‘मंथन’ साहित्य संमेलनात लेखिका वडगबाळकर यांचे प्रतिपादन

बेळगाव : ‘अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक’ ही प्रत्येक माणसाची भावना असायला हवी. त्यासाठी विचार करणे आवश्यक आहे. विचारांमधून शब्द येतात, शब्दांमधून कृती, कृतींमधून सवय आणि सवयींमधून चारित्र्य, अशी ही साखळी आहे. याच्या समुच्चयाने चांगली व्यक्ती निर्माण होते, असे विचार सोलापूरच्या लेखिका डॉ. श्रुती वडगबाळकर यांनी व्यक्त केले.
मंथन कल्चरल आणि वेल्फेअर सोसायटी व हिंदवाडी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 36 वे महिला साहित्य संमेलन सामर्थ्य मंदिर, टिळकवाडी येथे जी. ए. कुलकर्णी व्यासपीठावर रविवारी पार पडले. संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. श्रुती यांनी ‘मराठी साहित्यातील रत्नजडित ओळी’ हा विषय मांडला. त्या म्हणाल्या, आज आपण 21 व्या शतकात आहोत. परंतु, 19 वे शतक हे स्त्रियांसाठी महत्त्वाचे आहे. कारण त्या काळात अनेक सामाजिक आणि वैचारिक बदल झाले आणि 1990 पर्यंत स्त्रियांनी जे जे भोगले ते अत्यंत उत्तम पद्धतीने शब्दबद्धही केले. त्यातील एकेक ओळसुद्धा महत्त्वाची आहे.
एखादे वाक्य परिवर्तन करू शकते, त्यासाठी ज्ञानेश्वरांच्या ओव्या फार चपखल आहेत. आपला आतला आवाज काय सांगतो, हे महत्त्वाचे आहे. जसे की ‘ऊस डोंगा परि रस नोहे डोंगा, का रे भुललासी वरलिया रंगा’, असे संत सांगून गेले. हे वचन आजही लागू पडते. आधुनिक मराठीत अनेक कवी आहेत, ज्यांच्या ओळी कायम स्मरणात राहतात. जसे की ‘फिटे अंधाराचे जाळे’ किंवा इंदिरा संत यांच्या ‘कुब्जा’ कवितेतील ‘हे माझ्यास्तव’ किंवा बहिणाबाईंची ‘अरे संसार संसार’ ही रचना असो. शब्दांचे सामर्थ्य मोठे आहे. त्या सामर्थ्यावर अवघाची संसार सुखाचा करीन अशी आपली भावना असायला हवी, असे त्या म्हणाल्या.
विविध क्षेत्रातील दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर डॉ. श्रुती यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. व्यासपीठावर मंथनच्या अध्यक्षा शोभा लोकुर तसेच सुरेखा भावे, सावित्री कळ्ळीमनी, श्रुती परांजपे, प्रा. मनीषा नाडगौडा, नीना जठार, प्रिया कवठेकर या कार्यकारिणी सदस्या उपस्थित होत्या. संज्योती, चंद्रज्योती, अश्विनी, शोभा पोतदार यांनी स्वागतगीत व ईशस्तवन सादर केले. त्यांना योगेश रामदास, नारायण गणाचारी यांनी वाद्याची साथ दिली. संगीत दिग्दर्शन अर्चना बेळगुंदी यांचे होते.
शोभा लोकुर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. अध्यक्षांचा परिचय विद्या हंगिरगेकर यांनी करून दिला. उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांची नावे नीना जठार यांनी सादर करून अभिनंदन केले.
कोरोना काळातील ऑनलाईन शिक्षण या विषयावर प्राचार्य प्रणव पित्रे म्हणाले, कोविडने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची परवड केली. विद्यार्थ्यांचे शारीरिक आणि मानसिक खच्चीकरण झाले. 15 मिनिटांचा वर्ग तासभर घ्यावा लागत असे. त्यामुळे शिक्षण ही शिक्षा वाटत होती. आपल्या देशात शिक्षण तंत्रज्ञानाशी जोडले नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आणि यापुढील काळात त्यापासून दूर राहून चालणार नाही, असे ते म्हणाले.
