची देखील भूमिका आहे.
पुढे ते स्थानिक स्वराज्य निवडणुकांबद्दल बोलले, मार्च एप्रिल मध्ये निवडणूक होतील असे भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणत आहेत. त्यामुळे महविकास आघाडी म्हणून २२ तारखेचा निकालाची आम्ही वाट बघू.
मी सभागृहात बोलल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की घरगुती सामान्य लोकांना स्मार्ट मीटर बसणार नाही मात्र आता ते बसवलं जात आहे. विधानसभा निवडणुकी पर्यंत हे थांबवलं गेलं मात्र आता पुन्हा ते सुरू करण्यात येत आहे याला आमचा आणि लोकांचा विरोध आहे, असे वक्तव्य त्यांनी स्मार्ट प्रीपेड मीटर संदर्भात केले.
आमच्या काळामध्ये देखील गडचिरोलीमध्ये अनेक चांगले उपक्रम राबवले. आता शांत जिल्हा म्हणून गडचिरोली ओळखला जात आहे असेही पाटील म्हणाले.
शेंडा पार्क मध्ये आयटी पार्क साठी आरक्षित झालेले आहे. कोल्हापूरच्या जनतेला महायुतीला भरभरून यश दिलेला आहे महायुतीच्या आमदाराची आणि नेत्यांची नैतिक जबाबदारी आहे, कोल्हापूरचा विकास करायची. आता त्या लोकांनी काम करावं अशी आमची अपेक्षा आहे. असे वक्तव्य आमदार सतेज पाटील यांनी केले.
पुढे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती घोटाळा याबद्दल बोलताना ते म्हणाले, कोणाच्या काळात हे सर्व झालं कोण अध्यक्ष होते याची चौकशी लावली पाहिजे. गेले तीन वर्षाचे जिल्हाधिकारी अध्यक्ष आहेत त्यांनी स्वतः त्याची चौकशी करावी. आई अंबाबाई आमचं श्रद्धास्थान आहे आणि तेथे हा कारभार ऐकायला मिळत आहे. हे खरं नसेल तर त्याचा स्पष्टीकरण जिल्हाधिकाऱ्यांनी दिला पाहिजे. हा कोल्हापूरच्या अस्मितेचा प्रश्न आहे, त्यावर जिल्हाधिकारी आपली भूमिका जाहीर करायला हवी.
काँग्रेसच्या पराभवाबद्दल विचारणा झाली असताना आमदार सतेज पाटीलम म्हणाले, महाराष्ट्रात काँग्रेसला मिळालेल्या पराभवानंतर यासंदर्भात बेळगाव येथील अधिवेशनात चार तास चर्चा झाली. पक्ष म्हणून यशाची जबाबदारी स्वीकारतो तेव्हा तर अपयशाची कारणे शोधणं ही देखील आमचे जबाबदारी आहे.