व्यवसाय व स्त्राrशक्ती याबाबत पुष्कर ओगले म्हणाले, शालेय शिक्षणाचा आणि व्यवस्थापनाचा संबंध नाही. स्त्रियांना उपजतच व्यवस्थापन कला अवगत आहे. त्या प्राधान्यक्रम ठरवतात आणि एकाच वेळी अनेक कामे पूर्ण करतात. समन्वय, सहकार्य, कौशल्य विकास हे गुण त्यांच्यात आहेतच. परंतु, नेमके काय करावयाचे आहे, ते निश्चित असते. कामाप्रती निष्ठा आणि कष्टाची तयारी यामुळे स्त्राrशक्ती यशस्वी होत आहे. ही दोन्ही सत्रे रुस्तुम रतनजी यांच्या स्मरणार्थ आशा रतनजी यांनी प्रायोजित केली होती. सुरेखा भावे, प्रिया कवठेकर यांनी सूत्रसंचालन केले. संज्योती धामणकर यांनी संपूर्ण वंदेमातरम् सादर केले. श्रुती परांजपे यांनी आभार मानले.
कवितांतून महिलांचे प्रतिबिंब

वर वर दिसते शांत,
संयमी सुंदर अन् गोजिरे,
आतून केवळ भळभळणारा,
अश्वत्थामा उरे
जखम मराठीची भाळावर,
मिरवत असते तरी
एक देखणे गाव,
नांदते दक्षिण सीमेवर’
बेळगाववर एक अत्यंत समर्पक अशी कविता पूजा भडांगे यांनी मंथन संमेलनात सादर केली आणि सर्वांनाच बेळगावचा पुन्हा एकदा अभिमान वाटला. या कवितेमध्ये त्यांनी मार्कंडेय नदी, अठरा गल्ल्या, कपिलेश्वर मंदिर, एमएलआयआरसी, विणकर व्यवसाय, ग्रंथ दालने या सर्वांचा उल्लेख केला.
संमेलनामध्ये पूजा आणि सुनीता रामचंद्र या दोघींनी कविसंमेलन रंगवत नेले. स्वत:च्या आणि काही इतर कवींच्या कविता त्यांनी सादर केल्या. प्रवीण खांबले यांच्या आजीवरच्या कवितेत महिलांनी आपले प्रतिबिंब पाहिले. पूजाच्या ‘नमस्कार“ कवितेतून बाईचे सोसणे अधोरेखित झाले.
बाई तुझं मोठं मन तुझ्याहून थोर,
हाल सोसून सोसून झालं मऊशार,
कुणाकुणासाठी जीव जाळशील रोज,
तुझ्या उभ्या आयुष्याला माझा नमस्कार
या कवितेने टाळ्या घेतल्या. ‘हिरकणीइतकीच फरफट रोज होते. फक्त आमुचा पाठ अभ्यासात नाही“ हा सल कवयित्रींनी बोलून दाखविला. वैभव जोशी यांची आईवरील कविता अर्थपूर्ण होती.
सुनीता यांनी, ‘दुनियेसाठी गजबजलेले रस्ते आपण, जरी मनातून पुसले गेलेले रस्ते आपण’ ही कविता सादर केली. याशिवाय प्रथमेश या कवीची ‘चिमणी“ ही कविता सादर झाली. सुनीता यांनी ‘कुणी असू नये बाई इतकेही साधे“ ही कविता सादर केली. दोघींनीही एकत्र काही कविता सादर केल्या. पूजा यांनी बेळगाव या आपल्या जन्मभूमीवरील कविता सादर केल्यानंतर कविता म्हणजे नक्की काय? आणि तिचे आपल्या आयुष्यात स्थान काय? यावर ‘कविते’ ही कविता दोघींनी सादर केली.
विसरून आले हातावर मन,
हेच समर्पण तुझ्यासाठी,
तुझ्यासाठी पाणी जपले डोळ्यात,
आयुष्यच त्यात तरंगते
या भावनेतून कवितेकडे पाहत असल्याचे सांगून त्यांनी समारोप केला. या सत्राचे सूत्रसंचालन मनीषा नाडगौडा यांनी केले.









